
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या कथित पहिल्या पानाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदींचे पूर्ण पानभर छायाचित्र असून, त्यांना “जगाची शेवटची व सर्वोत्तम आशा” असे म्हटलेले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. न्यूयॉर्क टाईम्सने नरेंद्र मोदींबद्दल असे गौरवोद्गार प्रसिद्ध केलेले नाहीत.
काय आहे दावा?
व्हायरल फोटोमध्ये न्यूयॉर्क टाईम्सच्या पहिल्या पानावर मोदींचे छायाचित्र आहे. वर मथळा आहे की – Last, Best Hope of The Earth. हा फोटो शेअर करून म्हटले की, “जगाची शेवटची आणि सर्वोत्तम आशा – अशी हेडलाईन न्यूयॅार्क टाईम्सने करावी हे खरोखरच आपल्यासाठी, सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आणि अत्यंत गौरवाची बाब आहे. केवळ भारतीयच नव्हे तर सारं जग या कर्तृत्ववान नेत्याकडं मोठ्या आशेने पाहतेय. खरंच उर भरून आलं.”

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
व्हायरल फोटोची नीट तपासणी केल्यावर ते न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्राचे पहिले पान असेल याविषयी शंका येते.
सर्वप्रथम तर यात लिहिला गेलेला मजकूर अतिशयोक्तीपूर्ण आहे. जसे की,
- “World’s most loved and most powerful leader is here to bless us” (जगातील सर्वात लोकप्रिय आणि शक्तिशाली नेता आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे).
- फोटोच्या खाली मोदींना His Highness असे राजेशाही संबोधन वापरले आहे. तसेच हर हर मोदी असेदेखील म्हटले.
वृत्तपत्रात अशी भाषा वापरत नाहीत. तसेच मजकूरामध्ये स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका आहेत. September ची स्पेलिंग “Setpember” अशी लिहिलेली आहे.
खाली 26 सप्टेंबर 2021 रोजी प्रकाशित झालेल्या न्यूयॉर्क टाईम्सच्या पहिल्या पानाचा आणि व्हायरल फोटोची तुलना केलेली आहे. यामध्ये स्पष्ट दिसते की, सदरील व्हायरल फोटो बनावट आहे.
सध्या न्यूयॉर्क टाईम्सची किंमत 6 डॉलर आहे. व्हायरल फोटोत ती 2.5 डॉलर आहे. शिवाय सध्या CLXXI व्हॉल्यूम सुरू असून, व्हायरल फोटोत CLXVI आहे.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर 26 सप्टेंबर 2021 रोजीचा अंक तपासला असता कळाले की, मोदींविषयीची व्हायरल बातमी त्या दिवशी प्रसिद्ध झालेली नाही. मूळात तशी कोणतीही बातमी न्यूयॉर्क टाईम्सने दिलेले नाही.
26 तारखेचा ओरिजनल अंक तुम्ही खाली पाहू शकता.
हेदेखील वाचा: ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या नावाने पसरणारा मोदींवरील स्तुतीपर लेख फेक
NYT-Edition
मूळ स्रोत – न्यूयॉर्क टाईम्स
फॅक्ट क्रेसेंडोने मग ‘न्यूयॉर्क टाईम्स’शी संपर्क साधला. वृत्तपत्राच्या प्रवक्त्या निकोल टायलर यांनी व्हायरल दावा फेटाळून लावला.
“व्हायरल होत असलेला न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानाचा फोटो पूर्णतः बनावट आहे. आज विश्वासार्ह पत्रकारितेची सर्वाधिक गरज असताना असे फोटोशॉप केलेले बनावट फोटो शेअर केल्यामुळे केवळ असत्य माहितीमध्ये भर पडते”, असे निकोल म्हणाल्या.
नरेंद्र मोदी यांच्याविषयी न्यूयॉर्क टाइम्सने प्रकाशित केलेल्या सर्व बातम्या आपण येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, न्यूयॉर्क टाईम्सने नरेंद्र मोदींना “जगाची शेवटची व सर्वोत्तम आशा” म्हटलेले नाही. व्हायरल होत असलेल्या बातमीचा फोटो बनावट आहे. न्यूयॉर्क टाईम्सने अशी कोणतीही बातमी प्रकाशित केलेली नाही. व्यंगात्मक बातमी खरी म्हणून पसरविली जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा)

Title:न्यूयॉर्क टाईम्सने पंतप्रधान मोदींना “जगाची सर्वोत्तम आशा” म्हटले का?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
