MODI DEGREE: नरेंद्र मोदींच्या डिग्रीवर निवृत्त कुलगुरुची स्वाक्षरी आहे का? वाचा सत्य

False राजकीय | Political

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीचा वाद संपता संपत नाही. त्यांच्या पदवीच्या अधिकृततेविषयी शंका उपस्थित करणारे आक्षेप आणि आरोप अधुनमधून केले जातात. अशाच एका नव्या दाव्यामध्ये नरेंद्र मोदींच्या पदव्युत्तर पदवीवर निवृत्त कुलगुरुची स्वाक्षरी आहे, असे म्हटले आहे. 

1983 साली मोदींच्या एम. ए. पदवीवर सही करणारे कुलगुरू प्रा. के. एस. शास्त्री दोन वर्षे आधीच म्हणजे 1981 सालीच निवृत्त झाले होते, असा व्हायरल पोस्टच्या माध्यमातून दावा केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. मोदींच्या पदवीवर सही करणारे कुलगुरू के. एस. शास्त्री यांचा कार्यकाळ 1987 साली समाप्त झाला होता, 1981 साली नाही.

काय आहे दावा?

व्हायरल पोस्टमध्ये नरेंद्र मोदींच्या एम. ए. ची पदवी आणि सोबत कुलगुरू के. एस. शास्त्री यांचा फोटो दिलेला आहे. या फोटोखाली  22-08-1980 to 13-07-1981 असे लिहिलेले आहे.

सोबत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “दिल्ली युनि्हर्सिटीमध्ये VC असलेले प्रो k S शास्त्री 1981 ला रिटायर झाले, मोदींच्या 1983 सालच्या डिग्री वर त्यांची सही आली आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम तर पोस्टमध्ये के. एस. शास्त्री यांना दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू म्हटले आहे; पण पदवीचा फोटो गुजरात विद्यापीठाचा आहे. पोस्टमध्ये अशी विसंगती आहे. 

पोस्टमधील माहितीचा आधार घेत गुगलवर “K. S. Shastri, Vice-Chancellor, 22-08-1980 to 13-07-1981,” असे शोधले. त्यातून वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठाच्या (VNSGU) वेबसाईटवर प्रा. शास्त्री यांचा व्हायरल होत असलेला फोटो आढळला. 

वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठातील माजी कुलगुरुंची यादीमध्ये प्रा. शास्त्री यांचे नाव व छायाचित्र दिलेले आहे. त्यानुसार, प्रा. शास्त्री 22-08-1980 ते 13-07-1981 दरम्यान VNSGU विद्यापीठाचे कुलगुरु होते. 

VNSGU विद्यापीठातील कार्यकाळानंतर प्रा. शास्त्री गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून रुजू झाले. गुजरात विद्यापीठाच्या वेबसाईटवर माजी कुलगुरुंची यादी उपलब्ध आहे. त्यात प्रा. शास्त्री यांच्या कुलगुरुपदाचा कार्यकाळ 1981 ते 1987 असा दिलेला आहे. 

म्हणजेच 1983 साली जेव्हा नरेंद्र मोदींना एम. ए. ची पदवी प्रदान करण्यात आली तेव्हा प्रा. शास्त्रीच गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यामुळेच त्यांची मोदींच्या पदवीवर स्वाक्षरी आहे. 

प्रा. शास्त्री सध्या अहमदाबाद येथील सोम ललित महाविद्यालयाच्या सल्लागार समितीचे चेयरमन आहेत.

गुजरात विद्यापीठाच्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींना राज्यशास्त्र (Political Science) या विषयात 1983 साली पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली होती. ते 800 पैकी 499 गुणांसह 62.3 टक्के मिळवून प्रथम क्षेणीत उत्तीर्ण झाले होते.

गुजरात विद्यापीठाच्या वेबसाईटवर नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा माजी विद्यार्थी म्हणून उल्लेख केलेला आहे. 

नरेंद्र मोदींच्या शिक्षणावर होत असेलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी अमित शहा यांनी 2016 साली त्याच्या दोन्ही पदव्या सार्वजनिक केल्या होत्या. नरेंद्र मोदींना दिल्ली विद्यापीठातून बी. ए. आणि गुजरात विद्यापीठातून एम. ए. केलेले आहे. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, नरेंद्र मोदींच्या एम. ए. पदवीवर निवृत्त कुलगुरुंनी स्वाक्षरी केली नव्हती. प्रा. के. एस. शास्त्री 1981 ते 1987 साली गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यामुळेच ते 1981 साली निवृत्त झाल्याचा दावा खोटा आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:MODI DEGREE: नरेंद्र मोदींच्या डिग्रीवर निवृत्त कुलगुरुची स्वाक्षरी आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False