ही मुलगी हिंदू नाव लावणारी मुस्लिम बांग्लादेशी नाही. तिचे खरंच नाव स्वाती आहे. वाचा सत्य

False सामाजिक

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून (CAA) सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनाचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत. अशाच एका आंदोलनात सहभागी मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेयर करून दावा केला जात आहे की, “स्वाती” नामक ही मुलगी मूळात सबिहा खान नामक बांग्लादेशी मुस्लिम आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला.

काय आहे दावा?

हातात CAA विरोधातील पोस्टर घेतलेली “स्वाती” नामक मुलगी आणि सबिहा खान नामक एका मुलीचा फोटो पोस्टमध्ये दिला आहे. पोस्टकर्त्याने लिहिले की, ही फोटो घेतलेली स्वतःचं नाव स्वाती सांगून मी हिंदू आहे अन हिंदुत्वाला विरोध करते असा बोर्ड घेऊन फोटो काढणारी मुलगी मुस्लिम आहे हीच नाव सबिहा खान असून बहुतेक ती बांग्लादेशी आहे.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक

तथ्य पडताळणी

सदरील फोटोतील मुलीचा फोटो यापूर्वीदेखील सबिहा खान म्हणून पसरविण्यात आला होता. झारखंडमधील तबरेज अन्सारीच्या हत्येच्या विरोधात दिल्लीमध्ये जुलै महिन्यातील आंदोलनात सहभागी झालेल्या स्वाती नामक या मुलीचे फोटो सबीहा खान म्हणूनच व्हायरल करण्यात आले. फॅक्ट क्रेसेंडो हिंदीने तेव्हा हा दावा खोटा सिद्ध केला होता. आता स्वाती यांचा CAA विरोधातील आंदोलनाचा फोटो सबीहा खान म्हणून फिरवला जात आहे. 

कोण आहे स्वाती?

फॅक्ट क्रेसेंडो मराठीने स्वाती यांच्याशी थेट संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती या दिल्ली विद्यापीठामध्ये विधीचे (लॉ) शिक्षण घेतात. सध्या त्या शेवटच्या वर्षात आहेत. यापूर्वी त्यांनी दिल्लीच्याच गार्गी महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातून पदवी संपादन केलेली आहे.

फॅक्ट क्रेसेंडो मराठीशी बोलताना त्यांनी सोशल मीडियावर केले जाणारे दावे पूर्णतः खोटे असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, मी मुस्लिम नाही. माझा जन्म हिंदू पंजाबी कुटुंबात झाला आहे. सोशल मीडियावर माझा फोटो सबिहा खान यांच्याशी चुकीच्या पद्धतीने जोडण्यात येतो. मी सबिहा खान नाही. ते दोन्ही फोटो वेगवेगळे आहेत. त्यामुळे कोणीही अफवा पसरवून नये.

स्वाती यांनी ऑक्टोबर महिन्यातदेखील केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारवर तीव्र टीका केली होती. त्यावेळी देखील त्यांचा व्हिडियो व्हायरल झाला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. एचएनपी न्यूज युट्युब चॅनेलवरील या व्हिडियोमध्ये स्वाती यांना दिल्ली विद्यापीठातील लॉ स्टुडेंट म्हटलेले आहे.

स्वाती यांनी त्यांच्या कुटुंबाचा इतिहास आणि त्यांच्या CAA विरोधामागची भूमिका स्पष्ट केलेली आहे. ते तुम्ही बियाँड हेडलाईन्स वेबसाईटवर वाचू शकता. यामध्येसुद्धा त्यांनी त्या हिंदू पंजाबी कुटुंबातून आल्याचे सांगतात. 

जुलै महिन्यात सर्वप्रथम स्वाती यांचे नाव सबिहा खान यांच्याशी जोडून फोटो पसरविण्यात येऊ लागले. याविरोधात त्यांनी दिल्ली पोलिसांकडे रितसर तक्रारदेखील केली होती. त्याची एक प्रत फॅक्ट क्रेसेंडोकडे आहे. यावरून स्पष्ट होते की, CAA आंदोलक मुलीचे नाव स्वातीच असून, ती मुस्लिम नाही.

मग सबिहा खान कोण आहेत? त्या बांग्लादेशी आहेत का?

सबिहा आरिफ खान एमआयएम पक्षाच्या मुंबईस्थित सदस्या आहेत. त्यांनी मुंबईतील वॉर्ड क्र. 63 येथून 2017 साली महानगरपालिकेची निवडणूक लढविली होती. त्यांच्या फेसबुक पेजवरून 27 जून रोजी त्यांनी स्वाती यांचा फोटो शेयर केला होता. यावरून अनेकांनी सबिहा खान यांनाच स्वाती समजून त्यांच्याविषयी दुष्प्रचार केला. सबिहा खान भारतीय मुस्लिम आहेत. त्या बांग्लादेशी नाहीत. तसेच स्वाती आणि सबिहा या एक नाहीत. दोघांच्या आवाजाची तुलना आपण खाली पाहू शकता. 

निष्कर्ष

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करणारी “स्वाती” नामक ही मुलगी मूळात सबिहा खान नामक बांग्लादेशी मुस्लिम नाही. तिचे खरं नाव स्वातीच असून, ती दिल्ली येथील लॉ शाखेची विद्यार्थिनी आहे. सबिहा खान मुंबईतील एमआयएम सदस्य असून, भारतीय मुस्लिम आहे. त्या दोघी वेगवेगळ्या आहेत. 

Avatar

Title:ही मुलगी हिंदू नाव लावणारी मुस्लिम बांग्लादेशी नाही. तिचे खरंच नाव स्वाती आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False