
एबीपी माझा आणि सी-वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येणार असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. शेयर होत असेलल्या ‘एबीपी माझा’ चॅनेलवरील बातमीच्या कथित स्क्रीनशॉटमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला 146 जागांवर विजय मिळेल तर, भाजप-शिवसेनेच्या युतीला 124 जागांवर समाधान मानावे लागेल असे दाखविण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली.
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये एबीपी माझा व सी-वोटरने केलेल्या सर्व्हेचा स्क्रीनशॉट दिलेला आहे. यामध्ये ‘या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?’ असे प्रश्न आहे. सर्वेक्षणानुसार, भाजप-81, शिवसेना-43, काँग्रेस-60, राष्ट्रवादी-86 तर इतर-18 असे महाराष्ट्राच्या 288 जागांचे निकाल राहतील असे दाखविलेले आहे.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
तथ्य पडताळणी
सदरील स्क्रीनशॉट खरा आहे की खोटा, हे एबीपी माझा चॅनेलच्या अधिकृत बातमी पाहूनच तपासावे लागेल. दिलेल्या पोस्टमधील स्क्रीनशॉट 19 ऑक्टोबर रोजीचा आहे. म्हणजे मतदानापूर्वी घेतलेल्या ओपिनियन पोलचा हा स्क्रीनशॉट असावा. एबीपी माझ्याच्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडियो तपासले असता 18 ऑक्टोबर रोजी अपलोड करण्यात आलेल्या ओपिनियन पोलचा व्हिडियो सापडला.
‘कौल मराठी मनाचा‘ या कार्यक्रमातील ‘यंदा विधानसभेत कोणत्या पक्षाला किती जागा?’ नावाच्या या व्हिडियोमध्ये सी-वोटरच्या मदतीने घेतलेल्या ओपिनियन पोलनुसार, भाजप-134, शिवसेन-60, काँग्रेस-44, राष्ट्रवादी-42 आणि इतर-08 असे महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकाल असतील असे म्हटलेले आहे. व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटमधील आकड्यांहून हे आकडे एकदम वेगळे आहे.
एबीपी माझा चॅनेलच्या अधिकृत वेबसाईटवरसुद्धा या ओपिनियन पोलचे आकडे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. त्यावरून कळते की, एबीपी माझा आणि सी-वोटर यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता येण्याची जास्त शक्यता वर्तविली होती. सर्व्हेत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महायुतीला 194 जागा (भाजप 134 + शिवसेना 60) तर, महाआघाडीला 86 (काँग्रेस 44 + राष्ट्रवादी 42) जागा मिळतील असा अंदाज होता. तर इतर पक्ष आणि अपक्षांना केवळ 8 जागा मिळतील.
मूळ बातमी येथे वाचा – एबीपी माझा । अर्काइव्ह
अधिकृत एबीपी माझा-सी वोटर च्या ओपिनियन पोलचे आकडे आणि व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटमधील आकडे एकदम वेगवेगळे आहेत. दोन्हींची तुलना केल्यावर लक्षात येते की, व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट फोटोशॉप करून तयार करण्यात आला आहे. त्यातील आकडे खोटे आहेत. खाली दिलेल्या तुलनवरून हे अधिक स्पष्ट होईल.
निष्कर्ष
एबीपी माझा व सी-वोटरने घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये भाजप-शिवसेना युतीची सत्ता येणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सोशल मीडियावर फिरत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकणार असा स्क्रीनशॉट फोटोशॉप केलेला आहे.

Title:‘एबीपी माझा’चा फोटोशॉप केलेला सर्व्हे होतोय व्हायरल. वाचा सत्य काय आहे.
Fact Check By: Agastya DeokarResult: False
