मणिपूरमधील सामूहिक बलात्कार प्रकरणात संघ कार्यकर्त्यांचे फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय

मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काडून सामूहिक अत्याचार केल्या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. 

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन कार्यकर्तांचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, त्यांपैकी एक जण मणिपूर महिला सामूहिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमधील संघाचा कार्यकर्ता आणि मणिपूर महिला सामूहिक अत्याचारातील आरोपी वेगवेगळे आहेत. 

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये तीन फोटो दिलेले आहेत. पहिल्या फोटोमध्ये महिलांची नग्न धिंड काडून सामूहिक अत्याचाऱ्याच्या व्हायरल व्हिडिओतील दृष्य आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये बीबीसीची बातमीतील पोलिसांनी अटक केलेल्या प्रमुख आरोपीचा फोटो आहे. तिसऱ्या फोटोमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दोन कार्यकर्ते दाखवले आहेत. 

हा फोटो शेअर करताना युजर्स लिहितात की, “मणिपुर मधला आरोपी RSS चा निघाला.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य वडताळणी

सर्व प्रथम व्हायरल फोटोमधील बीबीसीची बातमी तपासल्यावर त्यामध्ये ‘ मणिपूर महिला सामूहिक अत्याचाराचा मुख्य आरोपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरोपी आहे.’ असा उल्लेख कुठे ही आढळत नाही.

पुढे संघ कार्यकर्त्यांच्या फोटोला गुगल रिव्हर्स इमेजवर सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो चिदानंद सिंग या नावाच्या व्यक्तीने 16 ऑक्टोबर 2022 रोजी अपलोड केला होता.

हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलेल आहे की, “पथ संचलन, RSS इंफाळ जिल्हा, माझा मुलगा सचिनंदा आणि चुलत भाऊ अशोक यांच्यासोबत.”

अधिक माहिती घेतल्यावर कळाले की, व्हायरल होत असलेल्या बातमीवर चिदानंद सिंग यांनी ट्विटरवर प्रतिक्रीया दिली आहे.

ते लिहितात की, “तुम्ही लोक माझ्या मुलाचा फोटो का वापरता? मी अशा खोट्या बातम्यांचा प्रचार करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला चालवणार आहे. मी चिदानंद सिंग आणि माझे कुटुंबिय कधीही अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्यात सामील नव्हतो.”

पुढे ते लिहितात की, “कोणीही माझा आणि माझ्या मुलाचा फोटो वापरून माझ्या कुटुंबातील आरएसएसची प्रतिमा खराब करण्याचा हेतू साध्य करू शकत नाही. मी आणि माझ्या कुटुंबाने कधीही अशा गुन्ह्यात सहभाग घेतला नाही.”

अशा खोट्या बातम्यांचा प्रचार करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून चिदानंद सिंग यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोलिसांना दिलेली तक्रार अर्ज आणि एफआयआरची कॉपी शेअर केली आहे.

मुख्य आरोपी कोण ?

मणिपूर पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, व्हिडिओत पीडित महिलेला फरफटत ओढणाऱ्या व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आली आहे. त्याचे नाव हुइरेम हेरोदास मेईतेई (32) असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

खालील तुनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की,  व्हायरल फोटोमधील मणिपूर पोलिसांनी अटक केलेला आरोपी हुइरेम हेरोदास मेईतेई आणि आरएसएस कार्यकर्ता सचिनंदा हे दोन्ही वेगवेगळे व्यक्ती आहेत.

निष्कर्ष 

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोमधील आरोपी आणि संघाचा कार्यकर्ता हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मणिपूरमधील सामूहिक बलात्कार प्रकरणात संघ कार्यकर्त्यांचे फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: False