2011 साली जपानमध्ये आलेल्या त्सुनामीचा व्हिडियो चीनमधील महापूर म्हणून व्हायरल

False आंतरराष्ट्रीय | International

कोरोना विषाणुचे उगमस्थान म्हणून चीनबाबत लोकांमध्ये रोष वाढलेला आहे. चीनमध्ये जून महिन्यापासून जोरदार पावसामुळे महापूराने थैमान घातलेले आहे. चीनमधील या पुराचे रौद्ररुप म्हणून सोशल मीडियावर एक व्हिडियो व्हायरल होत आहे. निसर्गाने चीनला चांगलाच धडा शिकवला, असे नेटीझन्स म्हणत आहेत. मात्र, सत्य वेगळेच आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी केलेल्या विनंतीनुसार तथ्य पडताळणी केल्यावर समोर आले की, व्हायरल व्हिडियो चीनमधील नसून, 2011 साली जपानमध्ये आलेल्या त्सुनामीचा आहे.

काय आहे दावा?

सोशल मीडियावरील पोस्टमधील सुमारे चार मिनिटांच्या व्हिडियोमध्ये एका शहरातील चौकात पाण्याचा मोठा प्रवाह वाहत येतो. बघता बघात सगळे रस्ते, चौक पाण्याखाली जातात. कार, वाहने वाहताना दिसतात. सोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, चीन मध्ये प्रचंड पावसामुळे तीन धरण फुटली आणि महापूर आला!!!! अमानवीय कृत्य करुन अति स्वस्वार्थी महत्वाकांक्षेपोटी संपुर्ण जगाला भिकेला लावून स्वत:ला महासत्ता बनविणार्या चीनला नियतीने काय धडा दिला ते प्रत्यक्ष पहा पहा जल महा प्रलयाचा तांडव शेवटी काय “करावे तसे भरावे

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा व्हिडियो चीनचा आहे का याची तपासणी करणे गरजेचे आहे. त्याकरिता, व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून समोर आलेल्या परिणामांनुसार हा व्हिडियो गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे दिसले.

जपानमधील प्रसिद्ध वृत्तसंस्था फुजी न्यूज नेटवर्कच्या (FNN) अधिकृत युट्यूब चॅनेलवर 2012 साली हा व्हिडियो अपलोड केल्याचे आढळले. सोबत दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडियो जपानमध्ये 11 मार्च 2011 रोजी आलेल्या त्सुनामीचा आहे. सुमारे 9.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे जपानच्या पूर्व किनारपट्टीवर त्सुनामीच्या लाटांनी प्रचंड नुकसान केले होते. 

वरील व्हिडियो जपानमधील इशिनोमाकी शहरातील आहे. फुजी न्यूज नेटवर्कने जपानमधील 2011 त्सुनामासंदर्भातील प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवण्यासाठी Remembering 3/11 नावाची अर्काइव्ह वेबसाईटही तयार केलेली आहे. या वेबसाईटवरील माहितीनुसार, इशिनोमाकी शहरातील Koichi Abe नामक व्यक्तीने आपल्या ऑफिसच्या छतावरून 11 मार्च 2011 रोजी हा व्हिडियो चित्रित केला होता. 

गुगल मॅपवर मग आम्ही हा व्हिडियो जेथून चित्रित केला होता, ती जागा शोधली. खाली दिलेल्या गुगल मॅपच्या स्क्रीनशॉटमध्ये पिवळ्या रंगाच्या वर्तुळात दाखवलेल्या ठिकाणाहून हा व्हिडियो काढण्यात आला होता. व्हिडियोच्या 2.47 मिनिटाला कारखान्याचे तीन दंडगोलाकार टॉवर दिसतात. खाली दिलेल्या मॅपमध्ये पिवळ्या चौकोनात ते पाहू शकतात. 

मूळ मॅप येथे पाहा – गुगल मॅप्स

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, व्हायरल व्हिडियो चीनमध्ये आलेल्या पुराचा नाही. तो व्हिडियो 2011 साली जपानमध्ये आलेल्या त्सुनामीचा आहे. त्यामुळे सदरील दावा खोटा आहे.

Avatar

Title:2011 साली जपानमध्ये आलेल्या त्सुनामीचा व्हिडियो चीनमधील महापूर म्हणून व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False