हा फोटो गाझियाबादमधील पीडित मुलाचा नाही; हा येमेनमधील जखमी मुलाचा फोटो आहे

False सामाजिक

मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या एका तेरा वर्षीय मुस्लिम मुलाला बेदम मारहाण करण्याची घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे घडली. मुलाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. 

या घटनेचा सोशल मीडियावर तीव्र निषेध केला जात आहे. या पीडित मुलाचे काही फोटोदेखील युजर शेअर करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने यातील काही फोटोंची पडताळणी केल्यावर कळाले की, हे फोटो गाझियाबादमधील पीडित मुलाचे नाहीत. 

काय आहे दावा?

एका मुलाच्या संपुर्ण अंगावार मारहाणीचे वळ उमटल्याचा फोटो शेअर करून म्हटले की, “मुलाचा गुन्हा एवढाच की तो तहान लागली म्हणून मंदिरात पाणी प्यायला गेला तर त्याला ऐवढ्या बेरहमीने मारण्यात आलंय काय हेच ते अच्छे दिन काय??”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर हा फोटो व्हायरल होत आहे.

तथ्य पडताळणी

हे खरं आहे की, गाझियाबादमध्ये एका अल्पवयीन मुलाला मंदिरात गेल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. परंतु, व्हायरल फोटो खरंच त्या पीडित मुलाचा आहे का हे शोधले.

रिव्हर्स इमेज सर्चद्वारे कळाले की, हा फोटो गेल्या अनेक महिन्यांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

अधिक शोधल्यानंतर अरेबिक भाषेतील अनेक वेबसाईटवर हा फोटो वापरल्याचे आढळले. विविध बातम्यांतून कळाले की, हा फोटो येमेन देशातील आहे. 

मूळ वेबसाईट – Alnabba-Alyemeni | अर्काइव्ह

येमेनमधील अल महावित शहरातील राशिद मोहम्मद अल-काहिली (वय 40) या व्यक्तीने त्याच्या स्वतःच्या चौदा वर्षीय मुलाला असे अमानुषपणे मारहाण केली होती. 

एका सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनुसार, 3 ऑक्टोबर 2020 रोजी राशिदने या मुलाला दोरीने बांधून जबर मारले. त्यांच्या संपुर्ण अंगावर जखमेचे व्रण उमटले. पोलिसांनी ही माहिती मिळाल्यानंतर राशिदला अटक करण्यात आली होती. 

अरेबिक भाषेतील विविध वेबसाईटने ही बातमी दिलेली आहे. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, येमेनमधील जखमी मुलाचा फोटो चुकीच्या माहितीसह गाझियाबादमधील पीडित मुलाचा म्हणून शेअर होत आहे. परंतु, हेदेखील तितकेच खरं आहे की, गाझियाबादमध्ये एका मुलाला मारहाण झाली होती.

Avatar

Title:हा फोटो गाझियाबादमधील पीडित मुलाचा नाही; हा येमेनमधील जखमी मुलाचा फोटो आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False