देवेंद्र फडणवीस यांनी मास्क न लावता कोरोना बाधित रुग्णांची भेट घेतली का? वाचा सत्य

Coronavirus False राजकीय

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे रुग्णालयातील भेटीचे फोटो शेयर करून त्याविषयी विविध दावे करण्यात येत आहेत. देवेंद्र फडणवीस रुग्णांची विचारपूस करतानाचे फोटो शेयर करून कोणी म्हणतेय की, त्यांनी कोरोनाच्या रुग्णांना भेट दिली तर इतरांनी हे फोटो खरे मानून फडणवीसांनी मास्क का नाही लावला म्हणून टीका केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची पडताळणी केली असता हे दावे चुकीचे असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

फडणवीसांच्या रुग्णालय भेटीचे फोटो शेयर करून एका युजरने म्हटले की, करोना विषाणूची लागण झालेल्या जनतेला जनतेमध्ये जाऊन भेटणारे एकमेव नेतृत्व मा. देवेंद्र फडणवीस साहेब…..!

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक 

ट्विटरवरदेखील हेच फोटो शेयर करून करून एका युजरने आरोप केला की, देवेंद्र फडणवीस कोरोना संकटाचा राजकीय फायद्यासाठी वापर करीत आहेत. एक तर त्यांनी मास्क लावलेला नाही, सोबत एवढा मोठा लवजमा नेला. त्यांना जर खरंच रुग्णांची काळजी असते तर ते एकटे गेले असते. गर्दी टाळण्याऐवजी त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत नेले. (मराठी भाषांतर)

काहींनी मात्र या फोटोंच्या सत्यते बाबत शंका उपस्थित करीत अशा पोस्टचे स्क्रीनशॉट शेयर केले. सोबत लिहिले की, भाजपची आयटी सेलकडून जुनेच फोटो शेयर करण्यात येत आहेत. शरद पाटील या युजरच्या पोस्टचा स्क्रीनशॉट ट्विटरवरदेखील एका युजरने शेयर करीत अमृत फडणवीस यांना टॅग केले केले आणि म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांना मास्क न लावता कोरोनाबाधित रुग्णांची भेट घेतली.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हायरल होत असलेल्या फोटोंची पडताळणी केली असता कळाले की, हे सर्व फोटो जुने आहेत. हे फोटो देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या रुग्णांना दिलेल्या भेटीचे नाहीत. एक-एक करीत प्रत्येक फोटोची सत्यता पाहुया.

फोटो क्र. 1

स्थळ –  शताब्दी हॉस्पिटल, मुंबई

दिनांक – 2 जुलै 2019

निमित्त – गेल्या वर्षी मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे मालाड (पूर्व) भागातील पिंपरीपाडा परिसरात एका इमारतीची 20 फूट उंच भिंत आजूबाजूच्या झोपडय़ांवर कोसळून 26 जणांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेतील बहुतांश रुग्णांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. दुर्घटनेतील जखमींना भेटण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शताब्दी रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री योगेश सागर हेदेखील होते. हा फोटो त्या भेटीचा आहे.

सोर्सANI Tweet | Mumbai Mirror

फोटो क्र. 2

स्थळ – डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय

तारीख – 4 डिसेंबर 2015

निमित्त – डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची उभारणी करण्यात आली होती. या कक्षाचे उद्घाटन तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा फोटो त्यावेळीचा आहे. 

सोर्सCMO Maharashtraमहान्यूज

फोटो क्र. 3

स्थळ – क्युयर इट हॉस्पिटल, नागपूर

तारीख – 5 मे 2017

निमित्त – गडचिरोली येथे भूसुरुंग स्फोटात जखमी झालेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या जखमी जवानांची देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील क्युअर इट रुग्णालयात भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत तत्कालिन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिसत आहेत. 

सोर्सTimes of India | Nagpur Today | ANI Tweet

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, देवेंद्र फडणवीस यांचे जुने फोटो अलिकडे त्यांनी कोरोना रुग्णांची भेट घेतली म्हणून पसरविले जात आहेत. हे फोटो चुकीच्या दाव्यासह पसरविले जात आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी मास्क न लावता कोरोना रुग्णांची भेट घेतली असा दावा देखील खोटा आहे.

Avatar

Title:देवेंद्र फडणवीस यांनी मास्क न लावता कोरोना बाधित रुग्णांची भेट घेतली का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False