महाराष्ट्र निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची शिफारस केलेली नाही. वाचा सत्य

False राजकीय

देशात ईव्हीएमऐवजी पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी विरोधी पक्ष वारंवार करीत असतात. त्यासाठी ईव्हीएम हॅक होण्याची किंवा ते सेट करण्याची भीती व्यक्त करीत करण्यात येते. लोकसभेनंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या या मागणीला महाराष्ट्र निवडणूक आयोगाची साथ मिळाल्याचे सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टवरून दिसते. दावा करण्यात येत आहे की, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी केंद्राला पत्र पाठवून आगामी निवडणुका बलेट पेपरवर घेण्याची शिफारस केली. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुकफेसबुक 

काय आहे पोस्टमध्ये?

विविध युजर्सने शेयर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, मोठी बातमी…महाराष्ट्र निवडणूक आयोगाची केंद्राला शिफारसनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्यामहाराष्ट्रतील निवडणूक आयोगाकडून केंद्राला पत्रएव्हीएममध्ये व्यक्त केली जातेय शंकाकाँग्रेसच्या निवेदनाचा दिला दाखला.”

सोबत पुरावा म्हणून राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी 20 जुलै 2019 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अंडर सेक्रेटरी यांना पाठवलेल्या पत्राची प्रत दिलेली आहे.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम गुगलवर यासंबंधी बातमी शोधली. विविध पक्षांनी निवडणूक आयोगाकडे बॅलेट पेपरचा वापर करण्याची मागणी केल्याच्या अनेक बातम्या आढळल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलिकडेच ईव्हीएमच्या मुद्याबाबत दिल्लीय येथे निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. परंतु, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने अशी काही शिफारस केल्याचे वृत्त काही सापडले नाही.

पोस्टमध्ये दिलेल्या पत्राचे बारकाईने वाचन केल्यास कळते की, या पत्रामध्ये अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी बॅलेट पेपरची शिफारस केलेली नाही. काँग्रेसने यासंदर्भात दिलेले निवेदन त्यांनी दिल्लीला पाठवले आहे. पत्रातील मजकूर थोडक्यात असाः

विषयः महाराष्ट्र पद्रेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यातर्फे निवेदन

महोदय,

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य अ‍ॅड. जिमी गोंझाल्विस यांनी 30 मे 2019 रोजी दिलेले निवेदन येथे सादर करण्यात येत आहे. या निवेदनातील मजकूर असा आहे: 17वी लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राविषयी शंका निर्माण झाली आहे. निवडणुकांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांचा विचार केला असता, मी (अ‍ॅड. जिमी गोंझाल्विस) एक भारतीय नागरिक आणि मतदार या नात्याने विनंती करतो की, आगामी निवडणुका बलेट पेपरच्या साह्याने घ्याव्यात. माझी (अ‍ॅड. जिमी गोंझाल्विस) ही मागणी भारतीय निवडणूक आयोगापर्यंत पोहचविण्यात यावी आणि आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरद्वारे घेण्याचा आदेश देण्यात यावा.

आपला विनम्र,

दिलीप शिंदे, 

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

यावरून कळते की, या पत्रात काँग्रेसच्या सदस्याने बॅलेट पेपरची मागणी केली आहे. ती मागणी दिलीप शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पाठविली.

फॅक्ट क्रेसेंडोने मग थेट दिलीप शिंदे यांच्याशी संपर्क साधला. आमच्याशी बोलताना त्यांनी सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट खोट्या असल्याचे स्पष्ट केले. 

ते म्हणाले की, “मी किंवा महाराष्ट्र निवडणूक आयोगाने आगामी निवडणूका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची शिफारस केलेली नाही. महाराष्ट्र पद्रेश काँग्रेस कमिटीच्या सदस्याकडून प्राप्त निवेदन मी दिल्लीला पाठविले. मूळ निवेदन मराठीत असल्याने त्यामधील मजकूर इंग्रजीत भाषांतरित करून हे पत्र पाठविण्यात आले होते. हा स्टँडर्ड प्रोसिजरचा भाग आहे. याचा अर्थ असा होत नाही की, मी बॅलेट पेपरची शिफारस केली.

निष्कर्ष

महाराष्ट्र निवणूक आयोग किंवा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी ईव्हीएमला विरोध करीत आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची शिफारस केलेली नाही. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांच्या नावे फिरणारा मेसेज खोटा आहे. त्यांनी प्रक्रियेचा भाग म्हणून काँग्रेसचे निवेदन निवडणूक आयोगाला पाठविले होते.

Avatar

Title:महाराष्ट्र निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची शिफारस केलेली नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False