अमिताभ यांनी 40 वर्षांपासून काम करणाऱ्या नोकराला नाही तर, त्यांच्या सेक्रेटरीला खांदा दिला

Mixture सामाजिक

हिंदी सिनेमाचे महानायक म्हणून प्रसिद्ध असणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या माणुसकीची सध्या खूप प्रशंसा केली जात आहे. त्यांच्याकडे 40 वर्षे काम केलेल्या नोकराच्या पार्थिवाला अमिताभ आणि अभिषेक यांनी खांदा दिल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. सोबत खांदा दिल्याचा फोटोदेखील दिलेला आहे. इतकी वर्षे इमानेइतबारे काम करणाऱ्या नोकराप्रति अमिताभ यांची अशी कृतज्ञता नेटीझन्सला प्रचंड भावली. परंतु, काही युजर्सनी याविषयी शंकासुद्धा उपस्थित केली आहे. व्हायरल होत असेलेल्या या फोटोची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

फेसुबकवर शेयर होत असलेल्या पोस्टमधील फोटोत अमिताभ आणि अभिषेक बच्चन पार्थिव घेऊन जाताना दिसत आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले की, अमिताभजीकडे 40 वर्ष नोकरी करित असलेल्या नोकराचे निधन झाले. अभिषेक आणि अमिताभजी खांदा देताना, पैसा तर सर्वांकडेच असतो पण माणुसकी फार कमी लोकांकडे असते, Hats off to Amitabh ji

तथ्य पडताळणी

फोटोची शहानिशा करण्यासाठी गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून समोर आलेल्या विविध मीडिया वेबसाईट्च्या बातम्यानुसार, हा फोटो अमिताभ बच्चन यांचे दीर्घकाळ सेक्रेटरी राहिलेले शीतल जैन (77) यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीचा आहे. त्यांचे 8 जून 2019 रोजी मुंबईत निधन झाले होते. अमिताभ बच्चन यांचे तीन दशकांपेक्षा अधिक काळ सेक्रेटरी राहिलेले शीतल जैन चित्रपट निर्मातादेखील होते. त्यांनी अमिताभ आणि गोविंदाला घेऊन ‘बडे मियां छोटे मियां’ (1998) हा चित्रपट केला होता. 

मूळ बातमी येथे वाचा – दैनिक भास्करअर्काइव्ह

इंडियन एक्सप्रेस, इंडिया टुडे, इकोनॉमिक टाईम्स, मिड-डे यासह विविध वेबसाईट्सवरील बातम्यांमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, शीतल जैन हे अमिताभ यांचे सेक्रेटरी होते. तसेच ते चित्रपट निर्मातेदेखील होते. त्यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. विले पार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते. यावेळी अभिषेक आणि ऐश्वर्या रायदेखील उपस्थित होते. अनेक बॉलिवूड सेलेब्रेटिंनी शीतल जैन यांच्या निधनावर दुःख व्यक्त करणारे ट्विट केले.

विशेष म्हणजे व्हायरल होत असलेला फोटो स्वतः अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर 9 जून रोजी शेयर केला होता. शीतल जैन यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी लिहिले होते की, माझ्या चांगल्या आणि पडत्या दोन्ही काळातही माझ्यासोबत ठामपणे उभे राहणारे माझे सेक्रेटरी शीतल जैन यांचे निधन झाले आणि कुटुंबाचे सदस्य म्हणून 40 वर्षांच्या आठवणी जागृत झाल्या. अमिताभ यांनी पुढे म्हटले की, शीतल जैन हेच निर्मात्यांशी भेटून माझ्या चित्रपटांचे वेळापत्रक आणि इतर बाबी ठरवत. जेथे बच्चन कुटुंब हजर राहू शकत नसे, तेथे जैन हे प्रतिनिधी म्हणून जायचे. बच्चन कुटुंबाच्या विरोधात ते छोटी गोष्टदेखील सहन करीत नसे.

मूळ ब्लॉग येथे वाचा – अमिताभ बच्चन ब्लॉगअर्काइव्ह

स्वतः अमिताभ बच्चन यांनी शीतल जैन हे त्यांचे सेक्रेटरी/मॅनेजर होते, असे सांगितले आहे. यावरून हे तर सिद्ध होते की, ते नोकर किंवा घरकाम करणारे कर्मचारी नव्हते. विविध बॉलिवूड कलाकारांच्या ट्विटमध्येसुद्धा जैन यांचा अमिताभचे सेक्रेटरी म्हणूनच उल्लेख आहे. अनुपम खेर, सुभाष घई, अतुल मोहन यांचे ट्विट तुम्ही खाली पाहू शकता.

अर्काइव्ह

अर्काइव्ह

अर्काइव्ह

निष्कर्ष

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अमिताभ व अभिषेक बच्चन यांनी त्यांच्याकडे 40 वर्षे नोकरी केलेल्या नोकराच्या पार्थिवाला खांदा दिलेला नाही. अमिताभ यांचे सेक्रेटरी आणि मॅनेजर शीतल जैन यांना अमिताभ व अभिषेक यांनी खांदा दिला होता. त्यामुळे पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा खरा नाही आहे.

Avatar

Title:अमिताभ यांनी 40 वर्षांपासून काम करणाऱ्या नोकराला नाही तर, त्यांच्या सेक्रेटरीला खांदा दिला

Fact Check By: Mayur Deokar 

Result: Mixture