आयुषमान भारत योजनेच्या खोट्या वेबसाईटपासून सावधान! शेयर करण्यापूर्वी वाचा

False राष्ट्रीय

(Image Source : Twitter @AyushmanNHA )

सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर आयुषमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसंबंधी अनेक खोटे मेसेज पसरवून लोकांची फसवणूक केली जात आहे. यामध्ये लोकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी एका खोट्या वेबसाईटवर अर्ज करण्यास सांगितले जाते.

अर्काइव्ह

फेसबुकवर विविध युजर्सने यासंबंधी पोस्ट केलेल्या आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची सत्य पडताळणी केली.

तथ्य पडताळणी

सोशल मीडियावर खालील मेसेज फिरत आहे.

मेसेजनुसार, 13 ते 70 या वयोगटातील 10 कोटी लोकांना प्रधानमंत्री आयुषमान भारत योजनेंतर्गत पाच लाख रुपयांचा मोफत विमा देण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2019 आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा संदेश आपल्या मित्रपरिवाराला पाठवा, जेणेकरून त्यांना या योजनाचा लाभ मिळेल. खालील वेबसाईटवर अर्ज करा.

http://aayushaman-bharat-yojana.insuranceportalhub.com

फॅक्ट क्रेसेंडोने या वेबसाईटला भेट दिली. तेव्हा होमपेजवर या योजेनेचे प्रचार करणारे एक पोस्टर दिसले, ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. त्याखाली नोंदणीसाठी किती वेळ उरला आहे याची माहिती देणारे घड्याळ सुरू असते. त्याखाली नाव, मोबाईल क्रमांक, वय आणि राज्य अशी माहिती भरण्यास सांगितले जाते.

फॅक्ट क्रेसेंडोने त्यानुसार माहिती भरली. मग एक प्रश्न विचारण्यात आला. आपल्याला सध्या एखाद्या विम्याचे संरक्षण आहे का? याचे उत्तर हो किंवा नाही मध्ये देण्याचे पर्याय देण्यात आले. याचे उत्तर दिल्यानंतर दुसरा प्रश्न विचारण्यात आला. त्यात म्हटले की, ही योजना केवळ वैवाहिक नागरिक आणि विद्यार्थी यांच्यासाठी आहे. आपण याच्याशी सहमत आहात का? याचेदेखील उत्तर हो किंवा नाही असे द्यायचे असते.

दोन्ही प्रश्नांचे उत्तर दिल्यानंतर वेबसाईटने सांगितले की, आमचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. तरी डिजिटल इंडियाचा प्रचार आणि पडताळणीसाठी हा मेसेज 10 ग्रुप किंवा मित्रांना व्हॉटसअपवर शेयर करावा लागेल. त्यानंतर खाली निळ्या बटणावर क्लिक केल्यावर तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल. परंतु, आम्हाला कोणताही नोंदणी क्रमांक मिळाला नाही.

मग आम्ही या वेबसाईटच्या About Us पेजवर गेलो असता त्यावर स्पष्ट लिहिलेले आहे की, ही वेबसाईट भारत सरकारशी निगडित नाही. म्हणजे या वेबसाईटचा आणि आयुषमान भारत योजनेचा काही संबंध नाही.

फॅक्ट क्रेसेंडोने मग आयुषमान भारत योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिली – https://www.pmjay.gov.in/

यावरील माहितीनुसार, या योजनेअंतर्गत देशातील १० कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजे सुमारे  ५० कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत आरोग्य विमा मिळणार आहे.  यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे ८४ लाख कुटुंबांची निवड केली आहे. आपण पात्र आहोत की नाही, हे तपासण्यासाठी १४५५५ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी किंवा अर्ज करण्याची गरज नाही. सरकारतर्फे सामाजिक आणि आर्थिक उत्पन्नांच्या नोंदीवरून या योजनेतील लाभार्थींची निवड केली जाते. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की, नाही हे तपासण्यासाठी येथे क्लिक करा – पात्रता

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून हेदेखील समोर आले की, यापूर्वीदेखील अशा प्रकारच्या अन्य खोट्या वेबसाईटस तयार करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात भारत सरकारनेदेखील गंभीर दखल घेतलेली आहे. एनडीटीव्हीने 15 डिसेंबर 2018 रोजी दिलेल्या बातमीनुसार, आयुषमान भारत योजनेसंदर्भात खोटी माहिती देणाऱ्या 54 वेबसाईटस आणि 68 अॅप्सवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने संसदेत दिली.

मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्हीअर्काइव्ह

आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी संसदेत याविषयी माहिती दिली होती. लोकसभेच्या वेबसाईटवर आम्ही यासंदर्भात शोध घेतला. 14 डिसेंबर 2018 रोजी संसदेत आयुषमान भारत योजनेसंदर्भात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांना खासदार अनुप्रिया पटेल यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, अशा खोट्या वेबसाईटवर सरकारचे लक्ष असून आतापर्यंत 54 वेबसाईटस आणि 68 अॅप्सची यादी तयार करण्यात आली आहे. यापैकी 23 वेबसाईटस आणि 62 अॅप्स बंद झाल्या आहेत. यासंदर्भात गृहखात्याला सूचना करण्यात आली असून पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

अनुप्रिया पटेल यांचे संपूर्ण उत्तर येथे वाचा – लोकसभाअर्काइव्ह

54 वेबसाईट आणि 68 अॅप्सची संपूर्ण यादी येथे पाहा – यादीअर्काइव्ह

आयुषमान भारत योजेनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदू भूषण यांनीदेखील 29 ऑक्टोबर 2018 रोजी ट्विट करून खोट्या वेबसाईटबद्दल माहिती दिली होती. त्यांनी लिहिले की, आयुषमान भारत योजनेविषयी अनेक खोट्या वेबसाईट, पोर्टल्स, व्हॉटसअप मेसेज पसरविले जात आहेत. आयुषमान भारत योजनेचा लाभार्थी होण्यासाठी अर्ज किंवा नावनोंदणी करण्याची गरज नाही.

अर्काइव्ह

निष्कर्ष:
सोशल मीडियावर पसरविली जाणारी वेबसाईट खोटी असून आयुषमान भारत योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज किंवा नावनोंदणी करण्याची गरज नसते. आरोग्य मंत्रालयाने अशा खोट्या वेबसाईटविरोधात पोलिसांत एफआयआरसुद्धा दिलेली आहे. त्यामुळे अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये. योजनेसाठी तुमची पात्रता तपासण्यासाठी 14555 किंवा 1800111565 या क्रमांकावर संपर्क करा.

Avatar

Title:आयुषमान भारत योजनेच्या खोट्या वेबसाईटपासून सावधान! शेयर करण्यापूर्वी वाचा

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False