Fact Check : मोरारजी देसाई दांडिया खेळतानाचा हा व्हिडिओ किती खरा?

False राजकीय

मोरारजी देसाई गरबा खेळताना, अशी माहिती देत Ajita Dixit-Kulkarni यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ही मूळ पोस्ट Kirti Jobanputra यांची आहे. ही मूळ पोस्ट 10 हजाराहून अधिक जणांनी शेअर केली आहे. या पोस्टला एक हजार 800 जणांनी पसंती दर्शवली आहे. यावर 108 जणांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी 

मोरारजी देसाई हे खरेच दांडिया अथवा गरबा खेळले का? हा त्याचाच व्हिडिओ आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही मोरारजी देसाई गरबा खेळताना असा शब्द प्रयोग करत शोध घेतला. त्यावेळी आम्हाला पीएम इंडिया या संकेतस्थळावर मोरारजी देसाई यांच्याविषयी माहिती दिसून आली. या माहितीत कुठेही मोरारजी देसाई यांच्याविषयी अशी कोणतीही माहिती आम्हाला आढळून आली नाही. त्यानंतर आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. विकीपीडियावर असणाऱ्या माहितीतही असा कोणताही उल्लेख आढळला नाही. युटयूबवर असणाऱ्या एका असणाऱ्या एका व्हिडिओच्या माहितीत मात्र माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, वलसाड येथे गरबा खेळताना, वर्ष 1962, असा दावा केलेला आम्हाला दिसून आला.

हा व्हिडिओ पाहिल्यावर याची खात्री करुन घेण्यासाठी आम्ही morarji desai playing dandiya असा इंग्रजी शब्दप्रयोग करत शोध घेतला. त्यावेळी आम्हाला देश गुजरात या संकेतस्थळावर 22 ऑक्टोबर 2018 रोजी देण्यात आलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात मोरारजी देसाई नृत्य करत असल्याचा हा व्हिडिओ खोटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दक्षिण गुजरातमध्ये अशा पध्दतीने दांडिया खेळला जात नसल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. मोरारजी देसाई यांचे पणतू मधुकेश्वर देसाई यांनी स्वत: ही बाब स्पष्ट केली आहे. या व्हिडिओत नृत्य करणारी व्यक्ती ही कुंवरजी नरसी लोडया आहेत. ते कोठया या गुजरातमधील कच्छ भागातील आहेत. मुंबईत 1994 मध्ये त्यांनी हा दांडिया खेळला. दांडिया खेळण्याच्या या पध्दतीस धमाल असे म्हटले जाते, असे या वृत्तात म्हटले आहे. 

देश गुजरात / Archive

मुंबई मिररनेही याबाबतचे वृत्त देताना हे मोरारजी देसाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. दिव्य भास्कर या गुजराती संकेतस्थळानेही 28 ऑक्टोबर 2018 रोजी याबाबतचे वृत्त दिले आहे. हे मोरारजी देसाई नसल्याचे या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. हे कुंवरजी नरसी लोडया असल्याचे त्यांचे बंधू
मुलाजी नरसी लोडया यांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. मुंबईतील लग्न समारंभात हे नृत्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्य भास्कर / Archive 

मोरारजी देसाई यांचे पणतू मधुकेश्वर देसाई यांच्या फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला असता त्यांनी हे मोरारजी देसाई नसल्याचे स्पष्ट केले. कुंवरजी नरसी लोडया यांचे पुत्र चंद्रकांत लोडया यांनी ते आपले वडील असल्याचे सांगितले. मुंबईतील वडाळा येथे लग्न समारंभाच्या आधी हा दांडियाचा कार्यक्रम अनेक वर्षापुर्वी झाला होता, असे त्यांनी नमूद केले.

निष्कर्ष

दांडिया अथवा गरबा खेळतानाचा हा व्हिडिओ मोरारजी देसाई यांचा नाही. खेळात सहभागी झालेली व्यक्ती ही कुंवरजी नरसी लोडया आहे. मोरारजी देसाई यांचे पणतू मधुकेश्वर देसाई यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : मोरारजी देसाई दांडिया खेळतानाचा हा व्हिडिओ किती खरा?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False