या फोटोत राहुल गांधींसोबत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारी मुलगी नाही; वाचा सत्य

False राजकीय | Political

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरून राजकीय वातावरण तापलेले आहे. या यात्रेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर विविध दाव्यासह व्हायरल होत आहेत. अशाच एका फोटोत राहुल गांधी यांच्यासोबत एक मुलगी दिसत आहे. 

युजर्स दावा करत आहेत की, या मुलीचे नाव “अमूल्या लियोना” असून सीएए आंदोलनादरम्यान तिने हैदराबादमध्ये भर स्टेजवरून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. अशा मुलीसोबत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये भेट घेतली म्हणून टीका केली जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.

आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. फोटोतील मुलगी अमुल्या नाही. ती मुलगी कांग्रेसच्या विद्यार्थी संघटनेची विद्यार्थिनी मिवा अँड्रेलिओ आहे.

काय आहे दावा?

राहुल गांधी यांचा एका मुलीसोबतचा फोटो आणि सोबत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या मुलीचा व्हिडिओ एकत्र शेअर करून म्हटले की, “भारत जोडो यात्रा काढणाऱ्या राहुल गांधी यांनी काल अमूल्यालियोना या मुलीची भेट घेतली. अमूल्या लियोना ही चिकमंगळूर शहरातील जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या नेत्यांची मुलगी आहे. ही तीच अमूल्या आहे जिने हैदराबाद येथे झालेल्या CAA/NRC च्या विरोधात ओवेसी च्या स्टेजवरून पाकिस्तान जिंदाबादच्या ताडाखेबाज घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर तिच्यावर कायदेशीर कारवाई झाली व तिची 15 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. आता पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या मुलीला प्रेमाने #कवटाळून भेट घेतली.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम राहुल गांधी यांच्या फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, त्यांच्यासोबतच्या मुलीचे नाव मिवा अँड्रेलिया आहे. 

मिवाने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला होता. मिवा केरळमधील एर्नाकुलम शहारातील असून ती काँग्रेसच्या राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेची केरळमधील सदस्य (KSU) आहे. 

काँग्रेसची भारत जोडो यात्रा केरळमधून जात असताना या मुलीने राहुल गांधी यांची भेट घेतली होती. एर्नाकुलम शहरात तिने विविध काँग्रेस नेत्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत. ते तुम्ही येथे पाहू शकता. 

फॅक्ट क्रेसेंडोने मिवाशी संपर्क साधाला. तिने सांगितले की, राहुल गांधींसोबतचा हा फोटो एर्नाकुलम शहरातून भारत जोडो यात्रा जात असतानाचा आहे. माझे नाव मिवा अँड्रेलिया असून माझ्या फोटोला चुकीच्या नावाने आणि दाव्यासह शेअर केले जात आहे.

यावरून हे स्पष्ट होते की, या मुलीचे नाव अमुल्या नसून मिवा अँड्रेलिया आहे. 

मग पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारी मुलगी कोण?

अमुल्या लियोन या मुलीने 20 फेब्रुवारी 2020 रोजी हैदराबादमध्ये एका सीएए/एनआरसी कायद्याविरोधातील एका सभेत मंचावरून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. यावेळी मंचावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी उपस्थित होते. तिने घोषणा दिल्यानंतर ओवैसी यांनी त्यामुलीला थांबवले आणि असे न करण्यास सांगितले.

अमुल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. सुमारे 110 दिवस कोठडीत राहिल्यानंतर तिला जामीन मिळाला होता. अमुल्या कर्नाटकातील चिक्कामगालुरू जिल्हातील रहिवाशी असून बंगळुरूमध्ये पदवीचे शिक्षण घेत होती. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, राहुल गांधी यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या अमुल्या लियोन या मुलीची भेट नाही घेतली. व्हायरल फोटोमध्ये त्यांच्यासोबत केरळमधील कांग्रेसच्या विद्यार्थी संघटनेची सदस्य मिवा अँड्रेलिया आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:या फोटोत राहुल गांधींसोबत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारी मुलगी नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False