अहमदनगरच्या शिवसेना शहरप्रमुखाने उद्धव ठाकरेंवर टीका करणारे पत्र लिहिले का? जाणून घ्या त्या व्हायरल मेसेजचे सत्य

False राजकीय

विधानसभेच्या निकालानंतर चारही प्रमुख पक्षांना राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही. भाजप-शिवसेना युतीचे बिनसल्यानंतर सत्तास्थापनेअभावी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. दरम्यान, बहुमताची आकडेमोड जुळवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला. त्यानंतर ‘महाशिवआघाडी’चे सरकार येणार का अशी अटकळ बांधण्यात येऊ लागली.

सेनेच्या या भूमिकेचा विरोध करणारे एक पत्र सोशल मीडियावर सध्या प्रचंड गाजत आहे. दावा केले जात आहे की, अहमदनगर येथील शिवसेनेचे शहरप्रमुख बी. जी. पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करणारे हे पत्र लिहिले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत न जाण्याची विनंती करीत ते लिहितात की, “ज्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा लाचार मुख्यमंत्री शपथविधी असेल तो माझा शिवसेनेतील शेवटचा दिवस असेल.” 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हायरल मेसेज व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर (9049043487) पाठवून त्याची सत्यता तपासण्याची विनंती केली.

काय आहे तो मेसेज/पत्र?

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडो शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्पष्ट सांगितले की, “हे पत्र लिहिणारे बी. जी. पाटील शिवसेनेशी संबंधित नाहीत.” 

जर बी. जी. पाटील शिवसेनेशी संबंधित नाही तर अहमदनगर येथे शिवसेना शहरप्रमुख कोण? याची माहिती मिळाली की, दिलीप सातपुते हे नगरचे शिवसेना शहरप्रमुख आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बी. जी. पाटील नावाची व्यक्तीच तेथील शिवसेनेत नसल्याचे सांगितले. या पत्राचा शिवसेनेशी काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेविरोधात केलेला हा खोडसाळपणा असून, तो न पसरविण्याचे आवाहन केले.

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या नावे खोटे पत्र तयार करणाऱ्यांविरोधात दिलीप सातपुते यांनी नगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात 13 नोव्हेंबर रोजी तक्रारसुद्धा दिली आहे. या तक्रारीची एक कॉपी त्यांनी पाठवली. ती आपण खाली वाचू शकता. फॅक्ट क्रेसेंडो कोतवाली ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या संपर्क केला असता, त्यांनी सदरील तक्रार मिळाली असल्याचे सांगितले.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, अहमदनगर येथे शिवसेनेच्या शहरप्रमुखांचे नाव बी. जी. पाटील नाही. मुळात या नावाचा कोणताही पदाधिकारी तेथील शिवसेनेत नाही अशी माहिती, विद्यमान शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली. त्यामुळे सदरील पत्र अहमदनगर येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने लिहिलेले आहे, हा दावा चुकीचा ठरतो. 

Avatar

Title:अहमदनगरच्या शिवसेना शहरप्रमुखाने उद्धव ठाकरेंवर टीका करणारे पत्र लिहिले का? जाणून घ्या त्या व्हायरल मेसेजचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False