बारा तासाच्या आतील परतीच्या प्रवासात टोल भरण्याची गरज नाही? काय आहे सत्य?

False सामाजिक

टोल नाक्यावर पैशावरून होणारी हुज्जत काही नवीन गोष्ट नाही. त्यात आता एका व्हायरल मेसेजमुळे आणखी गोंधळ उडत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावे फिरणाऱ्या या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, टोल नाक्यावर पावती फाडल्यानंतर बारा तासांच्या आत तुम्ही परत आला तर, तुम्हाला पुन्हा टोल भरण्याची गरज नाही. सरकारने असा नवा नियम काढल्याची बतावणी या मेसेजमध्ये करण्यात आली आहे. अनेकांनी या मेसेजच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

तीन जून रोजी शेयर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये नितीन गडकरी यांचा फोटो आहे. त्यासोबत लिहिले की, आपण टोल नाक्यावर स्लिप काढताना तेथील कर्मचारी सिंगल किंवा रिटर्न अशा दोन बाजू विचारतात. तर मित्रांनो, आता आपला 12 तासांच्या आतील प्रवास असेल तर रिटर्न स्लिपचे पैसे भरावे लागणार नाही. हा संदेश सर्व लोकांना पाठविण्यासाठी आणि जनतेला जागरुक करण्यासाठी तुम्ही माझे सर्वात चांगले मित्र आहात. धन्यवाद.

नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, भारत सरकार

तथ्य पडताळणी

नव्या सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांनी आता कुठे पदभार स्वीकारायला सुरुवात केली आहे. नितीन गडकरी यांनी स्वतः मंगळवारी 4 जून रोजी सकाळी 11 वाजता परिवहन मंत्री म्हणून पदभार घेतला. त्याचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. मग त्यांनी पोस्टमध्ये दावा केल्याप्रमाणे निर्णय कधी घेतला? गडकरी यांच्या ट्विटर हँडलवरदेखील याबाबत काही माहिती नाही.

टोल नाक्याचे नियमन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येते. प्राधिकरणाच्या वेबसाईटवर जेव्हा 12 तासांच्या परतीच्या प्रवासाचा काही नियम आहे का यासंबंधी शोध घेतला तेव्हा असा कोणताही नियम अथवा निर्णय आढळून आला नाही. मग आम्ही टोल दर कसे ठरवतात व सध्या ते काय आहेत याची माहिती घेतली.

5 डिसेंबर 2008 रोजी काढलेल्या गॅझेट ऑर्डरनुसार राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांचे दर व वसूलीचे नियम तयार केले जातात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वेबसाईटवरील सर्वात अलिकडे प्रसिद्ध झालेल्या पत्रकानुसार टोल नाक्यावर तीन प्रकारे टोल आकारला जातो.

1. सिंगल जर्नीः केवळ एका बाजूचा प्रवास

2. रिटर्न जर्नीः जाऊन परत येण्याचा प्रवास

3. मंथली पासः मासिक पास

तसेच टोल नाक्यावर ज्या जिल्ह्यात आहे तेथील परवानाधारक वाहनांसाठी विशेष दर आकारले जातात.

मूळ पत्रक येथे पाहा – NHAI

मग परतीच्या प्रवासाची (रिटर्न जर्नी) कालमर्यादा किती आहे?

प्राधिकरणाने 21 फेब्रुवारी 2013 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार, रिटर्न जर्नीची मर्यादा 24 तासांची आहे. म्हणजे तुम्ही जाताना रिटर्न जर्नी म्हणून टोल भरला तर त्या पावतीची वैधता 24 तास लागू राहते. म्हणजे तुम्ही 24 तासांच्या आत परत आला तर तुम्हाला परत टोल भरावा लागत नाही. यामध्ये कुठेही 12 तासांचा उल्लेख नाही. रिटर्न जर्नी टोलचा दर हा सिंगल जर्नीच्या दीडपट असतो.

मूळ अधिसूचना येथे वाचा – प्राधिकरण अधिसूचना

सदरील मेसेजची सत्य पडताळणी हिंदी फॅक्ट क्रेसेंडोनेदेखील केली होती. यासंबंधी प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांशी तेव्हा संपर्क केला असता त्यांनी हा मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट केले होते. रिटर्न जर्नीसाठी 24 तासांची मर्यादा असून त्यासाठी सामान्यदरापेक्षा दीडपट अधिक शुल्क द्यावे लागते. त्यामुळे 12 तासांच्या आतील परतीच्या प्रवासाला कोणतीही सूट नाही, असे त्यांनी सांगितले होते. डेक्कन क्रोनिकल्स दैनिकानेदेखील यासंबंधात बातमी केली असून गेल्या काही वर्षांपासून हा मेसेज फिरत असल्याचे म्हटले आहे. मूळ बातमी येथे वाचा – डेक्कन क्रोनिकल्सअर्काइव्ह

इंडिया टुडेने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये नितीन गडकरी यांच्या कार्यालयाचा खुलासा दिलेला आहे. यात म्हटले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावे चुकीचा मेसेज पसरविला जात असल्याचे परिवहन मंत्रालयाच्या निदर्शनात आले आहे. हा मेसेज पूर्णतः खोटा असल्याचे आम्ही स्पष्ट करतो.

मूळ खुलासा येथे वाचा – खुलासा

निष्कर्ष

परिवहन मंत्रालय किंवा नितीन गडकरी यांनी 12 तासांच्या आतील परतीच्या प्रवासाला टोल भरण्यापासून सूट देण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. असा मेसेज गेली अनेक वर्षांपासून फिरत आहे. गडकरी यांच्या कार्यालयाने तो खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते.

Avatar

Title:बारा तासाच्या आतील परतीच्या प्रवासात टोल भरण्याची गरज नाही? काय आहे सत्य?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


2 thoughts on “बारा तासाच्या आतील परतीच्या प्रवासात टोल भरण्याची गरज नाही? काय आहे सत्य?

Comments are closed.