तुर्कीमध्ये फेब्रुवारी महिन्यात आलेल्या भीषण भूकंपामध्ये 50 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. एकामागून एक आलेल्या तीव्र हादऱ्यांमुळे हजारो इमारती कोसळल्या. 

सोशल मीडियावर आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सैनिक सामान्य लोकांना खुलेआम गोळ्या घालत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, तुर्कीमध्ये इमारतींमध्ये भूकंपविरोधक साहित्य वापरण्याऐवजी त्याजागी वाहनांचे टायर्स (चाक) वापरणाऱ्या भ्रष्ट बांधकाम व्यावसायिकांना तेथील सरकारने अशी कठोर शिक्षा दिली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. हा व्हिडिओ सिरियामध्ये 2013 साली झालेल्या नरसंहाराचा आहे.

काय आहे दावा?

साडेचार मिनिटांच्या व्हिडिओमध्ये गणवेशधारी सैनिक काही लोकांना त्यांचे हात व डोळे बांधून टायर्स असणाऱ्या खड्ड्यात ढकलताना दिसतात. त्याचवेळी ते या लोकांवर गोळीबारसुद्धा करतात.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “टर्कीमध्ये ज्या बिल्डर्सनी भूकंप विरोधकचे योग्य मटेरियल बिल्डिंगच्या पायात न घालता गाड्यांचे टायर वापरले व इमारती कोसळून लाखो जीव गेले त्या बिल्डर्सना ही शिक्षा दिली आहे.. टर्की सरकारने.”

(सूचनाः ही दृश्ये अत्यंत हिंसक असल्याने व्हिडिओऐवजी त्यातील स्क्रीनशॉट येथे देत आहोत)

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

या व्हिडिओतील कीफ्रेम्सना रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपाच्या आधीपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.

गार्डियन वृत्तपत्राच्या युट्यूब चॅनेलवर या व्हिडिओबद्दलची बातमी आढळली. त्यानुसार, हा व्हिडिओ सीरियामध्ये 2013 साली झालेल्या हत्याकांडांचा आहे.

सीरियाचे अध्यक्ष बशर-अल्-असद यांच्या सैन्याने दमास्कस शहराजवळील एका भागात 41 निष्पाप लोकांची अशी खुलेआम हत्या केली होती, असे या बातमीत म्हटले आहे.

मूळ व्हिडिओ येथे पाहा – गार्डियन युट्यूब 

हा धागा पकडून अधिक शोध घेतल्यावर कळाले की, असाद यांच्या सैन्यातील एका जवानानेच 2019 साली हा व्हिडिओ सीरिया युद्धाच्या अभ्यासकांना हा व्हिडिओ दिला होता. त्यानंतर 2022 साली प्रथमच तो सार्वजनिक करण्यात आला.

या व्हिडिओमधील पीडित व मारेकरी सैनिकांची ओळख पटविण्यात यश आलेले असून, या नरसंहाराला कारणीभूत सैन्य अधिकाऱ्याचे नाव अमजद युसूफ असल्याचे समोर आले.

युसूफने 16 एप्रिल 2013 रोजी Tadamon येथे 41 समान्य नागरिकांना गोळी मारून ठार केले होते. तसेच टायर जाळून त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली होती.

अमेरिकेनेसुद्धा या व्हिडिओची दखल घेत हत्याकांडासाठी दोषी असणाऱ्या युसूफ व त्याच्या कुटुंबावर बंदी घातली होती. या हत्याकांडाविषयी अधिक सखोल माहिती येथे वाचा आणि येथे पाहा.

मूळ नोटीस – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, नरसंहाराचा व्हिडिओ तुर्कीमधील नाही. हा व्हिडिओ सीरियामध्ये झालेल्या हत्याकांडाचा आहे. तुर्कीमध्ये भ्रष्ट बिल्डर्सना अशा प्रकारे खुलेआण गोळी मारून ठार मारण्याची शिक्षा देण्यात आलेली नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:तुर्कीमध्ये भूकंपानंतर भ्रष्ट बिल्डर्सना सरकारने खुलेआम गोळ्या घातल्या का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False