
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली. यानंतर हॉस्पिटलमध्ये पायाला प्लॅस्टर लावल्याचा फोटोही मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. परंतु, आता ममता बॅनर्जी व्हीलचेअरवर बसल्याचा फोटो शेअर होत आहे ज्यामध्ये त्यांच्या उजव्या पायाला प्लॅस्टर दिसते. यावरून ममता बॅनर्जी दुखापतीचे नाटक करीत असल्याची शंका घेण्यात येत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून त्यांच्या सत्यतेबाबत विचारणा केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हीलचेअरवरचा फोटो मिरर इमेज आहे – म्हणजेच मूळ फोटोला उलटे करून दाखवल्यामुळे डावा पाय उजवा दिसतो.
काय आहे दावा
ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयात डाव्या पायाला प्लॅस्टर असलेला फोटो आणि प्रचारादरम्यान व्हीलचेअरवर उजव्या पायाला प्लॅस्टर असलेला फोटो शेअर केला जात आहे. हे दोन्ही फोटो शेअर करीत ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीवर संशय व्यक्त केला जात आहे.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम आम्ही ममता बॅनर्जी यांच्या कोणत्या पायाला लागले आहे याचा शोध घेतला. त्यनुसार मिंट आणि एएनआय या वेबसाईटवरील फोटो आढळले. सोबत दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे.
त्यानंतर दुसऱ्या फोटोचा शोध घेतला. त्यानुसार ममता बॅनर्जी यांचे प्रचारदरम्यानचे काही फोटो आढळले. त्यातील न्युज 18 बांगल यांच्या वेबसाईटवर व्हीलचेअरवरील मूळ फोटो आढळला.
या फोटोमध्ये ममता बॅर्नजी यांच्या डाव्या पायालाच प्लॅस्टर दिसते.
मग व्हायरल फोटोमध्ये उजव्या पायाला प्लॅस्टर कसे दिसते?
उत्तर आहे – मिरर इमेज
ममता बॅनर्जी यांच्या व्हीलचेअरवरील फोटोलो मिरर इमेज करून पसरविण्यात येत आहे.
मिरर इमेज म्हणजे आरशामध्ये जशी प्रतीकृती उमटते तशी. यामध्ये उजवी बाजू डावी होते आणि डावी बाजू उजवी. अक्षरेसुद्धा उलटी दिसू लागतात.
मूळ फोटो आणि व्हायरल इमेज यांची तुलना केल्यावर हा फरक लगेच लक्षात येईल.
ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअर वरूनच 14 मार्च 2021 रोजी प्रचाररॅली घेतली. नंदिग्राम दिवसानिमित्त पश्चीम बंगालमध्ये आयोजित पदयात्रेत त्या सहभागी झाल्या होत्या.
एबीपी न्युज वाहिनीवरील या प्रेक्षपणात स्पष्ट दिसते की, बॅनर्जी यांच्या डाव्या पायालाच दुखापत आहे.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, ममता बॅनर्जी यांच्या उजव्या पायाला प्लॅस्टर असलेला फोटो खऱ्या फोटोचे मिरर इमेज आहे. त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे.

Title:ममता बॅनर्जी यांच्या कोणत्या पायाला दुखापत झाली? डाव्या की उजव्या?
Fact Check By: Milina PatilResult: False
