डीएमके नेत्याने महिला डॉक्टरला मारहाण केली का? काय आहे या व्हिडियोमागचे सत्य?

Coronavirus False

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर ह्ल्ले होत असल्याच्या घटनाही घडत आहेत. एका महिलेला लाथांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडियो सोशल मीडियावर शेयर करून दावा केला जात आहे की, तमिळनाडूमधील डीएमके पक्षाच्या एका नेत्याने ड्युटीवर असणाऱ्या एका महिला डॉक्टरला बेदम मारले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअपवर पाठवून याविषयी पडताळणी करण्याची विनंती केली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो जुना तसेच त्यासोबत केला जाणारा दावा चुकीचा असल्याचे समोर आले. 

काय आहे पोस्टमध्ये?

सुमारे दोन मिनिटांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पुरुष एका महिलेला लाथांनी मारत असल्याचे दिसते. सोबतच्या दोन महिला त्या पुरुषाला थांबविण्याचा प्रयत्न करतात. हा व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, सेल्वाकुमार या डीएमके पक्षाचा नेत्याने ड्युटीवरील एका महिला डॉक्टरला केलेल्या मारहाणीचा हा व्हिडियो आहे.

व्हिडियोतील व्यक्तीची असंवेदनशीलता पाहून लोक त्याला कडक शिक्षा करण्याची सोशल मीडियावर मागणी करीत आहेत.

WhatsApp Image 2020-05-12 at 8.20.28 PM.jpeg

हाच व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. 

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक | अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

फेसबुक कीवर्ड्सने शोध घेतल्यावर टाईम्स ऑफ इंडियाने 13 सप्टेंबर 2018 रोजी अपलोड केलेली पोस्ट आढळली. यामध्ये सध्या व्हायरल होत असलेला व्हिडियोच शेयर केलेला आहे. सोबतच्य माहितीनुसार, डीएमके नेता सेल्वाकुमार याने एका ब्युटी पार्लरमध्ये महिलेला मारहाणी केल्याचा हा व्हिडियो आहे. हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ पोस्ट – फेसबुक

यावरून हे स्पष्ट होते की, हा व्हिडियो जुना म्हणजेच 2018 सालचा आहे. 

काय प्रकरण आहे?

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, तमिळनाडूतील पेराम्बलूर येथील एका ब्युटी पार्लरमध्ये 25 मे 2018 रोजी ही घटना घडली होती. सेल्वाकुमार याने सत्य नामक एका स्थानिक महिलेला ब्युटी पार्लरसाठी पैसे दिले होते. ते पैस परत घेण्यासाठी त्याने ब्युटी पार्लरमध्ये जाऊन अशा प्रकारे महिलेस मारहाण केली होती. सुमारे तीन-चार महिन्यांनी या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडियो जेव्हा सोशल मीडियावर पसरला त्यानंतर पोलिसांनी सेल्वाकुमारला अटक केली.

सेल्वाकुमार कोण आहे?

सेल्वाकुमार हा डीएमके पक्षाचा स्थानिक नेता आहे. पेरम्बलूर जिल्हा परिषदेचा तो माजी सदस्य आहे. महिलेला मारहाण केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली. होती.

Toid.png

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, डीएमके नेत्याने महिलेला मारहाण केल्याचा हा व्हिडियो 2018 मधील आहे. तसेच पीडित महिला ब्युटी पार्लर चालवत होती. ती डॉक्टर नव्हती. त्यामुळे डीएमके नेत्याने महिला डॉक्टरला मारहाण केली हा दावा चुकीचा आहे.

Avatar

Title:डीएमके नेत्याने महिला डॉक्टरला मारहाण केली का? काय आहे या व्हिडियोमागचे सत्य?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False