‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या नावाने पसरणारा मोदींवरील स्तुतीपर लेख फेक; वाचा सत्य

False राजकीय | Political

पंतप्रधान नरेंद्र मोदी कशाप्रकारे अमेरिका आणि चीनची मक्तेदारी मोडून भारताला सर्वशक्तीमान करीत आहे आणि त्यांचा उदय जगासाठी कसा धोकादायक आहे, याचे विवेचन करणारा एक लेख सोशल मीडियावर शेअर होत आहे. दावा केला जात आहे की, ‘न्यूयॉर्क टाईम्स’चे कुणी जोसेफ हॉप नामक संपादकाने हा लेख लिहिला आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा लेख आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा असत्य आहे. ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये जोसेफ हॉप नावाचे कोणीही संपादक काम करीत नाहीत.

काय आहे दावा?

व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधील संपादक जोसेफ हॉप यांनी ‘मोदी कोण आहेत?’ असा लेख लिहिलेला आहे. त्यात म्हटले की, “या व्यक्तीचा उदय जगासाठी धोका आहे, कारण, त्याने केवळ भारताच्या स्वार्थासाठी एकमेकांना शत्रू बनवले नाही.. तर त्याचा उपयोगही केला आहे. यात केवळ भारताला एक महान देश बनवण्याचा स्वार्थ दिसतो. या व्यक्तीला ,भारताला सर्वोच्च बनवण्याचे एकमेव ध्येय आहे. जर या व्यक्तीला थांबवले नाही, तर भविष्यात असे होईल.. की एक दिवस जेव्हा संपूर्ण जगात भारत एक शक्तीशाली राष्ट्र बनेल आणि तेव्हा तो अमेरिकेलाही भारी पडेल.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

‘न्यूयॉर्क टाईम्स’ने खरंच असा लेख छापला का याचा शोध घेतला. परंतु, ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या वेबसाईटवर कुठेही अशा आशयाचा लेख आढळला नाही.

तसेच, जोसेफ हॉप नावाचे संपादक अथवा लेखकदेखील न्यूयॉर्क टाईम्ससाठी लिहित असल्याची कोणतीही माहिती मिळाली नाही. ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या वेबसाईटवर डीन बॅक्वेट हे कार्यकारी संपादक असल्याचे नमुद आहे. मे 2014 पासून ते या वृत्तपत्राची कमान सांभाळत आहेत. वेबसाईटवरील कर्मचारी यादीमध्ये जोसेफ हॉप नावाची कोणीही व्यक्ती नाही.

शिवाय, मोदींवर जर ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने खरंच असा काही लेख प्रसिद्ध केला असता तर भारतातील वृत्तमाध्यमांनी त्याची दखल घेतली असती. परंतु, तसेदेखील काही समोर आले नाही. 

व्हायरल दाव्याची शहानीशा करण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने मग ‘न्यूयॉर्क टाईम्स’शी संपर्क साधला. वृत्तपत्राच्या प्रवक्त्या निकोल टायलर यांनी ईमेलद्वारे उत्तर देताना व्हायरल दावा फेटाळून लावला.

“’न्यूयॉर्क टाईम्स’चे संपादक म्हणून जोसेफ हॉप यांच्या नावाने केले जाणारे सर्व दावे खोटे आहेत. न्यूयॉर्क टाईम्सचे संपादक डीन बॅक्वेट आहेत,” असे निकोल म्हणाल्या.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, जोसेफ हॉप नावाची व्यक्ती ‘न्यूयॉर्क टाईम्स’चा संपादक नाही आणि व्हायरल होत असलेला “मोदी कोण आहेत?” हा लेख न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे व्हायरल पोस्ट असत्य ठरते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या नावाने पसरणारा मोदींवरील स्तुतीपर लेख फेक; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False