नशेत धुंद असणाऱ्या तरुणाकडून जबरदस्तीने घेतली मुले पळवून नेल्याची कबुली. वाचा सत्य

False राष्ट्रीय

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रीय असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी संशयावरून काही लोकांना पकडून मारल्यामुळे त्यांचा बळी गेल्याचीसुद्धा घटना घडल्या आहेत. अनेकदा या हिंसक घटनांमध्ये निष्पाप लोकांचेच बळी गेले आहेत. सध्या असाच एक व्हिडियो फिरत आहे. यामध्ये खांबाला बांधलेला एक तरुण मुले पळवून किडनी विकत असल्याची कबुली देतो. या व्हिडियो फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी

काय आहे व्हिडियोमध्ये?

एका तरुणाला खांबाला बांधलेले आहे. त्याची मोबाईलमध्ये शुटिंग करणारे लोक त्याला विचारतात की, तो येथे काय करीत होता, त्याचे साथीदार कुठे-कुठे आहेत, लहान मुलांना कसे पळवून काय करता असे प्रश्न विचारतात. त्यावर हा तरुण सांगतो की, तो रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांना पळवतो. आसपासच्या अनेक गावांत त्याचे साथीदार आहेत. लहान मुलांचे अपहरण करून त्यांची किडनी विकली जाते. व्हिडियोमध्ये हा तरुण स्वतःच अशी कबुली देत आहे.

तथ्य पडताळणी

व्हिडियो नेमका कुठला आहे याचा शोध घेतला. गुगलवर विविध कीवर्ड्सने शोध घेतला असता अमर उजालाने 14 ऑगस्ट 2019 रोजी दिलेली एक बातमी आढळली. त्यानुसार, उत्तर प्रदेशमधील एट (जि. जालौन) येथे ही घटना घडली होती. एट टोल प्लाझाजवळ सदरील युवक बसची वाट पाहत असताना अंकित वाल्मिकी याने काही मित्रांसह त्याला पकडले. लहान मुलांना पळवून नेल्याच्या आरोप करीत त्याला खांबाला बांधले आणि बळजबरीने अपहरणाची कबुली द्यायला लावली.

मूळ बातमी येथे वाचा – अमर उजालाअर्काइव्ह

वरील माहितीच्या आधारे फॅक्ट क्रेसेंडोने जालौनचे पोलीस अधीक्षक (एसपी) डॉ. सतीश कुमार यांच्याशी संपर्क केला. त्यांनी माहिती दिली की, हा व्हिडियो एका आठवड्यापूर्वीचा आहे. सदरील युवकाचे नाव सोनू श्रीवास आहे. एट येथील काही तरुणांनी त्याला पकडून बळजबरीने मुले पळविण्याची कबुली द्यायला भाग पाडले व व्हिडियोसुद्धा तयार केला. यावेळी सोनू नशेत होता. हा व्हिडियो व्हायरल झाल्यावर पीडित युवकाच्या तक्रारीवरून अंकित वाल्मिकीसह इतरांना अटक करण्यात आली.

जालौन पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरूनसुद्धा याप्रकारणी स्पष्टीकरण देण्यात आले.

आर्काइव लिंक 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हिडियोतील युवकाला मारहाण करून जबरदस्तीने त्याच्याकडून लहान मुलांना पळविल्याचे कबुल करून घेण्यात आले. ही घटना उत्तरप्रदेशमधील एट येथील आहे.

Avatar

Title:नशेत धुंद असणाऱ्या तरुणाकडून जबरदस्तीने घेतली मुले पळवून नेल्याची कबुली. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False