सचिन वाझे यांच्या घरातून जप्त केलेल्या अमाप संपत्तीचे हे आहेत का? वाचा सत्य

False राजकीय

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्या प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या चर्चेत आहेत. सोशल मीडियावर सोन्याचे दागिने, गोल्ड बिस्किटे आणि अमाप रोकड असलेले विविध फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, वाझे यांच्या फ्लॅटमधून अशी कोट्यावधींची संपत्ती जप्त करण्यात आली. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

आमच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. हे फोटो जुने असून, त्यांचा सचिन वाझे प्रकरणाशी काही संबंध नाही. 

काय आहे दावा?

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हायरल होत असलेल्या सगळ्या फोटोंना रिव्हर्स इमेजद्वारे सर्च केल्यावर कळाले की, हे सर्व फोटो वेगवेगळ्या घटनांचे आहेत. एका-एका फोटोचे सत्य आपण पाहुया.

फोटो क्र. 1

सत्य – हे सचिन वाझे यांचे घर नाही. हा फोटो तमिळनाडूमधील नेते स्टॅलिन यांचे जावई सबरीसन यांचे घर आहे.

संदर्भ – द हिंदू (2019)


फोटो क्र. 2

सत्य – हा फोटो कर्नाटकमधील हुबळी आणि चित्रदुर्ग जिल्हातील हवाला डीलरच्या घरांतून आयकर विभागाने धाड टाकून जप्त केलेल्या अवैध संपत्तीचा आहे. 2016 साली ही कारवाई करण्यात आली होती. 

संदर्भ – डेक्कन हेराल्ड (2016)


फोटो क्र. 3

सत्य –तेलंगणामधील खम्माम जिल्हातून अटक करण्यात आलेल्या पाच जणांच्या टोळीकडे सापडलेल्या नकली नोटांचा हा फोटो आहे. दोन हजाराच्या नोटा बदलून देण्याचे आमिष दाखवून ही टोळी लोकांची फसवणूक करायची. त्यांच्याकडून सुमारे साडेसहा कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.

संदर्भ – ANI (2019)


फोटो क्र. 4 

सत्य – आयकर विभागाने तमिळनाडूतील वेल्लोर येथून एका सिमेंट गोदामातून जप्त केलेल्या नोटांचा हा फोटो आहे. बॉक्स आणि गोण्यांमधून पैशांची तस्करी केली जायची.

संदर्भ – ANI (2019)


फोटो क्र. 5

सत्य – तमिळनाडूमधील एका बांधकाम व्यवसायिकाच्या विविध आस्थापनांतून आयकर विभागाने जप्त केलेल्या रोकड आणि सोन्याचा हा फोटो आहे. या कारवाईत सुमारे 163 कोटी रुपयांच्या नोटा आणि 100 किलोंची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली होती. 

संदर्भ – आऊटलूक (2018)

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सदरील व्हायरल फोटो सचिन वाझे यांच्या घरातून मिळालेल्या संपत्तीचे हे फोटो नाहीत. जुने आणि असंबंधित फोटो चुकीच्या माहितीसह शेअर केले जात आहेत.

Avatar

Title:सचिन वाझे यांच्या घरातून जप्त केलेल्या अमाप संपत्तीचे हे आहेत का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False