आर्मेनिया-आझरबैजान या देशांतील युद्धाचा व्हिडिओ म्हणून कम्प्युटर गेमची क्लिप व्हायरल

False आंतरराष्ट्रीय

आर्मेनिया आणि आझरबैजान या दोन देशांमध्ये विविदित जागेच्या ताब्यावरून सध्या वातावरण तापलेले आहे. नागोर्नो-काराबाख या भूप्रदेशावरील मालकीसाठी दोन्ही देशांकडून गोळीबार आणि हल्ले करण्यात येत आहेत. सोशल मीडियावर या युद्धातील दृश्ये म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ युद्धाचा नसल्याचे समोर आले. तो तर एक व्हिडिओगेमचा व्हिडिओ आहे.

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, युद्ध विमाने जमिनीवर जोरदार हल्ला चढवित आहेत. तसेच जमिनीवरील यंत्रणा विमानांचा वेध घेत त्यांना हाणून पाडत आहे. कॅप्शनमध्ये युजरने म्हटले आहे की, अजरबैजान आणि आर्मेनिया ह्यांच्या चाललेल्या युद्धात काल अजरबैजानचे मिग आर्मेनिया मार्फत पाडले गेले. दोन मिनिटांचा खेळ चालू आहे. इअरफोन घालूनच पहा.हॉलिवूडचा एखादा सिन पाहत असल्याचा फील येईल.

मूळ व्हिडिओ येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोने या वर्षाच्या सुरुवातील अशाच प्रकारचा एक व्हिडिओ फॅक्ट-चेक केला होता. इराणने 8 जानेवारी रोजी इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओम्हणून त्यावेली असाच एक व्हिडिओ शेयर होत होता. तेव्हा कळाले होते की, तो व्हिडिओ ARMA-3 नावाच्या गेममधील फुटेज आहे.

हा धागा पकडून मग आम्ही सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी केली.

युट्यूबवर कीवर्ड्सद्वारे शोधल्यावर एका जपानी भाषेतील युजरचे अकाउंट मिळाले. त्यावर 22 ऑगस्ट रोजी हा व्हिडिओ शेयर करण्यात आला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. सदरील व्हिडिओच्या शीर्षक आणि वर्णानामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, हे फुटेज ARMA3 नावाच्या गेममधील आहे. 

काय आहे ARMA3 गेम?

बोहेमिया इंटरअ‍ॅक्टिव्ह नावाच्या कंपनीतर्फे ARMA3 नावाचा मिलिटरी टॅक्टिक गेम 2013 साली लाँच करण्यात आला होता. यामध्ये प्लेयरला मिलिटरी ऑपरेशन पूर्ण करायचे असते. यामध्ये विविध युद्धसामुग्रीदेखील वापरता येते.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये C-RAM (Counter Rocket, Artillery, and Mortar) ही यंत्रणा दिसते. अत्यंत वास्तवदर्शी दृश्ये ही या गेमची खासियत आहे.

या गेमचा अधिकृत ट्रेलर तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, खऱ्याखुऱ्या युद्धाचा व्हिडिओ म्हणून एका व्हिडिओ गेमचे फुटेज व्हायरल होत आहे. आर्मेनिया-आझरबैजान युद्धाचा म्हणून जो व्हिडिओ फिरतोय तो खरे तर ARMA3 नावाच्या गेमचा व्हिडिओ आहे.

(तुमच्याकडील शंकास्पद मेसेज/फोटो/व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी 9049053770 या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर पाठवा आणि मिळवा सत्य माहिती 24 तासांच्या आत!)

Avatar

Title:आर्मेनिया-आझरबैजान या देशांतील युद्धाचा व्हिडिओ म्हणून कम्प्युटर गेमची क्लिप व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False