
खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी आसाराम बापू बलात्कार करु शकत नाही, असे वक्तव्य केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी आसाराम बापू बलात्कार करु शकत नाही, असे वक्तव्य केले आहे का शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळी आम्हाला एबीपीलाईव्ह डॉट इन या संकेतस्थळाचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार आसाराम बापू हे दोषी नाहीत, असे मत साध्वी प्रज्ञा सिंह यांनी व्यक्त केल्याचे दिसून येते. एबीपीने हे 24 एप्रिल 2018 रोजी प्रसिध्द केले असल्याचे दिसून येते. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वी त्यांनी हे वक्तव्य केल्याचे वृत्तात म्हटले आहे.
आज तक या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त दिनांक 24 एप्रिल 2018 रोजी दिले होते. या वृत्तात म्हटल्यानुसार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आसाराम बापू निर्दोष सुटतील, अशी आशा व्यक्त केली आहे. ते निर्दोष सुटावेत यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
बलात्कार प्रकरणात आसाराम बापू यांना दोषी ठरविण्यात आल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केल्याचे दिसून येत नाही.
निष्कर्ष
अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात आसाराम बापू निर्दोष सुटतील, अशी आशा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी 24 एप्रिल 2018 रोजी व्यक्त केली होती. आसाराम बापू यांना दोषी ठरविण्यात आल्यानंतर मात्र त्यांनी आसाराम बापू यांच्याबद्दल कोणतेही वक्तव्य केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे विद्यमान परिस्थितीत खासदार प्रज्ञा सिंह यांनी आसाराम बापू बलात्कार करु शकत नाही असे वक्तव्य केले हे असत्य आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी आसाराम बापूचे समर्थन केलंय का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
