BENGAL DOCTORS’ STRIKE: कोलकाता येथील जखमी डॉक्टर कोमामध्ये गेला आहे का?

False वैद्यकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

पश्चिम बंगालमध्ये गेल्या आठवड्यात रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना केलेल्या जबर मारहाणीनंतर चिघळलेले आंदोलन आता देशभर पसरू लागले आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, कोलकाता येथील रुग्णालयात झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन एक डॉक्टर कोमामध्ये गेला आहे. सोबत कोच पडलेल्या डोक्याच्या कवटीचा एक्स-रेदेखील पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

15 जून रोजी शेयर केलेल्या या पोस्टमध्ये तीन फोटो शेयर केलेले आहेत. यामध्ये कवटीचा एक्स-रे आणि जखमी डॉक्टरच्या दोन फोटोंचा समावेश आहे. सोबत लिहिले की, कोलकाता येथील एनआरएस रुग्णालयात 85 वर्षींय मोहम्मद सैफ यांचा मृत्यू झाला. यानंतर सुमारे 200 मुस्लिमांनी रुग्णालयात तोडफोड करीत उपस्थित डॉक्टरांना मारहाण केली. यामध्ये एक डॉक्टर तर इतका गंभीर जखमी झाला की, त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्याची वेळ आली. या डॉक्टरच्या डोक्याला फ्रॅक्चर झाले असून, सध्या तो कोमात गेला आहे.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये सुरू असणाऱ्या डॉक्टरांच्या संपाविषयी माहिती घेतली. टेलिग्राफच्या 12 जून रोजीच्या बातमीनुसार, कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 10 जून रोजी 75 वर्षींय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर ट्रकभरून आलेल्या सुमारे 200 जणांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. या घटनेनंतर डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी करीत बंगालमधील डॉक्टरांनी बंद पुकारला.

मारहाणीमध्ये परिबाह मुखोपाध्याय आणि यश टेकवानी हे एनआरएसमधील दोन ज्युनियर डॉक्टर गंभीर झाले होते. पैकी डॉ. मुखोपाध्याय यांच्या कवटीला फ्रॅक्टर झाल्याने इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्स येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. बातमीतील फोटो आणि पोस्टमधील फोटो सारखाच आहे. त्यामुळे पोस्टमध्ये डॉ. परिबाह मुखोपाध्याय यांचा फोटो वापरला आहे.

मूळ बातमी येथे वाचा – टेलिग्राफअर्काइव्ह

बंगालमधील प्रतिष्ठित दैनिक आनंद बाझारच्या बातमीत इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सतर्फे 11 जून रोजी दुपारी चार वाजता जाहीर केलेले पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, डॉ. मुखोपाध्याय यांना त्यादिवशी पहाटे 3.22 वाजता दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. भरती करतेवेळी ते शुद्धीत होते आणि डोक्याला दगड लागल्याचे त्यांनी सांगितले होते. डोक्याचे सीटी स्कॅन केल्यावर पुढील भागात फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले. उपचार केल्यानंतर सीटी स्कॅनमध्ये मेंदुला काही ईजा पोहचली नसल्याचे आढळले.

डॉ. मुखोपाध्याय यांचे नातेवाईक डॉ. संजीत चॅटर्जी यांनी 17 जून रोजी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये परिबाहची तब्येत ठीक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, त्याच्या मित्रांनी आधी त्याला एनआरएसमध्ये भरती केले. पण, अवस्था गंभीर असल्याने मग त्याला दुसऱ्या दवाखान्यात हलविण्यात आले. डोक्याच्या फ्रॅक्चरमुळे भविष्यात त्रास होऊ शकतो. परंतु, परिबाह ज्या वेगाने बरा होत आहे त्यावरून तसे काही होणार नाही असे वाटतेय.

मूळ मुलाखत येथे वाचा – इंडिया टुडेअर्काइव्ह

इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सतर्फे 17 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीननुसार, डोक्याला झालेल्या गंभीर आघातातून डॉ. परिबाह मुखोपाध्याय आता ठीक होत आहे. मात्र अद्यापही त्याच्यामध्ये चिंता/तणावाची लक्षणे दिसतात. सीटी स्कॅन अहवालामध्ये मेंदूला इजा झाली नसल्याचे स्पष्ट होते. क्विंटने हे पत्रक प्रसिद्ध केले आहे. फॅक्ट क्रेसेंडो हिंदीने इन्स्टिट्यूटचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्धन रॉय यांच्या संपर्क केला असता, त्यांनी परिबाहची स्थिती आता नियंत्रित असल्याचे सांगितले.

न्यूज-18 बांग्लानेदेखील 17 जून रोजी प्रक्षेपित केलेल्या बातमीमध्ये डॉ. मुखोपाध्याय यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगितले आहे. तसेच रुग्णालयात उपचार घेतानाचा एक व्हिडियोदेखील यामध्ये पाहू शकता. यावरून हे सिद्ध होते की, डॉ. मुखापाध्याय यांच्या डोक्याला जरी गंभीर मार लागला असला तरी ते कोमामध्ये गेलेले नाही. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असून, ते सुरक्षित आहेत.

पत्रकार मयुख रंजन घोष यांनीदेखील डॉ. परिबाह यांचा उपचार घेतानाचा व्हिडियो शेयर केला होता. यामध्ये डॉ. परिबाह कोमात नसल्याचे स्पष्ट दिसते.

अर्काइव्ह

निष्कर्ष

कोलकाता येथील एनआरएस रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरची तब्येत आता ठीक असून, तो कोमात गेलेला नाही. त्याच्यावर उपचार करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सने प्रसिद्ध केलेल्या पत्रकावरून ते स्पष्ट होते. त्यामुळे सदरील पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:Fact Check: Is the injured doctor form NRS Medical College in Coma?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •