जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी दिवाळीला हातात फटाके फोडले का? चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल

Partly False Social

IAS टॉपर आणि सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी हातात फटाके फोडतानाचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दिवाऴीत हातातच रॉकेट पेटवत असताना त्यांना पोळले.

या व्हिडिओला खरे मानून जबाबदार पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याने हातात फाटाके फोडले म्हणून यूजर्स टीना डाबी यांच्यावर टीका करीत आहेत. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन  (9049053770) क्रमांकावर पाठवून याची सत्यता विचारली.

आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला आहे. हा व्हिडिओ दिवाळीचा नाही आणि टीना डाबी यामध्ये फटाकेसुद्धा फोडत नव्हत्या. 

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिमध्ये दिसते की, जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांच्या चेहऱ्याजवळ ठिणग्या उडताना दिसतात. या व्हिडिओसोबत यूजर्स म्हणत आहेत की, “जैसलमेरच्या कलेक्टर असूनदेखील रॉकेट हातात घेऊन फोडतात. टीना डाबी असे प्रयोग करु नका.” 

फेसबुक

तथ्य पडताळणी

कीवर्ड सर्च केले असता कळाले की, हा व्हिडिओ दिवाळीचा नसून, दसऱ्याच्यावेळी झालेल्या रावणदहन कार्यक्रमाचा आहे. 

नवभारत टाईम्सच्या बातमीनुसार, 5 ऑक्टोबर रोजी जैसलमेरच्या शहीद पुनम सिंह स्टेडियममध्ये रावणदहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी टीना डाबी यांच्या हस्ते रावणदहन करण्यात आले होते. रावणाच्या पुतळ्याला अग्निबाण मारत असताना त्यांच्या अंगावरच ठिणग्या आल्या होत्या. 

कोरोनाकाळानंतर दोन वर्षांनी जैसलमेरमध्ये रावणदहनाचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेतर्फे सुमारे साडेचार लाख रुपये खर्च करून रावण, कुंभकरण आणि मेघनाद यांचे पुतळे तयार करण्यात आले होते. 

टीना टाबी यांनी पुतळ्याकडे अग्निबाण सोडत असताना अचानक ठिणग्या उडाल्या. असे होऊनही त्यांना बाण खाली पडू दिला नाही.

‘राजस्थान तक’च्या युट्युब चॅनेलवर या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे. 

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, टीना डाबी यांनी हातात रॉकेट फोडले नव्हते. तसेच हा व्हिडिओ दिवाळीचा नसून दसऱ्याचा आहे. रावणदहन कार्यक्रमात अग्निबाण सोडत असताना त्यांच्या अंगावर ठिणग्या उडाल्या होत्या.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी दिवाळीला हातात फटाके फोडले का? चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Partly False