सत्य पडताळणी: राहुल गांधी खरंच 7 लाख मतांनी वायनाडमधून निवडून आले का?

False राजकीय | Political

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. पक्षाचे राष्ट्राध्यक्ष राहुल गांधी यांनादेखील अमेठी येथे हार पत्कारावी लागली. परंतु, केरळमधील वायनाड येथून राहुल गांधी यांनी दणदणीत विजय मिळवला. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, राहुल गांधी वायनाड येथून सात लाख मताधिक्यांनी निवडणूक जिंकले. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये म्हटले की, राहुल गांधी 7 लाख मतांनी जिंकले. यावरून हे स्पष्ट होते की, वायनाडच्या जनतेन एकत्रित येऊन राहुल गांधींना जिंकवले आहे. पोस्टमध्ये पुढे या विजयाला धार्मिक रंग देऊन सांप्रदायिक टिप्पणी केलेली आहे.

तथ्य पडताळणी

राहुल गांधी यंदा अमेठी आणि वायनाड येथून लोकसभेला उभे होते. अमेठीमध्ये भाजपच्या स्मृती ईराणी यांनी त्याचा पराभव केला. मात्र वायनाडमध्ये ते जिंकले. त्यांचा विजय नेमका किती मतांनी झाला हे तपासले. तेव्हा महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रातील एक बातमी समोर आली. या बातमीत राहुल गांधी 4 लाख 29 हजार 161 मतांनी जिंकल्याचे म्हटले आहे. हा आकडा सात लाखांपेक्षा खूप कमी आहे.

मूळ बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स

यानंतर फॅक्ट क्रेंसेंडोने निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटरील आकडेवारी तपासली. त्यानुसार राहुल गांधी यांना एकुण 7 लाख 6 हजार 367 मते पडली. एकूण मतदारांपैकी 64.67 टक्के लोकांनी त्यांना मतदान केले. त्यांच्याविरोधात उभे असलेल्या कम्यूनिस्ट पक्षाचे उमेदवार पी. पी. सुनीर यांना 2 दोन लाख 74 हजार 597 मते मिळाली. त्यामुळे राहुल गांधी यांचा 4 लाख 31 हजार 770 मतांनी विजय झाला.  

मूळ निकाल येथे पाहा – वायनाड निकाल

निष्कर्ष

राहुल गांधी यांचा वायनाड मतदारसंघातून 4.31 लाख मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे ते सात लाख मतांनी जिंकले अशा पोस्ट असत्य आहेत.

Avatar

Title:सत्य पडताळणी: राहुल गांधी खरंच 7 लाख मतांनी वायनाडमधून निवडून आले का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False