शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी IDBI बँकेच्या व्यवस्थापकास मारल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

False सामाजिक

मुंबईत आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापकास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बँक व्यवस्थापकास मारहाण करणारे हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

मुंबईत आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापकास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा या व्हिडिओचा शोध घेतला. त्यावेळी 13 सप्टेंबर 2020 रोजी टाइम्स नाऊ (संग्रहित) या इंग्रजी संकेतस्थळाने याबाबत दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. याबाबत 10 सप्टेंबर 2020 रोजी न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीने दिलेले वृत्तही आपण खाली पाहू शकता. या वृत्तानुसार बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील आयडीबीआय बँकेत ही घटना घडली आहे. 

संग्रहित

या घटनेबाबत आयडीबीआय बँकेच्या मलकापूर शाखेचे व्यवस्थापक अनिल सावळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, ही घटना 24 ऑगस्ट 2020 रोजी घडली. ते काही दिवसांपूर्वीच मलकापूर येथे शाखा व्यवस्थापक म्हणून रुजू झाले आहेत. या व्हिडिओत ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली ते या अगोदरचे व्यवस्थापक आहेत. आपले कर्जप्रकरण त्वरित मंजूर करण्यात यावे, अशी मारहाण करणाऱ्या व्यक्तींची मागणी होती. मारहाण करणाऱ्या व्यक्तींची राजकीय पार्श्वभूमी आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मलकापूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता मसाये म्हणाल्या, ही घटना 24 ऑगस्ट 2020 रोजी घडली. या घटनेत पाच जणांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे पाचही जण कॉंग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. शेतकरी पीक कर्ज देण्यास उशीर करीत असल्याचा आरोप करत ही मारहाण करण्यात आली. या प्रकरणात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चौधरी आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होते.

निष्कर्ष 

आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापक मारहाण करण्यात आल्याची घटना मुंबईत नव्हे तर मलकापूर येथे घडली आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्ती शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे असत्य आहे. ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. 

Avatar

Title:शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी IDBI बँकेच्या व्यवस्थापकास मारल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False