हा सुफी प्रार्थनेचा व्हिडियो आहे. त्याचा निजामुद्दीन मस्जिद किंवा कोरोनाशी काही संबंध नाही. वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

दिल्ली येथील निजामुद्दीन मर्कझमध्ये तबलिग जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे निजामुद्दीन मर्कझविषयी अनेक गोष्टी पसरत आहेत. मुस्लिम भाविक मशिदीमध्ये जोरजोरात श्वासोच्छवास करतानाचा एक व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, निजामुद्दीन मस्जिदीमधील हा व्हिडियो असून, अशा प्रकारे कोरोना पसरविला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

एका मिनिटांच्या व्हिडियोमध्ये मुस्लिम भाविक जोरजोरात श्वासोच्छवास करताना दिसतात. त्यासोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले की, वरील व्हिडिओ बघा हा निजामुद्दीन मस्जिद मधला आहे. असली प्रकारची ह्यांची कोणतीच नमाज किंवा प्रार्थना करण्याची पद्धत नाहीये.. हा प्रकार हे हवे मधील कोरोनाचे विषाणू स्वतःमध्ये लागण होण्यासाठी करताय. आणि हेच लोक उद्या आपल्या जवळ येऊन आपल्याला पण कोरोना बाधित करतील. हाच त्यांचा नवीन जिहाद आहे.

ldlksadn.png

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम इनव्हिड टूलच्या माध्यमातून व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडून रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा व्हिडियो जानेवारी महिन्यापासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 30 जानेवारी 2020 रोजी युट्युबवर “Coronavirus  arrived in Pakistan” नावाने हा व्हिडियो अपलोड करण्यात आला होता.

दिल्लीमध्ये निजामुद्दीन मर्कझ येथे 13 ते 15 मार्च 2020 दरम्यान तबलिग जमातचा कार्यक्रम पार पडला. याचा अर्थ की, या व्हिडियोचा निजामुद्दीनशी काही संबंध नाही.

मग हा व्हिडियो नेमका काय आहे?

रिव्हर्स इमेजद्वारे विविध फेसबुक पेजवर हा व्हिडियो शेयर केल्याचे आढळले. सुफीलीक्स पेजवर 11 फेब्रुवारीला Sufi people doing strange rituals अशा माहितीसह हा व्हिडियो अपलोड केला होता. त्याचबरोबर मलेशिया भाषेतील एका फेसबुक पेज 17 मार्च रोजी हा व्हिडियो शेयर केला होता. त्यात लिहिले की, Dzikir Made in ASWAJA (Ahlul SUFI Wal-Jahiliyah).

यासह अनेकांनी हा व्हिडियो सुफी परंपरेशी जोडला आहे. हा धागा पकडून मग गुगलवर शोध घेतला. यातील Dzikir हा शब्द शोधला असता या मलेशियन भाषेतील शब्दाची इंग्रजी स्पेलिंग Dhikr असल्याचे कळाले. विकिपीडियावरील माहितीनुसार या शब्दाला Zikr, Thikr किंवा Zekr असे देखील लिहिले जाते. या शब्दाचा अर्थ होतो की, देवाची आठवण काढणे, देवाच्या नामाचा जप करणे. सुफी संप्रदायामध्ये अशा प्रकारच्या प्रार्थनेला खूप महत्त्व दिले गेले आहे.

zikr.png

मूळ वेबसाईट येथे पाहा – विकिपीडिया

याविषयी अधिक शोध घेतला असता ‘अ कल्चर ऑफ सुफिजम – नक्षबंदिस इन द ओटोमान वर्ल्ड, 1450-1700’ या पुस्तकातील संदर्भ सापडला. यात म्हटलंय की, सुफी संप्रदायामध्ये दोन प्रकारच्या Dhikr (Zikr) आहेत. एक म्हणजे मनातल्या मनात देवाचे स्मरण करणे (Silent) आणि दुसरी पद्धत म्हणजे देवाच्या नावाचे उच्चारण करणे (Vocal). या दुसऱ्या प्रकारामध्ये देवाच्या नावाचा जप करताना घशातून लाकूड कापताना जशी करवत चालते तसा आवाज येतो. 

सदरील व्हायरल व्हिडियोमध्येसुद्धा भाविक अशाच जप करताना दिसतात. 

sufi-2.png

मूळ पुस्तक येथे वाचा – A Culture of Sufism (Google Books)

‘सुफी बॉडिज – रिलिजन अँड सोसायटी इन मिडेव्हिएल इस्लाम’ पुस्तकात ही  Vocal Dhikr (Zikr) करण्याची सविस्तर पद्धत दिलेली आहे. त्यानुसार, पाठ ताठ करून बसल्यावर आधी बेंबीपर्यंत वाकायचे मग तसे पुन्हा ताठ बसण्यासाठी उठायचे. मग डावीकडून उजवीकडे फिरायचे. असे वारंवार करीत राहायचे. सोबत एका श्वासात देवाचे नाव घेत राहायचे. असे करते वेळी करवत चालवल्यासारखा आवाज येतो.

sufi-1.png

मूळ पुस्तक येथे वाचा – Sufi Bodies (Google Books)

सेपियन वेबसाईटवरील एका लेखात म्हटलंय की, सुफी संप्रदायातील लोक एकत्र येऊन अशी प्रार्थना करतात. सुरुवातीला हळुहळू जप सुरू केला जातो. मग एका ठराविक वेगाने ऊर्जा वाढत जाऊन श्वासोच्छवासून एक विशिष्ट आवाज येतो. अशा प्रकारे प्रार्थना करण्यासाठी सरावाची गरज असते. त्यासाठी तयारीदेखील करावी लागते. असे केल्याने देवाची भेट होते असे मानण्यात येते.

sufi-3.jpg

मूळ लेख येथे वाचा – Sapiens

इंटरनेटवर Dhikr (Zikr) प्रार्थनेचे अनेक व्हिडियो उपलब्ध आहेत. त्याचे एक उदाहरण आपण खाली पाहू शकता. यावरून लक्षात येईल की, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडियोमधील मुस्लिम भाविक कोरोनाची लागण होण्यासाठी असे करत नाहीत. ते देवाची आराधना करत आहेत. त्यांच्या भक्तीपरंपरेचा तो एक भाग आहे. त्याचा उद्देश कोरोना पसरविण्याचा नाही. 

निष्कर्ष

व्हायरल व्हिडियो निजामुद्दीन मशिदीमधील नाही. तो व्हिडियो सुफी संप्रदायातील Dhikr (Zikr) प्रार्थनेचा आहे. त्याचा उद्देश कोरोना विषाणू पसरविण्याचा नाही. 

Avatar

Title:हा सुफी प्रार्थनेचा व्हिडियो आहे. त्याचा निजामुद्दीन मस्जिद किंवा कोरोनाशी काही संबंध नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False