
सोशल मीडियावर अधूनमधून पोलिसांच्या नावे चेतावणी देणारा मेसेज फिरत असतो. सध्या अत्तर विकण्याच्या नावाखली लुटमार आणि अपहरण होण्याच्या धोक्याबद्दल सावधान करणारा मेसेज नेटीझन्सना काळजीत पाडत आहे. मुंबई पोलीस उपाधीक्षकांच्या नावे फिरणाऱ्या या मेसेजमध्ये चेतावणी देण्यात येत आहे की, मॉलच्या पार्किंगमध्ये अत्तर विक्रेते ग्राहकांना पेपर ड्रग्जद्वारे बेशुद्ध करून लुटमार किंवा अपहरण करू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून सावधान राहावे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअॅपवर (9049043487) हा मेसेज पाठवून याची तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक
काय आहे पोस्टमध्ये?
प्रिय मित्रांनो,
कृपया लक्षात घ्या की एखाद्याने तुम्हाला मॉलच्या पार्किंगमध्ये किंवा इतर कोठे थांबवले आहे आणि काही अत्तरमध्ये आपल्याला रस आहे का आणि आपल्याला वास घेण्यास कागद दिल्यास घेऊ नका, याचा वास येत नाही. हा एक नवीन घोटाळा आहे, ते लोक पेपर ड्रग्जसह सज्ज आहते. आपण तेथुन निघून जा. ते आपले अपहरण करू शकतील, लुटतील किंवा वाईट गोष्टी करतील.
हे 3 पेक्षा जास्त नामांकित मॉल्समध्ये घडले. आणि 7 हून अधिक मुली बेपत्ता आहेत.
कृपया सर्व मित्रांना आणि कुटुंबात अग्रेषित करा. कृपया आयुष्य वाचवा. वरिष्ठ पोलिस अधिकार्याकडून हे प्राप्त झाले आहे, नोंद घ्या आणि आपण संरक्षित करू इच्छित असलेल्या प्रत्येकास सूचना द्या.
के. आर. नागराजू
डीसीपी गुन्हे शाखा, मुंबई
तथ्य पडताळणी
मेसेजमध्ये मुंबईतील गुन्हे शाखेचे डीसीपी म्हणून के. आर. नागराजू यांचे नाव दिले आहे. मुंबई पोलिसांच्या वेबसाईटवर तपास केल्यावर समोर आले की, मुंबईत के. आर. नागराजू नावाचे कोणीच उपाधीक्षक (डीसीपी) नाही.
पोस्टमधील दाव्याची पडताळणी केली असता कळाले की, हा दावा अगदी दोन दशकापासून इंटरनेटवर केला जात आहे. स्नोप्स नावाच्या वेबसाईटवरील 1 मार्च 2000 रोजीच्या लेखानुसार, अमेरिकेतील अल्बामा येथील बर्था जॉन्सन या महिलेने दावा केला होता की, 8 नोव्हेंबर 1999 रोजी मॉलच्या पार्किगमध्ये स्वस्तात पर्फ्युम विकणाऱ्याने तिला अत्तराचा वास देऊन बेशुबद्ध केले आणि 800 डॉलर्स लुटले. परंतु, पोलिसांना यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. तसेच जॉन्सन यांची वैद्यकीय तपासणी केल्यावरदेखील त्यांनी अत्तरामुळे बेशुद्ध झाल्याच्या खुणा आढळल्या नाही.

तेव्हापासून, हा मेसेज वेगवेगळ्या नावाने पसरविला जात आहे. भारतातही अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील पोलिसांच्या नावे फिरत आहे. मेसेजमध्ये “3 पेक्षा जास्त नामांकित मॉल्समध्ये घडले. आणि 7 हून अधिक मुली बेपत्ता आहेत” असे म्हटले आहे. असे झाले असेल तर नक्कीच बातमी झाली असणारा.
गुगलवर शोध घेतला असता मॉलमध्ये अत्तराचा वास देऊन लुटमार किंवा मुलींचे अपहरण झाल्याचे कोणतीही बातमी आढळली नाही. सात मुली बेपत्ता झाल्या आणि बातमी नाही, असे होऊ शकत नाही. इंग्रजीमध्ये या अफवेला द नॉकआउट पर्म्युम असे नाव आहे.
केरळ पोलिसांच्या नावेदेखील हा मेसेज केरळमध्ये फिरत होतो. फॅक्ट क्रेसेंडो मल्याळमने केरळ पोलिसांशी बोलून हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले होते.
मग के. आर. नागराजू कोण आहेत?
के. आर. नागराजू हे सध्या तेलंगणा राज्यातील वारंगल (पूर्व) येथे डीसीपी आहेत. तेलंगणा टुडेनुसार, 27 मार्च 2019 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. पूर्वी ते रचाकोन्डा येथे डीसीपी होते. नागराजू यांच्या नावे हा मेसेज काही महिन्यांपासून फिरत आहे. बँगलोर मिरर या वर्तमानपत्राशी बोलताना नागराजू यांनी हा मेसेज पूर्णतः बनावट असल्याचे सांगतिले. एवढेच नाही तर, हा खोटो मेसेज पसरवून भीती निर्माण केल्याबद्दल त्यांनी तक्रारदेखील दाखल केली आहे.

मूळ बातमी येथे वाचा – बँगलोर टाईम्स । अर्काइव्ह
फॅक्ट क्रेसेंडोने वारंगल (पूर्व) डीसीपी के. आर. नागराजू यांच्या कार्यालयाशी संपर्क केला असता, त्यांनी हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले.
निष्कर्ष
मॉलच्या पार्किंगमध्ये सेंटचे सॅम्पल देऊन लुटमार आणि अपहरण होत असल्याची चेतावणी खोटी आहे. मुंबई पोलिस किंवा तेलंगणातील डीपीसी के. आर. नागराजू यांच्या नावे केला फिरवला जाणारा हा मेसेज खोटा आहे.

Title:सेंटचे सॅम्पल देऊन अपहरण होत असल्याची मुंबई पोलिसांनी चेतावणी जाहीर केली का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
