बिहारमधील ही नवरी 8 वर्षांची अल्पवयीन नाही; तिचे वय 19 वर्षे आहे, वाचा सत्य

False सामाजिक

सोशल मीडियावर एका नवरी मुलीचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, बिहारच्या नवादा येथे एका 8 वर्षांच्या मुलीचे 28 वर्षीय मुलाशी लग्न लावण्यात आले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

हा दावा खोटा आहे. व्हायरल फोटोतील मुलगी अल्पवयीन नाही. तिचे वय सध्या 19 वर्षे आहे.

काय आहे दावा?

नववधुच्या कपड्यातील एका मुलीचा फोटो शेअर करून म्हटले की, “बिहारच्या नवादाचे हे मार्मिक चित्र त्यांची दारिद्र्य सांगत आहेत. कोणत्या परिस्थितीत पालक आपल्या 8 वर्षाच्या मुलीशी लग्न 28 वर्षांच्या मुलाशी करणार आहे. 70 वर्षांनंतरही असे चित्र  मनाला हादरा बसणारा आहे”

फेसबुक पोस्टचा स्क्रीन शॉट. स्रोत: फेसबुक । अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

बिहारमध्ये अशी काही घटना घडली का याचा शोध घेतल्यावर न्यूज18 बिहार झारखंड या चॅनेलवरील एक बातमी आढळली. त्यानुसार, या मुलीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर बिहारच्या नवादा जिल्हा प्रशासनातील अधिकारी या मुलीच्या गावात गेले. तेथे विचारपूस केल्यावर कळाले की, या मुलीचे वय 18 पेक्षा जास्त असून, ती सज्ञान आहे.

दैनिक भास्करनेसुद्धा याविषयी बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यातसुद्धा हेच म्हटले आहे की, ही मुलगी अल्पवयीन नाही. जिल्हा प्रशासनाने तात्काळ वारिसलीगंज ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मंजौर गावात जाऊन मुलीची माहिती घेतली. या मुलीचे नाव तनू कुमारी असून, तिचे एक महिन्यापूर्वीच विवाह झाला. 


READ: गोमुत्राच्या अतिसेवनामुळे प्रज्ञा ठाकूर यांना दवाखान्यात न्यावे लागले का?


दैनिक भास्करच्या बातमीचा स्क्रीनशॉट.

सदरील मुलीने स्वतः समोर येत व्हिडिओ संदेशाद्वारे सोशल मीडियावरील अफवांचे खंडन केले. न्यूज 24 वाहिनीने तिचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

त्यात तिने म्हटले की, “माझा विवाह दोन्ही कुटुंबांच्या संमतीने झाला आहे. माझी जन्मतारीख 1 जानेवारी 2002 आहे. खोटी माहिती शेअर करू नये.”

नवादा जिल्हाधिकारी कार्यालयानेसुद्धा या प्रकरणी पत्रक काढून सोशल मीडियावरील दावे असत्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

पत्रकात म्हटले की, जिल्हा प्रशासन व पोलिसांनी व्हायरल बातमीची पडताळणी केली तेव्हा कळाले की, सदरील मुलीच्या वडिलांचे गाव नवादा जिल्हात आहेत. परंतु, तिचे पालनपोषण मताई (जि. जुमई) गावात झाले. तेथील मुलाशी तिचा एक-दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला. मुलीच्या आधार कार्डनुसार तिची जन्मतारीख 1 जानेवारी 2002 असून, आधार डेटाबेसमध्ये या कार्डची पडताळणी करण्यात आली आहे. त्यावरून सिद्ध होते की, ही मुलगी सज्ञान असून, सोशल मीडियावरील दावे असत्य आहे.

नवादाचे जिल्हाधिकारी यशपाल यांनीसुद्धा याविषयी व्हिडिओ संदेश जारी केला आहे. 

नवादा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ट्विटचा स्क्रीनशॉट.

बिहारच्या जनसंपर्क कार्यालयानेसुद्धा या प्रकरणी खुलासा केला आहे. 

नवादा येथे 8 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा 28 वर्षीय मुलाशी विवाह झाला, अशी अफवा व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने खातरजमा केली. मुलीच्या गावाल भेट देऊन माहिती घेतल्यावर कळाले की, मुलगी सज्ञान आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.


READ: भाजप आणि मोदींवर खरमरीत टीका करणारी ही महिला मनेका गांधी नाही


फॅक्ट क्रेसेंडो मल्याळमने नवादा जिल्हाचे पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार मंडल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीदेखील या मुलीच्या फोटोविषयी केला जाणारा दावा खोटा असल्याचे सांगितले.

निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, बिहारमध्ये 8 वर्षांच्या मुलीचे 28 वर्षीय मुलाशी लग्न लावण्यात आले, हा दावा खोटा आहे. या मुलीचे वय 19 असून, ती सज्ञान आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:बिहारमधील ही नवरी 8 वर्षांची अल्पवयीन नाही; तिचे वय 19 वर्षे आहे, वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False