काँग्रेसचा जाहीरनामा केवळ मुस्लिमांसाठीच आहे का? जाणून घ्या सत्य

Mixture राजकीय

काँग्रसने मंगळवारी (2 एप्रिल) लोकसभा 2019 निवडणुकीचा जाहीरनामा घोषित केला. त्यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, काँग्रेसने मुस्लिम समाजाला लाभदायक अशा अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये मुस्लिम तरुणांना सरकारी कंत्राटांमध्ये विशेष संधी, विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि इमामांना मासिक मानधन अशा घोषणांचा समावेश आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक अर्काइव्ह

पोस्टमध्ये टीव्ही चॅनेलवरील बातम्यांचे स्क्रीनशॉट दिले आहेत. यामध्ये जाहीरनाम्यातील तीन घोषणा दिसतात.

1. मुस्लिम युवकांना सरकारी कंत्राटांमध्ये विशेष संधी मिळणार

2. गरीब मुस्लिम विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी 20 लाख रुपये दिले जाणार

3. मशिदीतील इमामांना महिन्याला 5000 रुपये मानधन दिले जाणार

सोबत लिहिले की, आखिर काँग्रेस मुस्लिमों को विशेष सुविधाएँ क्यों देती है! काँग्रेस को सभी धर्मों को समान सुविधाए देना चाहिए! (काँग्रेस मुस्लिमांना विशेष सुविधा का देते? काँग्रेसने सगळ्या धर्मांना समान सुविधा द्यायला हव्यात!)

तथ्य पडताळणी

पोस्टमध्ये दिलेल्या फोटोमध्ये स्पष्ट लिहिलेले दिसते की, हा जाहीरनामा लोकसभा 2019 निवडणुकीचा नसून तेलंगणा विधानसभेचा आहे. म्हणजे या घोषणा काँग्रेसने मंगळवारी जाहीर केलेल्या राष्ट्रीय जाहीरनाम्यातील नाहीत.

गेल्या वर्षी तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा (2018) निवडणुकीदरम्यान काँग्रेसने 27 नोव्हेंबर 2018 रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यामध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा आणि घर बांधण्यासाठीसुद्धा पाच लाख रुपयांची तरतुद दिलेली होती. तसेच दलितांसाठी आरक्षण वाढविणे आणि अल्पसंख्याकांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली होती. बातमीत कुठेही केवळ मुस्लिमांसाठी योजना केल्याचे म्हटलेले नाही.

मूळ बातमी येथे वाचा – डीएनएअर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने तेलंगणा काँग्रेसच्या अधिकृत वेबसाईटवरील जाहीरनामा तपासला. याचे नाव जनतेचा जाहीरनामा असे आहे. त्यात आम्हाला खालील बाबी आढळल्या. हा जाहीरनामा तुम्ही येथे वाचू शकता – तेलंगणा जाहीरनामाअर्काइव्ह

जाहीरनाम्याच्या पान क्रमांक 52 वर काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी मुस्लिम अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ, ख्रिश्चन अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ आणि भाषिक व इतर अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

दावा क्र. 1 – मुस्लिम युवकांना सरकारी कंत्राटांमध्ये विशेष संधी

मुस्लिम अल्पसंख्याक आर्थिक महामंडळांतर्गत काँग्रेसने मुस्लिम युवकांना रोजगारासाठी संधी दिली जाईल असे म्हटले आहे. येथे विशेष संधीचा उल्लेख नाही.

पान क्र. 26 वर तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठीच्या लढ्यात मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांसाठी विविध योजना दिलेल्या आहेत. यामध्ये सर्व सरकारी कंत्राटांपैकी 50 ट्क्के कंत्राटे अशा अनुसूचित जाती आणि जमातीच्या (SC/ST) कुटुंबातील युवकांना दिले जातील, असे म्हटले आहे.

तसेच 5 टक्के सरकारी कंत्राटे अनुसूचित जाती, जमाती (SC/ST) आणि इतर घटकांना दिले जातील. दलित ठेकेदारांना दोन कोटी रुपयांपर्यंतचे कंत्राट भरण्यासाठी अनामत रक्कम भरण्याची गरज नसेल (पान क्र. 47).

यावरून सिद्ध होते की, केवळ मुस्लिम तरुणांनाच सरकारी कंत्राटांमध्ये “विशेष” संधी नाही.

दावा क्र. 2 – गरीब मुस्लिम विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी 20 लाख रुपये

जाहीरनाम्यात गरीब अल्पसंख्याकांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी 20 लाख रुपये अर्थसहाय्य करण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर विदेशात शिक्षणाबाबत खालील आश्वासनेदेखील आहेत.

– आर्थिकदृष्टया मागासवर्गातील बेरोजगार तरुणांसाठी 25 लाख रुपयांची शिष्यवृत्ती,

– अनुसूचित जाती, जमाती (SC/ST), अल्पसंख्याक, इतर मागासवर्ग (OBC), आर्थिकदृष्टया कमकुवत प्रवर्गातील (EWS) विद्यार्थ्यांना 25 लाख रुपयांचे अर्थसाह्य

– परदेशातील शिक्षणासाठी कर्ज घेतलेल्या विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे व्याज माफ केले जाईल.

– आंबेडकर विदेशी शिक्षण योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील (SC) युवकांना विदेशात उच्च शिक्षणासाठी 20 एवजी 25 लाखांचे अर्थसहाय्य.

म्हणजे केवळ मुस्लिम युवकांनाच विदेशी शिक्षणासाठी मदत केली जाणार नव्हती.

दावा क्र. 3 – मशिदीतील इमामांना महिन्याला 5000 रुपये मानधन दिले जाणार

मशिदीतील इमामांना पाच नाही तर प्रतिमहिना 6 हजार रुपये मानधन देण्याचे म्हटलेले आहे. परंतु, त्याचबरोबर ख्रिस्ती धर्मातील पॅस्टर, फादर आणि मंदिरातील पुजारी यांनादेखील महिन्याला 6000 रुपये मानधन दिले जाईल, असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे (पान 54).

पान क्र. 89 वर मंदिरातील पुजारी आणि ब्राम्हण समाजासाठीच्या विविध योजना दिलेल्या आहेत. त्यामध्ये तेलंगणातील 643 मंदिरातील पुजाऱ्यांसाठी खालील सुविधा आहेत.

– अपघात विमा

– आरोग्य कार्ड

– पुजाऱ्यांना राज्यसरकारी कर्मचाऱ्यांच्या स्तरावर वेतन

– वयोवर्षे 58 पूर्ण झालेल्या पुजाऱ्यांना पेन्शन

म्हणजे मशिदीतील इमामांबरोबरच पॅस्टर, फादर आणि पुजाऱ्यांना मासिनक मानधन देण्याचे जाहीरनाम्यात म्हटलेले आहे.

निष्कर्ष

तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिमांसह इतर धर्म आणि एकुणच अल्पसंख्याकांसाठी विविध योजना दिलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनामा केवळ मुस्लिमधार्जिणा आहे, असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. सदरील पोस्टमध्ये अल्पसंख्याक व इतर धर्माबाबतच्या योजना टाळून सोयीनुसार (Selective) मुस्लिमांबाबतच्या योजना दिलेल्या आहेत. ज्यातून वाचकास अपूर्ण माहिती कळते. त्यामुळे ही पोस्ट अर्धसत्य आहे.

Avatar

Title:काँग्रेसचा जाहीरनामा केवळ मुस्लिमांसाठीच आहे का? जाणून घ्या सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: Mixture