तथ्य पडताळणीः हेमा मालिनी खरंच गहू काढायला हेलिकॉप्टरमधून शेतात गेल्या का?

False राजकीय

हेमा मालिनी भाजपतर्फे मथुरा येथून लोकसभेच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराविषयीचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर केले जात आहेत. त्यावरून त्यांची खिल्लीदेखील उडविली जात आहेत. अशाच एका पोस्टमध्ये, हेमा मालिनी हेलिकॉप्टरमध्ये बसून एका शेतात गेल्याची टीका केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यांची पडताळणी केली.

अर्काइव्ह

या पोस्टमध्ये हेमा मालिनी यांचे दोन फोटो दिले आहेत. एकामध्ये हेमा मालिनी हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये त्या शेतात गहू कापताना दिसतात. सोबत कॅप्शन दिली की, मोदीजीच्या राज्यात शेतकऱ्यांची अफाट प्रगती. गहू काढायला शेतमजूर पण हेलिकॉप्टरने येत आहेत. अजून किती अच्छे दिन पाहिजेत मित्रो.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आम्ही हेमा मालिनी यांनी खरंच गहू कापला का याची पडताळणी केली. तेव्हा त्यांच्या ट्विटरवर आम्हाला खालील फोटो आढळले. यामध्ये त्या काही शेतकरी महिलांसोबत शेतात काम करताना दिसतात. त्यांनी ट्विट केले की, गोवर्धन क्षेत्र (मथुरा) येथून माझ्या लोकसभा प्रचार मोहिमेला सुरुवात केली.

अर्काइव्ह

वरील ट्विटमधील फोटोंमध्ये हेमा मालिनी यांनी फिकट गोल्डन रंगाची साडी घातलेली आहे, तर फेसबुक फिरवले जाणारे फोटोंमध्ये त्यांनी निळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे. तसेच ट्विटमध्ये हेमा मालिनी हेलिकॉप्टरने आल्याचा फोटो नाही.

पोस्टमधील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता न्यूजवेव्ह इंडिया नावाच्या एका ब्लॉगस्पॉट पेजची लिंक मिळाली. “बिहार चुनाव में ड्रीमगर्ल हेमा मालिनी के ये तेवर देखे आपने?” नावाची ही ब्लॉगपोस्ट 29 ऑक्टोबर 2015 रोजीची आहे. म्हणजे हा फोटो चार वर्षांपूर्वीपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. तसेच तो बिहारमधील आहे. ही पोस्ट येथे वाचा – न्यूजवेव्ह इंडियाअर्काइव्ह

मग आम्ही ट्विटरवर अ‍ॅडव्हान्स सर्चद्वारे ऑक्टोबर 2015 या महिन्यातील हेमा मालिनी यांचे सर्व ट्विट तपासले. तेव्हा 20 ऑक्टोबर 2015 रोजीचे खालील ट्विट आढळले. हेमा मालिनी यांनी ट्विटमध्ये दोन फोटो शेयर केलेले आहेत. एकामध्ये त्या हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या आहेत. दुसऱ्यामध्ये त्या आणखी दोन जणांसोबत हेलिकॉप्टरसमोर उभ्या आहेत. सोबत लिहिले की, “प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी पाटणा (बिहार) येथून जाताना”

अर्काइव्ह

म्हणजे हेमा मालिनी हेलिकॉप्टरमध्ये बसलेला मूळ फोटो 2015 साली बिहारमधील आहे. मग हेमा मालिनी निळ्या रंगाची साडी घालून शेतात गहू काढतानाचा मूळ फोटो कधीचा आहे?

गुगलवर शोध घेतल्यावर अमर उजालावरील एक फोटो फीचर आढळले. 10 एप्रिल 2014 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या बातमीमध्ये हेमा मालिनी शेतामध्ये गहु काढताना दिसतात. बातमीमध्ये एकुण पाच फोटो आहेत.

मूळ बातमी येथे वाचा – अमर उजालाअर्काइव्ह

या फोटोची सोशल मीडियावरील व्हायरल फोटोशी तुलना केल्यावर दिसून येते की, दोन्ही फोटो सारखेच आहेत.

म्हणजे हेलिकॉप्टरमध्ये हेमा मालिनी यांचा फोटो आणि गहु कापतानाचा फोटो हे एका वेळेचे नाही. त्यांच्यामध्ये सुमारे दीड वर्षांचे अंतर आहे. एक फोटो एप्रिल 2014 मधील तर दुसरा फोटो ऑक्टोबर 2015 मधील आहे.

निष्कर्ष

हेमा मालिनी यांचे जुने आणि एकमेकांशी संबंध नसलेले फोटो 2019 लोकसभेच्या पार्श्वभूमीवर संभ्रमित पद्धतीने पसरवून त्या हेलिकॉप्टरने शेतात गहु काढायला गेल्या, असे चित्र रंगविले जात आहे. वरील तथ्य पडताळणीतून ते असत्य सिद्ध होते.

Avatar

Title:FactCheck: Hema Malinis Helicopter travel for wheat harvesting

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False