साप व विंचूच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास महाराष्ट्र शासन 10 लाख रुपये नुकसान भरपाई देत नाही. वाचा सत्य

Mixture सामाजिक

पावसाळ्यात सापांचा उघड्यावरील वावर वाढतो. या काळात ग्रामीण भागात सर्पदर्शन होणे सामान्य बाब असते. सर्पदंशामुळे मृत्यू होण्याचेही प्रमाणही ग्रामीण भागात अधिक आहे. तसेच वन्यप्राण्यांचाही धोका असतो. असा प्रसंग ओढावला तर शासनाकडे मदत मिळत असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये दावा केला जात आहे की, साप, विंचु, वाघ आणि अस्वत ई. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई म्हणून दहा लाख रुपये देण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. या मेसेजची तथ्य पडताळणी करण्याची विनंत फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉटस्अ‍ॅपवर (9049043487) केली आहे.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । अर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुकवर फिरत असलेल्या पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, साप , विंचू ,वाघ, अस्वल इ. जंगली जनावरांमुळे मृत्यु आल्यास रूपये 10 लाख नुकसान भरपाई शासन निर्णय. ग्रामीण भागात माहिती प्रसारित करा. पुरावा म्हणून सोबत शासन निर्णयाचे (जीआर) फोटोसुद्धा शेयर केले आहेत.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम पोस्टमध्ये दिलेल्या शासन निर्णयाच्या प्रतीचे अध्ययन केले. यातून एक वैशिष्ट्यपूर्ण तथ्य समोर येते. सदरील शासन निर्णयामध्ये साप आणि विंचु यांचा वन्यप्राणी म्हणून समावेश करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर संबंधित शासन निर्णयाचा शोध घेतल्यावर वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी व पशुधन मृत/अपंग/जखमी झाल्यास द्यावयाच्या अर्थसहाय्यमध्ये वाढ करण्याबाबतचा 11 जुलै 2018 रोजी जाहीर करण्यात आलेला जीआर आढळला.

या जीआरनुसार, वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे (ढोल) यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य हानी व पशुधनाचा मृत्यू झाल्यास शासनातर्फे अर्थसहाय्य पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर उल्लेख केलेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास  10 लाख रुपये, कायम अंपगत्व आल्यास 5 लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास सव्वालाख रुपये आर्थिक मदत देण्याची तरतुद करण्यात आली होती. 

मूळ जीआर येथे वाचा – शासन निर्णय (जुलै 18)

जीआरमध्ये साप किंवा विंचू चावल्यामुळे व्यक्ती किंवा पशुधनाचा मृत्यू झाल्यास आर्थिक मदत करण्याची कोणतीही तरतुद करण्यात आलेली नाही. 

विशेष म्हणजे 28 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्र शासनाने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्य रकमेत पाच लाखांची वाढ केली. नव्या जीआरनुसार, वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे (ढोल) यांच्या हल्ल्यात मृत्यु झाल्यास दहाऐवजी 15 लाख रुपयांची मदत दिली जाते. या जीआरमध्येसुद्धा साप आणि विंचूचा उल्लेख करण्यात आलेला नाही. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः ट्विट करून याविषयी माहिती दिली होती. ते ट्विट तुम्ही खाली पाहू शकता

अर्काइव्ह

आमदार बच्चू कडू यांनी 11 जुलै 2018 रोजी विधानसभेत सापाला वन्य जीव ठरवून सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती. त्याचा व्हिडियो तुम्ही येथे पाहू शकता. शासनाने 11 जुलै 2018 रोजी वन्यप्राणी हल्ल्याची नुकसान भरपाई 8 वरून 10 लाख करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या बातमीमध्येसुद्धा शासनाने सापाचा वन्यप्राण्यांमध्ये समावेश केला नसल्याचे म्हटले आहे. सर्प दंशामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांनाही सरकारने आर्थिक मदत करावी, या सर्प मित्र संघटना आणि विविध प्राणिप्रेमी संघटनांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचेही बातमीत नमूद करण्यात आले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स

महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये आमदार बच्चू कडू यांनी 9 एप्रिल 2015 रोजी तारांकित प्रश्न उपस्थित करून सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने कोणती पाऊले उचलली आहेत याची माहिती विचारली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले होते की, साप चावून मृत्यू झाल्या शासनाकडून आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. त्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही सुरू आहे. परंतु, शासनाने अद्याप सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास आर्थिक मदत करण्याची कोणतीही तरतूद केलेली नाही.

मूळ दस्तऐवज येथे वाचा – तारांकित प्रश्नोत्तर 2015

सापाला वन्य जीव घोषित करण्यासंबंधी 2010 पासून मागणी होत आहे. वन्यजीव मंडळाने 2012 साली झालेल्या बैठकीत सर्पदंश मृत्यूच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव फेटाळला होता. साप हा प्राणी शहर व ग्रामीण भाग आणि शेतात आढळतो. साप चावल्यामुळे किती लोकांचा मृत्यू झाला याची कोणतीही निश्चित आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नाही. अशी माहिती गोळा करण्यासाठी वन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळसुद्धा नाही. त्यामुळे अशा प्रकरणांचे नियोजन करणे शक्य होणार नाही, असे प्रस्ताव फेटाळण्यामागे कारण देण्यात आले होते. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली होती.


मूळ दस्तऐवज येथे वाचा – वन्यजीव मंडळ बैठकीचा कार्यवृत्तांत (2012)

फॅक्ट क्रेसेंडोने महसूल व वन विभागातील सह-सचिव (वने) सुजय दोडल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी माहिती दिली की, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्यास राज्य शासनाकडून 15 लाख रुपयांची मदत करण्यात येते. यामध्ये वन्यप्राणी म्हणून वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे (ढोल) या 11 प्राण्यांचा समावेश आहे. सर्प किंवा विंचू दंशामुळे होणाऱ्या मृत्यूसाठी शासनातर्फे आर्थिक मदत करण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

निष्कर्ष

महाराष्ट्र शासनातर्फे साप किंवा विंचू चावल्यामुळे मृत्यू झाल्यास कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही. केवळ वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे (ढोल) या प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यास 15 लाख रुपायंची आर्थिक मदत करण्यात येते. त्यामुळे सदरील पोस्टमध्ये अर्थसत्य माहिती देण्यात आली आहे.

Avatar

Title:साप व विंचूच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास महाराष्ट्र शासन 10 रुपये नुकसान भरपाई देत नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Mixture