मुस्लिम विक्रेता हिंदू ग्राहकांच्या ज्युसमध्ये वंध्यत्वाच्या गोळ्या टाकायचा का ? वाचा सत्य

False Social

एका मुस्लिम ज्युस विक्रेत्याला धक्काबुक्की करतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, तो हिंदू ग्राहकांना वंध्यत्वयुक्त गोळ्या टाकून ज्युस विकत होता. विक्रेत्याकडून कथितरीत्या विशिष्ट रसायनदेखील आढळल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. सोबत म्हटले जात आहे की, लोकांनी त्याला रंगेहाथ पकडल्यावर त्याने कबुल केले की, हिंदुंची लोकसंख्या कमी करण्यासाठी तो असे करायचा.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

आमच्या पडताळणीत हा दावा निराधार आढळला. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असून तो विक्रेता ज्युसमध्ये रसायनयुक्त रंग व फ्लेवर वापरत असल्याचा लोकांना संशय आला होता. 

काय आहे दावा ? 

सुमारे पाच मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये काही लोक एका ज्युस विक्रेत्याला पकडून तो ज्युसमध्ये जे रसायन टाकायचा त्याबाबत विचारणा करताना दिसतात. काउंटरखाली शोध घेतला असता ग्राहकाला एक औषधी सापडली ज्याचे रंग आणि चव मोसंबीप्रमाणे होती. 

या व्हिडिओसोबत लिहिले आहे की, “अब्दुल हे फळ विक्रेत्यांचे नाव आहे. तो वंध्यत्व होण्यासाठीच्या गोळ्या आणि इतर औषधे हिंदू ग्राहकांच्या फळांच्या रसात मिसळतो. दुकानातून वारंवार फळांचा रस पिणारा एका ग्राहकाला संशय आला. त्याने गाडीच्या मागील बाजूस तपासणी केली तेव्हा पिवळ्या रंगाचे पाणी आणि लघवीने भरलेले पात्र बघुन तो थक्क झाला. मारहाण करण्याची धमकी दिली असता विक्रेत्याने, कबूल केले की तो लोकसंख्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी हिंदूंकडे फळांच्या रसांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये वंध्यत्व होण्यासाठीच्या गोळ्या मिसळत होता.”

या सोबतच केरळमध्ये एका हॉटेलमधून हिंदू ग्राहकांना वंध्यत्वाच्या गोळ्या दिल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याचाही  उल्लेख केलेला आहे.

फेसबुक 

तथ्य पडताळणी

व्हिडिओमध्ये Awareness Now असा वॉटरमार्क दिसतो. त्यानुसार शोध घेतल्यावर याच नावाच्या एका फेसबुक पेजवर हाच व्हिडिओ सापडला. 

या  पेजवर 14 फेब्रुवारी 2020 अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओसोबत म्हटलेले आहे की, “मोसंबीच्या नावाखाली लोक काय पीत होते? रस्त्यावरील अन्नपदार्थ खाताना पिताना लोकांनी काळजी घेतली पाहिजे.”

या मूळ व्हिडिओमध्ये कुठेही वंध्यत्वाच्या गोळ्यांचा उल्लेख केलेला नाही. यात केवळ मोसंबी ज्युसच्या नावाखाली कृत्रिम चवीचे रसायनयुक्त रस विकत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. 

म्हणजेच हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. मग तो नेमका कुठला आहे याचा शोध घेतला. 

व्हिडिओमध्ये एका ठिकाणी डायमंड मोटर्स इंडिया दुकानाची पाटी दिसते. त्यानुसार सर्च केल्यावर कळाले की, हे दुकान मुंबईतील गिरगाव रोडवरील ऑपेरा हाऊस येथील आहे. 

गुगल स्ट्रीट व्ह्युवने पाहिल्यावर हे स्पष्ट होते व्हिडिओत दिसणारी दुकाने आणि मुंबईतील ऑपेरा हाऊस परिससरातील डायमंड मोटर्स आणि रॉयल स्टेशनरी ही दुकाने एकच आहेत. 

मूळ लोकेशन – गुगल मॅप्स

विशेष म्हणजे संपुर्ण व्हिडिओमध्येसुद्धा कुठेही हा विक्रेता ज्युसमध्ये वंध्यत्वाच्या गोळ्या टाकत असल्याचे म्हटलेले नाही. व्हिडिओतील लोक केवळ त्याला काउंटरखाली आढळलेल्या पिवळ्या रंगाच्या पाण्याविषयी विचारतात. यात कुठेही विक्रेत्याने हिंदू ग्राहकांना वंध्यत्वाच्या गोळ्यायुक्त ज्युस विकत असल्याची या विक्रेत्याने कबुली दिलेली नाही. तो केवळ म्हणतो की, ज्युसमध्ये कृत्रित रंग टाकायचा. 

गोळ्याखाऊन वंध्यत्व येऊ शकते का ? 

गर्भधारणा न होण्यास वंधत्व असे म्हणतात. स्त्री-पुरुष दोघांमध्ये वंध्यत्व असू शकते. गर्भधारणा करण्यास योग्य शुक्राणूंचे पुरेशा प्रमाणात उत्पादन करू न शकणे, खूप जास्त किंवा खूप कमी प्रमाणातील वीर्यद्रव, शिश्नोत्थान असमर्थता, अशी पुरुषांमध्ये वंध्यत्वाची अनेक कारणे असू शकतात. 

स्त्रियांमध्ये याची कारणे म्हणजे वारंवार व गर्भधारणेस योग्य अंड (स्त्रीबीज) तयार करण्याची असमर्थता, सहसा मासिक पाळी न येणे किंवा दीर्घ कालानंतर, अनियामित व थोड्या प्रमाणात येणे अशी असू शकतात. वंध्यत्वाविषयी अधिक येथे वाचा.

औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयामधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले की, व्हायरल व्हिडिओसोबत केल्या जाणाऱ्या दाव्याप्रमाणे गोळ्या खाऊन वंध्यत्व येत नाही. 

केरळमध्ये बिर्याणीमध्ये वंध्यत्वाच्या गोळ्या आढळल्या का?

फॅक्ट क्रेसेंडो यापूर्वीच फॅक्ट-चेक प्रकाशित करून ही खोटी माहिती असल्याचे सिद्ध केलेले हे. केरळमधील एका हॉटेलमध्ये हिंदू ग्राहकांच्या बिर्याणीत नपुंसक/वंध्यत्वाच्या गोळ्या टाकण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा दावा केला जात होता. 

जुने आणि एकमेकांशी संबंध नसलेले फोटो एकत्र करून धार्मिकद्वेष व भीती पसरविली जात आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, हिंदुंची लोकसंख्या कमी करण्यासाठी मुस्लिम विक्रेता हिंदुंना वंध्यत्वाच्या गोळ्या टाकून ज्युस विकण्याचा दावा निराधार आहे. व्हायरल व्हिडिओमधील तो विक्रेता मोसंबीच्या ज्युसच्या नावाखाली कत्रिम रंग व चवीचे रसायन मिसळत होता. सांप्रदायिक दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:मुस्लिम विक्रेता हिंदू ग्राहकांच्या ज्युसमध्ये वंध्यत्वाच्या गोळ्या टाकायचा का ? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False