व्हिडिओ गेममधील क्लिप भारतीय सैन्याचा POK वरील हल्ला म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False राष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक केल्याच्या बातमी पीटीआय वृत्तसंस्थेने 19 नोव्हेंबर रोजी दिली. त्यावरून विविध मीडिया वेबसाईट्स, वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांनी या कथित हवाई हल्ल्याची बातमी प्रसिद्ध केली. परंतु, नंतर भारतीय सैन्याने या सर्व बातम्यांचे खंडन करीत अशी काही कारवाई केली नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, सोशल मीडियावर पीओकेवरील या कल्पित हल्ल्याचा व्हिडिओ म्हणून काही दृश्ये शेयर होऊ लागली आहेत. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही क्लिप एका व्हिडिओ गेमची असल्याचे समोर आले.

काय आहे दावा?

सोशल मीडियावर शेयर होत असलेल्या एका मिनिटांच्या ब्लॅक अँड व्हाईट क्लिपमध्ये जमिनीवरील एका घरावर हवाई हल्ला होताना दिसतो. ही क्लिप शेयर करून कॅप्शन दिली की, “एकदा परत दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा #AirStrike #pok”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

जसे की वर नमूद केले आहे की, भारतीय सैन्यानेच पाकव्याप्त काश्मिरमध्ये असा हल्ला अथवा गोळीबार झाला नसल्याचा खुलासा केला आहे. मग हा व्हिडिओ नेमका काय आहे, याचा आम्ही शोध घेतला.

व्हिडिओतील की-फ्रेम्स निवडून त्यांना गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा काही खऱ्याखुऱ्या हवाई हल्ल्याचा व्हिडिओ नाही. हे तर एका व्हिडिओ गेमचे फुटेज आहे. 

डबल डॉपलर नावाच्या युट्यूब चॅनेलवर सदरील व्हिडिओ आढळला. 2015 साली अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओसोबतच्या माहितीनुसार, ARMA-2 नावाच्या गेममधील हा व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या 27 व्या सेकंदापासून सध्या व्हायरल होत असलेली क्लिप पाहू शकता.

बोहेमिया इंटरअ‍ॅक्टिव्ह स्टुडिओ नावाच्या कंपनीने हा गेम तयार केलेला आहे. अतिशयी वास्तवदर्शी व्हिज्युअल्ससाठी हा गेम प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ अपलोड करणाऱ्या अकाउंटने स्पष्ट लिहिले आहे की, हे व्हिडिओ गेममधील फुटेश आहे. तो खऱ्याखुऱ्या हल्लाचा व्हिडिओ नाही.

फॅक्ट क्रेसेंडोने यापूर्वीदेखील अशा प्रकारचे दावे खोटे सिद्ध केले आहेत. ते तुम्ही खाली वाचू शकता –

निष्कर्ष

थोडक्यात काय तर ARMA-2 नावाच्या गेमचा व्हिडिओ पाकव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या एअर स्ट्राईकचा म्हणून शेयर केला जात आहे. मूळात पीओकेमध्ये अलिकडे अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचे भारतीय लष्काराने स्पष्ट केले आहे.

Avatar

Title:व्हिडिओ गेममधील क्लिप भारतीय सैन्याचा POK वरील हल्ला म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •