
भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात उद्भवलेल्या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले. यावेळी चीनचेदेखील सैनिक मारले गेले. परंतु, चीनतर्फे मृतांचा अधिकृत आकडा किंवा नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
सोशल मीडियावर मात्र 56 चीनी सैनिकांच्या नावांची एक यादी व्हायरल होत आहे. ही यादी भारतीय सैनिकांनी मारलेल्या चीनी सैनिकांची असल्याचा दावा करण्यात येत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने यासंदर्भात पडताळणी केली असता कळाले की, ही यादी तर विकिपीडियावरील नावे घेऊन तयार करण्यात आलेली आहे. ती खरी नाही.
काय आहे पोस्टमध्ये?
56 चीनी व्यक्तींच्या नावांची यादी शेयर करून म्हटले की, ही भारतीय सैन्याने मुडदे पाडलेल्या 56 चीनी सैनिकांची यादी आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम सदरील यादीचे शीर्षक चीनी भाषेतून तर 56 नावे इंग्रजी भाषेतून आहेत. यावरून यादीच्या अधिकृततेविषयी शंका निर्माण होते. मग ही यादी खरंच गलवान खोऱ्यात मारल्या गेलेल्या चीनी सैनिकांची आहे का याचा शोध घेतला.
यादीतील काही नावे गुगलवर सर्च केली असता कळाले की, ही नावे तर विकिपीडियावरून घेतलेली आहेत.
चीनमध्ये आतापर्यंत होऊन गेलेल्या जनरल रँकच्या सैनिकांच्या विकिपीडिया पेजवरून सदरील यादीतील नावे जशास तशी त्याच क्रमाने घेतलेली आहेत. खाली दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये व्हायरल यादीतीली पहिले 31 नावे आणि विकिपीडियावरील पेजवरील 1955 सालच्या चीनी जनरल पदावरील सैनिकांची यादी यांची तुलना केलेली आहे. त्यातून स्पष्ट होते की, पहिले सर्वच्या सर्व 31 नावे येथून उचललेली आहेत.

मूळ यादी येथे पाहा – विकिपीडिया । अर्काइव्ह
व्हायरल यादीतील 32 ते 56 क्रमांकाची नावे 1993 आणि 1994 सालातील जनरल रँकच्या सैनिकांच्या नामावलीतून घेतलेली आहेत. खाली दिलेलेया स्क्रीनशॉटमधील तुलनेतून ते स्पष्ट होते. यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेली 56 चीनी सैनिकांची यादी खरी नाही.

मूळ यादी येथे पाहा – विकिपीडिया । अर्काइव्ह
निष्कर्ष
वरील पुराव्यावरून हे स्पष्ट आहे की, व्हायरल यादी विकिपीडियावरील जुन्या चीनी सैनिकांच्या नावांवरून तयार करण्यात आली आहे. भारतीय सैनिकांनी मारलेल्या चीनी सैनिकांची नावे आणि आकडा अद्याप अधिकृतपणे उघड करण्यात आलेला नाही.

Title:भारतीय सैन्याने मारलेल्या 56 चीनी सैनिकांची ‘ती’ यादी खरी नाही. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
