‘टाटा हेल्थ’ कंपनीच्या नावे सध्या एक मेसेज फिरत आहे. या मेसेजमध्ये कोविड-19 मेडिकल किटची माहिती देण्यात आली आहे. कोरोना उपचारासाठी घरात कोणती औषधी ठेवावी, कोरोना होण्याचे विविध टप्पे कोणते, कोरोना होण्यापासून वाचण्यासाठी कोणती फळे खावीत वगैरी माहिती टाटा समुहाच्या नावाने सांगितली जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा मेसेज टाटा समुहातर्फे शेअर करण्यात आलेला नाही आणि यातील अनेक दावे चुकीचे आहेत.

काय आहे दावा?

सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमध्ये प्रामुख्याने चार दावे करण्यात आले आहेत.

1. टाटा समुहाने सुचवलेली कोरोना मेडिकल किट: पॅरासिटामोल, माउथवॉश आणि गारगल साठी बीटाडाइन, व्हिटॅमिन सी आणि डी-3, बी कॉम्प्लेक्स, वाफ + वाफ + कॅप्सूल, ऑक्सिमीटर, ऑक्सिजन सिलिंडर (केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी), आरोग्य सेतु अ‍ॅप, व्यायाम.

2. कोरोनाचे तीन टप्पे: नाकातील कोरोना, घशातील कोरोना आणि फुफ्फुसातील कोरोना

3. कोरोना विषाणूचा पीएच (pH) 5.5 ते 8.5 असतो

4. कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्याने कोरोना फुफ्फुसापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मरतो

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

एक-एक दाव्याची सत्यता जाणून घेऊया.

दावा क्र. 1 - टाटा समुहाने सुचवलेली कोरोना मेडिकल किट

टाटा समुहाने खरंच अशी काही मेडिकल किट सुचवली आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही मेसेजमध्ये दिलेल्या वेबसाईटला भेट दिली. त्या लिंकवर कुठेही सदरील मेडिकल किटची माहिती आढळली नाही.

मग आम्ही ‘टाटा हेल्थ’च्या सोशल मीडिया अकाउंट्सला भेट दिली. त्यातून कळाले की, टाटा समुह किंवा टाटा हेल्थ यांनी सदरील मेडिकल किट सुचवलेली नाही.

स्वतः कंपनीने ट्विटरद्वारे गेल्या वर्षी खुसाला केला होता की, टाटा हेल्थच्या नावाने चुकीचा संदेश व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेली कोविड-19 मेडिकल किटची माहिती टाटा हेल्थने प्रसारित केलेली नाही. आवाहन करण्यात येते की, अशा खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही उपचार करू नका.

https://twitter.com/tatahealth/status/1272762579165696000

अर्काइव्ह

दावा क्र. 2 - कोरोनाचे तीन टप्पे:

कोविडचे नाकातील कोरोना, घशातील कोरोना आणि फुफ्फुसातील कोरोना असे तीन टप्पे असतात का याचा जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेची सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या (CDC) वेबसाईटवर शोध घेतला. तेथे कोविडच्या अशा टप्प्यांविषयी काहीच माहिती देण्यात आलेली आहे.

अधिका शोध घेतल्यावर ‘रॅपलर’ या फॅक्ट-चेकिंग वेबसाईटची बातमी आढळली. यामध्ये त्यांनी फिलीपाईन्सच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार, कोरोनाच्या तीन टप्प्यांचा दावा निराधार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

‘रॅपलर’ आणि ‘फॅक्ट क्रेसेंडो’ दोन्ही संस्था इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्कतर्फे (IFCN) प्रमाणित करण्यातत आलेल्या आहेत.

दावा क्र. 3 - कोरोना विषाणूचा पीएच (pH) 5.5 ते 8.5 असतो

भाभा अणुसंधान संशोधन केंद्रातील (निवृत्त) वैज्ञानिक डॉ. शरद काळे यांनी हा दावा असत्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “या पोस्टमध्ये देण्यात आलेली माहिती पूर्णतः अवैज्ञानिक आहे. कोरोना विषाणूचा पीएच 5.5 ते 8.5 पर्यंत असतो या वाक्याला शास्त्रीय भाषेत काहीच अर्थ नाही.”

पीएच मूल्य केवळ 0 ते 14 दरम्यान असते. परंतु, मेसेजमध्ये तर काही पदार्थांचे पीएच मूल्य 15 आणि 22 असे दिलेले. यावरून ही माहिती किती अशास्त्रीय आहे हे कळते. तसेच मेसेजमध्ये पदार्थांचे जे पीएच मूल्य दिले आहे तेसुद्धा चुकीचे आहेत.

डॉ. काळे म्हणाले की, अ‍ॅव्हाकॅडोचा पीएच 15.6 असतो असे सांगणारी व्यक्ती किती अशिक्षित आहे ते लक्षात येते. तुम्हाला ही फळे आणि पदार्थ खायचे असतील तर जरूर खा; पण त्याचा कोरोनाला मारक म्हणून तसा काहीही संबंध नाही हे लक्षात ठेवा. अशा अवैज्ञानिक गोष्टींवर विश्वास ठेवू नये.

दावा क्र. 4 - कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्याने कोरोना फुफ्फुसापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मरतो

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्पष्ट केले आहे की, लिंबू किंवा लिंबाच्या रसामुळे कोरोना विषाणू नष्टही होत नाही आणि लिंबाच्या रसाने कोरोना विषाणूला प्रतिबंध होत असल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही.

हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि द नॅशनल अकॅडमिक्स सायन्स ऑफ सायन्स इंजिनिअरिंग मेडिसिन यांच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार लिंबाचे घरगुती उपाय हे कोरोना विषाणूची लागण होण्यापासून प्रतिबंध करत नाही.

युरोन्यूजने विविध तज्ज्ञांशी चर्चा करून कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्याने कोरोनावर काही फरक पडत नसल्याचे सांगितले.

https://twitter.com/euronews/status/1246087966642053120

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेल्या मेसेजमधील माहिती चुकीची आणि निराधार आहे. वाचकांनी कोणत्याही असत्यापित व अनाधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्याशिवाय कोणताही घरगुती उपाय करू नये.

Avatar

Title:घरगुती ‘कोविड-19 मेडिकल किट’च्या त्या मेसेजवर विश्वास ठेवू नका; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False