मेक्सिकोतील या नेत्याने संसदेतच कपडे का काढले होते? वाचा सत्य

Partly False आंतरराष्ट्रीय

कोरोनामुळे जगभरातील देशांमध्ये आर्थिक संकट कोसळले आहे. अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. जनतेच्या अशा बिकट परिस्थितीची सरकारला कथितरीत्या आठवण करून दिल्याबद्दल मेक्सिकोच्या एका नेत्याची सध्या सगळीकडे वाहवा होत आहे.

मेक्सिकोचे राजकीय नेते अँटोनियो कोनेयो यांनी सरकारचा भ्रष्टाचार आणि तसेच जनतेकडे दुर्लक्ष करण्याकडे लक्ष वेधण्यासाठी संसदेतेच कपडे काढून निषेध व्यक्त केला, असा दावा केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी हा दावा अर्धसत्य आढळला. 

काय आहे दावा?

संसदेत केवळ अंतर्वस्त्रामध्ये उभ्या एका व्यक्तीचा फोटो शेयर करून कॅप्शनमध्ये म्हटले की, मेक्सिकोच्या एका लोकप्रतिनिधीने संसदेत आपले कपडे काढले. तुम्हाला मला उघडं बघायची लाज वाटते पण रस्तावर उघडे-नागडे, भुकेले, नोकरी मागणाऱ्यांकडे बघून लाज वाटत नाही, त्यांचे पैसे आणि संपत्ती हिरावून सुद्धा’, असे म्हणत त्यांनी सरकारवर तिखट टीका केलीय.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम फोटोलो गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, सदरील व्यक्तीच मेक्सिकोमधील डेमोक्रॅटिक रिव्होल्यूशन पक्षाचे नेते अँटोनियो कोनेयो आहेत. त्यांनी मेक्सिकोच्या संसदेत 2013 साली केलेल्या भाषणादरम्यानचा हा फोटो आहे. 

‘इंडिया टुडे’ने 2013 साली दिलेल्या बातमीनुसार, मेक्सिकोच्या तत्कालिन सरकारने खासगी कंपन्यांना त्या देशातील तेल उपसा करण्याची परवानगी देण्यारे विधेयक संसदेत मांडले होते. त्यावर मतदान घेत असताना विरोधी पक्षात असणारे अँटोनियो यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला होता. आपला विरोध दर्शविण्यासाठी त्यांनी भाषणादरम्यान कपडे काढले होते. 

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडे

या बाबत अधिक शोध घेतल्यावर कळाले की, मेक्सिकोमध्ये त्या काळी 70 वर्षांनंतर खासगी कंपन्यांनी तशी परवानगी मिळाली होती. तोपर्यंत सर्व तेलसाठे सरकारच्या ताब्यात होते.

स्पॅनिष भाषेतील स्थानिक वेबसाईट El Comunista च्या बातमीनुसार, अँटोनियो यांचा खासगी कंपन्यांना विरोध होता. त्यामुळे आपल्या भाषणात ते म्हणाले होते की, “मेक्सिको सरकारने याआधी खासगी टेलिफोन कंपन्यांना परवानगी दिली होती. त्याचा देशाला काय फायदा झाला? उलट खासगीकरणामुळे देशाची लूटच झाली आहे.”

असे म्हणत असतानाच त्यांनी कपडे काढायला सुरूवात केली. “मला लाज नाही वाटतंय. कारण खासगी कंपन्या अशाचरितीने आपल्या देशाचे एक-एक स्रोत काढून घेऊन जात आहेत.”

मूळ बातमी – El Comunista

या भाषणामध्ये त्यांनी “तुम्हाला मला उघडं बघायची लाज वाटते पण रस्तावर उघडे-नागडे, भुकेले, नोकरी मागणाऱ्यांकडे बघून लाज वाटत नाही या अर्थाचे विधान केले नव्हते. 

त्यांच्या विरोधाचा सूर केवळ खासगी तेल कंपन्यांना उपसा करण्याची परवानगी देण्यासंदर्भात होता. त्याचा आजच्या काळातील बेरोजगारी किंवा मेक्सिकोच्या भ्रष्टाचाराशी जोडणे चुकीचे आहे.

‘बीबीसी’नेदेखील या भाषणाची बातमी केली होती. त्यामध्येसुद्धा कुठेही सध्या व्हायरल होत असलेले दावा आढळत नाही. 

अँटोनियो यांचे संपूर्ण भाषण तुम्ही येथे पाहू शकता. 11:35 मिनिटांपासून ते कपडे काढायला सुरुवात करतात.

निष्कर्ष

मेक्सिकोच्या नेत्याचा तो फोटो 2013 सालातील आहे. त्याचा सध्याच्या परिस्थितीशी संबंध नाही. तसेच या व्यक्तीचे नाव अँटोनियो कोनेयो आहे. त्यांनी खासगी कंपन्यांना तेल उपसा करण्याची परवानगी देण्याला विरोध म्हणून कपडे काढून निषेध व्यक्त केला होता. परंतु, त्यांच्य फोटोसोबत चुकीचे विधान जोडून संभ्रम पसरविला जात आहे. 

Avatar

Title:मेक्सिकोतील या नेत्याने संसदेतच कपडे का काढले होते? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Partly False