
एका व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोरोना विषाणूचे pH (पीएच) मूल्य 5.5 ते 8.5 असते. त्यामुळे कोरोनाची लागण होऊ नये म्हणून या पातळीपेक्षा जास्त पीएच असणाऱ्या क्षारयुक्त पदार्थ खावेत, असा सल्ला देण्यात येत आहे. या मेसेजमध्ये किती तथ्य आहे, याची फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी विचारणा केली आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा मेसेज निराधार असल्याचे स्पष्ट झाले.
काय आहे पोस्टमध्ये?
व्हायरल मेसेजमध्ये म्हटले की, कोरोना विषाणूचे पीएच 5.5 ते 8.5 पर्यंत असते. कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी आपल्याला फक्त इतकेच पाहिजे आहे की आपण व्हायरसच्या वरील पीएच पातळीपेक्षा जास्त प्रमाणात क्षारीयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे. जसे की, लिंबू, चुना, अॅव्हाकॅडो, लसूण, आंबा, टेंजरिन, अननस, संत्री, पिवळ्या रंगाची फुले येणारी रानटी फुलझाडे आदींचे सेवन केल्याने कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक । फेसबुक
तथ्य पडताळणी
कोरोना विषाणूविषयी यापूर्वीदेखील अनेक खोटे औषधोपचारांचे तथ्य फॅक्ट क्रेसेंडोने समोर आणलेले आहेत. त्यामुळे सदरील मेसेजचीदेखील सत्य पडताळणी करणे गरजेचे आहे.
यासंदर्भात फॅक्ट क्रेसेंडोने जेव्हा भाभा अणुसंधान संशोधन केंद्रातील (निवृत्त) वैज्ञानिक डॉ. शरद काळे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी हा मेसेज निराधार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “या पोस्टमध्ये देण्यात आलेली माहिती पूर्णतः अवैज्ञानिक आहे. कोरोना विषाणूचा पीएच 5.5 ते 8.5 पर्यंत असतो या वाक्याला शास्त्रीय भाषेत काहीच अर्थ नाही.”
कोरोनाला पीएच नसतो
जागतिक आरोग्य संघटनेसोबत कार्यरत विषाणूशास्त्राचे तज्ज्ञ ओयेवाले टोमोरी यांच्यानुसार, कोरोनाला पीएच नसतो. डॉ. काळे यांनी सांगतिले की, कोरोना विषाणूला स्वतःची अशी जैविक यंत्रणा नसते. त्यामुळे कोरोनाचा अमुक इतका पीएच नसतो. त्यामुळे विषाणूंच्या पराभवासाठी विषाणूंच्या पीएच पातळीपेक्षा जास्त प्रमाणात क्षारयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे हे म्हणणे अगदी निरर्थक आहे.
पीएच म्हणजे काय?
‘पीएच’ला मराठीत सामू म्हणतात. पीएच हा आम्ल, आम्लारी आणि उदासीन या गुणधर्माशी निगडित आहे. याला अॅसिडिटीचा संकेतांक म्हणता येईल.
- 7 पेक्षा कमी pH – म्हणजे आम्लधर्मी (Acidic)
- 7 एवढा pH – म्हणजे उदासीन (Neutral)
- 7 पेक्षा जास्त pH – म्हणजे आम्लारिधर्मी (Alkaline)
पीएच या मोजणीची जी मर्यादा आहे ती 0 ते 14 अशी आहे. ‘पीएच’ची व्याख्या ही एखाद्या जलयुक्त द्रवासाठी केली गेली आहे. त्या द्रवात असलेल्या हायड्रोजन आयन्सच्या तीव्रतेवर आम्लता अवलंबून असते तर हायड्रोक्सिल आयन्सच्या तीव्रतेवर अल्कधर्मीय गुणधर्म अवलंबून असतात, असे डॉ. काळे यांनी सांगितले.

मेसेजमधील अशास्त्रीय माहिती
वरील माहितीवरून स्पष्ट आहे की, पीएच मूल्य केवळ 0 ते 14 दरम्यान असते. परंतु, मेसेजमध्ये तर काही पदार्थांचे पीएच मूल्य 15 आणि 22 असे दिलेले. यावरून ही माहिती किती अशास्त्रीय आहे हे कळते. तसेच मेसेजमध्ये पदार्थांचे जे पीएच मूल्य दिले आहे तेसुद्धा चुकीचे आहेत.
लिंबाच्या रसाचा पीएच 1 ते 1.5 या दरम्यान असतो. चुन्याचा पीएच 12 ते 13 असू शकतो आणि चुना शरीराला अगदी घातक आहे. तंबाखू खाणारी मंडळी चुना लावून ती खातात त्या चुन्यामुळे तोंडाला आतून अल्सर होतात आणि त्यातूनच तोंडाचा कर्करोग होतो.
डॉ. काळे म्हणतात की, अॅव्हाकॅडोचा पीएच 15.6 असतो असे सांगणारी व्यक्ती किती अशिक्षित आहे ते लक्षात येते. बाकीच्या पीएचबद्दल मी काही भाष्य करीत नाहीत पण ते सर्व चुकीचे आहेत हे नक्की. तुम्हाला ही फळे आणि पदार्थ खायचे असतील तर जरूर खा; पण त्याचा कोरोनाला मारक म्हणून तसा काहीही संबंध नाही हे लक्षात ठेवा. अशा अवैज्ञानिक गोष्टींवर विश्वास ठेवू नये.
निष्कर्ष
यावरून हे स्पष्ट होते की, कोरोना व्हायरसला पीएच नसतो. तसा सांगणारा मेसेज खोटा आहे. जास्त प्रमाणात क्षारयुक्त पदार्थ खाण्याचा दावा निरर्थक आहे. त्यामुळे अशा अवैज्ञानिक माहितीवर विश्वास ठेवू नये आणि तो समोर पाठवू पण नये.

Title:कोरोना विषाणूला pH मूल्य नसते. त्यामुळे जास्त प्रमाणात क्षारयुक्त पदार्थ खाण्याचा दावा निरर्थक आहे. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
