
मुंबईमध्ये नुकतेच दहशतवाद्यांना पकडण्यात आले, असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका इमरतीमधून काही लोकांना अटक करतानाचा हा व्हिडिओ आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ एका वेबसिरीजच्या शुटिंगचा आहे.
काय आहे दावा?
दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये बंदुकधारी पोलिसांची तुकडी काही लोकांना इमारतीमधून अटक करून घेऊन जाताना दिसते. सोबत दावा केला आहे की, “पायधुनी / भुलेश्वर येथे आतंकवादी पकडले.”
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
दक्षिण मुंबईमधील पायधुनी/भुलेश्वर भागात जरी अशी काही कारवाई झाली असेल तर याविषयी नक्कीच काही बातमी आली असेल. मात्र, इंटरनेटवर शोध घेतल्यावर अशी एकही बातमी आढळली नाही. त्यामुळे व्हायरल दाव्याच्या सत्यतेविषयी शंका बळावली.
फॅक्ट क्रेसेंडोने व्हिडिओत दिसणाऱ्या डॉ. शैस्ताज वेलनेस क्लिनिकशी संपर्क साधला. तेव्हा कळाले की, हा व्हिडिओ त्या इमारतीमध्ये झालेल्या एका वेबसिरीजच्या शुटिंगचा आहे. 14 फेब्रुवारी रोजी ही शुटिंग झाली होती. हे काही खरे दहशतवादी नव्हते.
फॅक्ट क्रेसेंडोने मग पायधुनी भागाचे पोलिस निरीक्षक सुभाष दुधगावकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना या व्हायरल दाव्याविषयी विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ एका वेबसिरीजच्या चित्रिकरणाचा आहे.
“14 फेब्रुवारी रोजी ही शुटिंग झाली होती. पोलिस प्रशासनाकडून त्यांनी रीतसर परवानगी घेतली होती. या व्हिडिओसोबत केला जाणारा पूर्णतः खोटा आहे. पायधुनी भागातून कोणत्याही दहशतवाद्याला पकडण्यात आलेले नाही,” असे सुभाष दुधगावकर यांनी स्पष्ट केले.
मुंबईचे पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांनीसुद्धा या व्हिडिओबाबत केला जाणारा दावा फेटाळून लावला. “व्हिडिओमध्ये दिसणारे दृश्य मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नाही. ही केवळ वेबसिरीजची शुटिंग होती. आपल्या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन करतो की, सोशल मीडियावर अफवा पसरवू नये,” असे एन. अंबिका म्हणाले.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ हा एका वेबसिरीजच्या शुटिंगचा आहे. त्यामुळे पायधुनी/भुलेश्वर येथे दहशतवादी पकडले हा दावा असत्य ठरतो.

Title:मुंबईमध्ये नुकतेच दहशतवाद्यांना पकडण्यात आले का? वाचा ‘त्या’ व्हिडिओमागील सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
