
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे निधन झाले असल्याची पोस्ट अनुराधा हाळाळे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे निधन झालंय का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही गुगलवर उन्नाव बलात्कार पीडितेचा मृत्यू असे टाकले तेव्हा खालील परिणाम दिसून आले.
या परिणामात बीबीसी मराठीने 30 जुलै 2019 रोजी दिलेल्या वृत्तानुसार, उन्नाव पोलीस ठाण्याचे अधीक्षक माधवेंद्र प्रसाद वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीसहित तिचे दोन नातेवाईक आणि वकील गाडीतून जात होते. एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. यापैकी एक महिला पीडित मुलीची काकू आहे तर दुसरी महिला काकूची बहीण आहे. पीडित मुलगी आणि वकिलांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर लखनौ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात रायबरेलीमध्ये झाला आहे आणि रायबरेली पोलिसांनीच जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखलं केलं आहे, असं माधवेंद्र प्रसाद वर्मा यांनी सांगितलं. मात्र रायबरेली पोलिसांनी याबाबत कोणताही माहिती दिली नाही, असे बीबीसीने या वृत्तात नमूद केले आहे.
महाराष्ट्र टाईम्सने 31 जुलै 2019 रोजी सकाळी 6 वाजून 26 मिनिटाला दिलेल्या वृत्तानुसार पीडित तरुणीची प्रकृती अत्यवस्थ आहे. लखनौ येथील रग्णालयाचे प्रवक्ते संदीप तिवारी यांनी जखमींच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा नसून दोघेही व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती दिली असल्याचे म्हटले आहे.
इंडिया टूडेने 31 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजून 20 पीटीआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार पीडिता आणि तिच्या वकिलांची प्रकृती स्थिर आहे.
या संशोधनातुन आम्हाला असे दिसून आले की पीडितेची प्रकृती दिनांक 31 जुलै 2019 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यवस्थ पण स्थिर होती. आम्ही अधिक माहितीसाठी किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी 9415007710 संपर्क केला. त्यावेळी त्यांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
निष्कर्ष
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे प्रकृती अत्यवस्थ पण स्थिर असल्याचे विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे निधन झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती रुग्णालयातून देण्यात आलेली नाही. त्यामुळे उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे निधन झाल्याची पोस्ट फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे निधन झाले का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
