
जालियनवाला बाग हत्याकांडाला 13 एप्रिल रोजी 100 वर्षे पूर्ण झाले. ब्रिटिश अधिकारी ब्रिगेडियर जनरल डायर याने 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत जमलेल्या हजारो निष्पाप नागरिकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. या हत्याकांडामध्ये 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अनाधिकृत सूत्रांनुसार हा आकडा 1,000 हून अधिक आहे.
या घटनेबद्दल इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी बुधवारी (10 एप्रिल) तेथील संसदेत जाहीर माफी मागितली, अशी बातमी झी 24 तास, टाईम्स नाऊ मराठी, तरुण भारत, जय महाराष्ट्र यांच्यासह अनेक वेबसाईटने दिली. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

झी 24 तास अर्काइव्ह । टाईम्स नाऊ मराठी अर्काइव्ह । तरुण भारत अर्काइव्ह । जय महाराष्ट्र अर्काइव्ह
फेसबुकवरदेखील ही बातमी शेयर करण्यात आली आहे.
तथ्य पडताळणी
झी 24 तासच्या 10 एप्रिलच्या बातमीत म्हटले की, पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रिटिश संसदेत बुधवारी जाहीर माफी मागितली. ही कृती ऐतिहासिक असल्याचेही बातमीत म्हटले आहे.

या बातमीत ANI वृत्तसंस्थेचे ट्विट दिले आहे. ते खाली तुम्ही पाहू शकता. यामध्ये लिहिले की, थेरेसा मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल “खेद” (Regret) व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, “जे झाले, त्याच्यासाठी आम्ही दु:खी आहोत.”
ट्विटमध्ये कुठेही माफी (Apology) असा शब्द नाही. थेरेसा मे यांनी केवळ खेद/पश्चाताप व्यक्त केला आहे. मग राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दैनिकांतील बातम्या तपासल्या. त्यामध्येदेखील थेरेसा मे यांनी माफी मागितली नाही, असे स्पष्ट म्हटले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – न्यूज 18 लोकमत । अर्काइव्ह

मूळ बातमी येथे वाचा – हिंदुस्थान टाईम्स । अर्काइव्ह

मूळ बातमी येथे वाचा – गार्डियन । अर्काइव्ह
बीबीसीने दिलेल्या बातमीतही त्यांनी नमुद केले की, मागच्या पंतप्रधानांप्रमाणे थेरेसा मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल केवळ खेद व्यक्त केला. अनेकांनी मागणी करूनही त्यांनी जाहीर माफी मागितली नाही.

मूळ बातमी येथे वाचा – बीबीसी । अर्काइव्ह
मग आम्ही थेरेसा मे यांनी ब्रिटिश संसदेत बुधवारी प्राईम मिनिस्टर्स क्वेशन्स (पीएमक्यू) सत्रामध्ये दिलेले मूळ स्टेटमेंट तपासले. यामध्ये त्या म्हणतात की, जालियनवाला बाग हत्याकांड हे ब्रिटिश इंडिया राजवटीतील एक अत्यंत वाईट घटना आहे. 1997 साली इंग्लंडच्या महाराणीने जालियनवाला बाग येथे भेट देण्यापूर्वीदेखील ही दोन्ही देशांसाठी क्लेशदायक घटना असल्याचे म्हटले होते. आम्हाला याचा तीव्र खेद आहे. मात्र इंग्लंड आणि भारताचे आज विविध आघाड्यांवर संबंध मजबुत आहेत. इंग्लंडच्या भरभराटामध्ये येथे राहणाऱ्या भारतीयांचा मोठा वाटा राहिलेला आहे. भविष्यातही दोन्ही देशांचे संबंध असेच सदृढ राहतील याची मला खात्री आहे.

मूळ स्टेटमेंट येथे पाहा – UK Parliament । अर्काइव्ह
त्यांनी संसदेत दिलेले भाषण तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये सुरुवातीला पहिल्याच मिनिटात थेरेसा मे जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल खेद व्यक्त करतात.
विशेष म्हणजे सभागृहातील लेबर पक्षाचे जेरेमी कॉर्बिन यांनी सरकारने या संदर्भात पूर्ण आणि स्पष्ट शब्दात माफी मागावी, अशी मागणी केली.
त्यांनी 11 एप्रिल रोजी पंतप्रधान थेरेसा मे यांना पत्र लिहून अशी मागणी केली होती. प्रीत गौर गिल या लेबर खासदाराने ट्विट केले आहे.
अमृतसरमध्ये शनिवारी (13 एप्रिल) हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त डोमिनिक एसक्विथ यांनी जालियनवाला बागमधील स्मारकाला भेट दिली. येथील नोंदवहीत त्यांनी अभिप्राय लिहिला. त्यामध्येदेखील त्यांनी माफी मागितलेली नाही. त्यात केवळ या घटनेबद्दल तीव्र खेद असल्याचे म्हटले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – पीटीआय । अर्काइव्ह
त्यांचा अभिप्राय तुम्ही खाली दिलेल्या ट्विटमध्ये वाचू शकता.
निष्कर्ष
वरील सर्व पडताळणीतून हे सिद्ध होते की, इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल माफी मागितलेली नाही. त्यांनी केवळ खेद व्यक्त केला. त्यामुळे संबंधित बातम्याचे शीर्षक चुकीचे (FALSE HEADLINE) आहे.

Title:FACT CHECK: इंग्लंडच्या पंतप्रधानांनी खरंच जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल जाहीर माफी मागितली?
Fact Check By: Mayur DeokarResult: False Headline
