
सोशल मीडियावर एका बालगायकाचा व्हिडियो कौतुकाच विषय ठरत आहे. वडिलांविषयी गाणे गाणाऱ्या या मुलाचे वडिल दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले आणि ही बातमी ऐकून त्याच्या आईचासुद्धा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने हे गाणे गायिले, असा दावा फेसबुकवरील पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडियो हजारो लोकांनी पाहिला असून, या छोट्या मुलाच्या धाडस आणि आवाजाची प्रशंसा केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.
मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
टकाटक- फिल्मी पेज नावाच्या फेसबुक पेजने 26 जून रोजी 4.33 मिनिटांचा हा व्हिडियो शेयर केला आहे. यामध्ये एक लहान मुलगा “बाबा मेरे प्यारे बाब” हे वडिलांविषयीचे हृदयस्पर्शी गाणे गायिले आहे. व्हिडियोसोबत कॅप्शन दिले आहे की, हा एका आर्मी ऑफिसरचा मुलगा आहे याचे वडील मिलिटंट बरोबर झालेल्या चकमकीत शहिद झाले आणि ती बातमी ऐकून या मुलाच्या आईचे ही दुःखद निधन झाले. आता हा मुलगा आर्मी च्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे त्याने आई आणि बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे गीत गायले. यांच्या धाडसासाठी कौतुक म्हणून एक शेयर झाला पाहिजे.
काय आहे पोस्टमध्ये?
तथ्य पडताळणी
व्हिडियोची सतत्या तपासण्यासाठी या व्हिडियोतील एक फ्रेम निवडून यांडेक्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून पाकिस्तानातील दुनिया न्यूज चॅनेलने 2015 साली युट्यूबवर अपलोड केलेला हा व्हिडियो आढळला. Baba Meray Pyaray Baba – Tribute to APS Martyrs नावाच्या या व्हिडियोला आतापर्यंत 41 लाख व्ह्युव्ज आहेत. यामध्ये लिहिले आहे की, पेशावरच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या विद्यार्थ्याच्या सन्मानार्थ आयोजित कार्याक्रमात या मुलाने हे गाणे गायिले. ते तुम्ही खाली पाहू शकता.
यासंबंधी अधिक शोध घेतला असता, पाकिस्तानातील जिओ टीव्ही वेबसाईटवरील एक बातमी सापडली. बातमीत म्हटले आहे की, पाकिस्तानातील पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात या मुलाने हे हृदयस्पर्शी गाणे गायिले. या कार्यक्रमातील व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला. 16 डिसेंबर 2014 साली झालेल्या हल्ल्यात 132 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. जिओ टीव्हीच्या फेसबुक पेजवरूनदेखील हा व्हिडियो शेयर करण्यात आला होता. तो तुम्ही येथे पाहू शकता.

मूळ बातमी येथे वाचा – जिओ टीव्ही । अर्काइव्ह
समा टीव्ही वेबसाईटवरील बातमी आढळली. त्यामध्ये या मुलाचे नाव गुलाम मुर्तझा असे सांगितले आहे. लाहोर येथे 2015 साली झालेल्या स्मृतिकार्यक्रमात त्याने हे गाणे गायले होते. गुलाम मुर्तझा याने त्याच्या वडिलांसोबत गाणे गायिल्याचे बातमीत म्हटले आहे. पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कूलचा शॉर्ट फॉर्म APS आहे.

मूळ बातमी येथे वाचा – समा टीव्ही
आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून शोध घेतला असता गुलाम मुर्तझा आणि त्याचे वडिल नदीम अब्बास यांचे फेसबुक अकाउंट मिळाले. यामध्ये त्याने विविध ठिकाणी गायिलेल्या कर्याक्रमांचे फोटो शेयर केलेले आहेत. येथील माहितीनुसार, गुलाम मुर्तझाचे वडिल नदीम अब्बास हे गायक असून, त्याचे आजोबासुद्धा गायक आहेत. मुर्तझा लहानपणापासूनच गाणे शिकत आहे. 17 डिसेंबर 2015 रोजी झालेल्या या कार्यक्रमातील व्हिडियो नदीम अब्बास यांनी शेयर केलेला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये त्यांनी लिहिले की, मी, माझा मुलगा आणि माझे वडिल – आम्ही हमजा शबाझ शरीफ यांच्यासमोर गाणे गायिले.
सोशल मीडियावर गुलाम मुर्तझाचे हे गाणे व्हायरल होऊ लागल्यानंतर या व्हिडियोसोबत विविध दावे करण्यात येऊ लागले. शहिद झालेल्या सैन्य अधिकाऱ्याच्या मुलाचे गाणे म्हणून व्हिडियो पसरू लागला. भारतातील अनेकांनी हा व्हिडियो भारतीय सैन्य अधिकाऱ्याचा मुलगा म्हणून शेयर केला. याची माहिती मिळताच गुलाम मुर्तझाच्या अकाउंटवरून खुलासा करण्यात आला. त्याने लिहिले की, माझे वडिल जिवंत असून, ते एक उत्तम गायक आहेत. त्यांचे नाव नदीम अब्बास आहे. माझे वडिल सैन्य अधिकारी नाहीत (पण ते माझ्यासाठी सैनिकापेक्षा कमीसुद्धा नाहीत). या व्हिडियोमध्ये मी माझे वडिल आणि आजोबा यांच्यासोबत गाणे गायिले आहे. सर्वांना माझी विनंती आहे की, सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवू नका.
निष्कर्ष
सदरील व्हिडियोतील मुलगा शहीद झालेल्या सैन्य अधिकाऱ्याचा नाही. त्याचे नाव गुलाम मुर्तझा असून तो पाकिस्तानात राहतो. त्याच्या वडिलांचे नाव नदीम अब्बास असून तेसुद्धा या व्हिडियोत त्याच्यासोबत गाणे गात आहेत. पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 2015 साली आयोजित कार्यक्रमातील हा व्हिडियो आहे. त्यामुळे सदरील पोस्ट असत्य आहे.

Title:VIDEO: हा शहीद आर्मी ऑफिसरचा मुलगा नाही. हा तर पाकिस्तानातील एक बालगायक आहे
Fact Check By: Agastya DeokarResult: False
