
आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, नेत्यांच्या सभा व रॅलीमध्ये किती गर्दी जमते यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.
दरम्यान, एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरमध्ये उतरल्यावर समोर कोणी नसतानाही हात हलवत आहेत. या व्हिडिओवरून त्यांची खिल्लीदेखील उडवली जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ सोयीने एडिट करून चुकीचा दावा केला जात आहे.
तथ्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या 16 सेकंदाच्या क्लिपमध्ये नरेंद्र मोदी हेलिकॉप्टर बाहेर उतरून हात हलवताना दिसतात. या कथित व्हिडिओमध्ये त्यांच्या समोर कोणीच दिसत नाही. तसेच व्हिडिओमध्ये एक हिंदी गाणेसुद्धा ऐकू येते. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “जवळपास कोणी स्टाफ व्यतिरिक्त माणूस आहे का हात हलवतयं ते आभाळ हेपले.”
मूळ व्हिडिओ – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
या व्हिडिओचे खरे-खोटे करण्यासाठी मूळ व्हिडिओ तपासणे गरजेचे आहे.
मोदींच्या प्रत्येक सभेचे व्हिडिओ चित्रण भाजपच्या विविध सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर करण्यात येते.
त्यानुसार, आम्हाला भाजपच्या अधिकृत ट्विटर खात्यावर 1 एप्रिल 2021 रोजी शेअर करण्यात आलेला एक व्हिडिओ आढळला.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ मोदींच्या पश्मिम बंगालमधील जयनगर शहरातील सभेचा आहे.
वरील व्हिडिओमध्ये दिसते की, मोदी जेव्हा हेलिकॉप्टरमधून उतरले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी गर्दी जमली होती. मोदींनीसुद्धा हात हलवून लोकांना अभिवादन केले.
या सभेचा संपूर्ण व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.
आता मूळ व्हिडिओ आणि व्हायरल क्लिप यांची तुलना करूया. यातून स्पष्ट दिसते की, मूळ व्हिडियोला ब्लर केले आहे आणि आवाज म्यूट करून त्या जागी हिंदी गाणे टाकलेले आहे.
व्हिडिओची स्पष्टता कमी केल्यामुळे दूर उभे असणारी गर्दी दिसत नाही.
निष्कर्ष
मूळ व्हिडिओ तपासल्यावर कळते की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ बनावट आहे. मोदींच्या समोर गर्दी होती आणि त्यांना पाहून ते हात हलवून अभिवादन करीत होते.

Title:FAKE NEWS: नरेंद्र मोदी रिकाम्या मैदानाला पाहून हात हलवत आहेत का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
