महाराष्ट्रात 1 मार्चपासून लॉकडाऊन? न्यूज चॅनेलचा फेक स्क्रीनशॉट व्हायरल

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढून लागल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (21 फेब्रुवारी) जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी जनतेला आठ दिवसांचा अल्टिमेटम देत सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना काळातील इतर नियम पाळण्याचे आवाहन केले. अन्यथा राज्यात पुन्हा लॉकडॉऊन लावावे लागेल, असे ते म्हणाले.

त्यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, 1 मार्चपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यासाठी टीव्ही-9 मराठी वाहिनीवरील बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, जुन्या बातमीचा हा स्क्रीनशॉट एडिट केलेला आहे. 

काय आहे दावा?

व्हायरल पोस्टमध्ये टीव्ही-9 मराठी वाहिनीच्या बातमीचा स्क्रीनशॉट आहे. त्यात लिहिलेले आहे की, “1 मार्च 2021 पासुन संपुर्ण राज्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन”.

मूळ ट्विट – ट्विटरअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा स्क्रीनशॉट कोणत्या बातमीचा आहे ते शोधले. तेव्हा कळाले की, हा स्क्रीनशॉटमधील बातमी 8 एप्रिल 2020 रोजी (मागच्या वर्षी) मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला होता तेव्हाची आहे. 

म्हणजेच जुन्या बातमीचा स्क्रीनशॉट आता फिरत आहे. त्यामुळे या बातमीत या वर्षीच्या लॉकडाऊनबद्दल माहिती असण्याचा काही प्रश्नच नाही. 

सध्या व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट हा एडिट केलेला आहे. ओरिजनल आणि फेक स्क्रीनशॉटची तुलना खाली केली आहे. फॉन्टमधील फरक लगेच दिसून येतो. 

विशेष म्हणजे टीव्ही-9 मराठी वाहिनीने सध्या त्यांच्या चॅनेलची डिझाईन बदलली आहे. आता त्यांची नवी डिझाईन खाली दिल्याप्रमाणे झाली आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने मग माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपचसंचालक कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी व्हायरल दावा खोटा असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, एका वाहिनीच्या बातमीचा तो स्क्रीनशॉट जुना आणि चुकीच्या पद्धतीने एडिट केलेला आहे. अद्याप महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला नाही. परंतु, सर्वांनी गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावे. गर्दी करणे टाळावे, मास्क घालावे. कोणीही चुकीची माहिती किंवा अफवा पसरवू नये.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय जनतेने पुढील ८ दिवसांत घ्यावा. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधत असताना आवाहन केले. 

ट्विटर

अमरावतीमध्ये लॉकडाऊन

अमरावती शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्यामुळे तेथे रविवारी (21 फेब्रुवारी) एका आठवड्याचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती व अचलपुरमध्ये पुढील आठवडाभरासाठी लॉकडाउनची घोषणा केली.

पुण्यामध्ये नाईट कर्फ्यु लागू झाला असून, रात्री 11 ते सकाळी 6 वाजे दरम्यान विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, टीव्ही-9 मराठी वाहिनीच्या गेल्या वर्षीच्या बातमीचा स्क्रीनशॉट एटिड करून चुकीच्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे. महाराष्ट्रात 1 मार्चपासून लॉकडाऊन लागणार, असी सरकारतर्फे अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. 

Avatar

Title:महाराष्ट्रात 1 मार्चपासून लॉकडाऊन? न्यूज चॅनेलचा फेक स्क्रीनशॉट व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •