रक्ताने माखलेल्या या बाप-लेकीच्या फोटोमागचे सत्य काय आहे? वाचा खरी कहाणी.

False आंतरराष्ट्रीय | International राजकीय | Political

हात आणि चेहरा रक्ताने माखलेल्या बाप-लेकीचा एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. या फोटोचा वापर करून टोकाचे सांप्रदायिक दावे केले जात आहेत. हा फोटो कथित मोहम्मद फिरोज खान नामक व्यक्तीच्या फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट असून, गायीच्या रक्ताने तो मुलीसोबत होळी खेळल्याचा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये

एका युजरने 16 जून रोजी ही पोस्ट शेयर केली होती. यामध्ये मोहम्मद फिरोज खान नावाच्या फेसबुक अकाउंटवरील पोस्टचा स्क्रीनशॉट आहे. चेहरा आणि हातावर रक्त लागलेल्या बाप-लेकीच्या फोटोखाली इंग्रजीतून लिहिलेले आहे की, बकरी ईदनिमित्त गाईच्या रक्ताची चव घेऊन माझ्या मुलगी एकदम खुश झाली. गाईच्या रक्ताने आम्ही होळी (रंग) खेळली.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून सर्च रिझल्ट पेज क्रमांक तीन वर अरेबिक भाषेतील विविध वेबसाईट्सवर हा रक्ताने माखलेल्या कथित बाप-लेकीचा फोटो आढळला. अल अरेबिया नावाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, हा फोटो इजिप्तमधील आहे. इजिप्तची राजधानी कैरो येथे राहणाऱ्या एका मोहम्मद अल-असकारी नावाच्या एका व्यक्तीने सप्टेंबर 2016 महिन्यात हा फोटो त्यांच्या फेसबुकवर शेयर केला होता. ईद-अल-अधा या सणानिमित्त बोकड्याची बळी दिल्यानंतर त्याने मुलीसोबत असा फोटो टाकला होता. परंतु, लोकांनी त्यावर आक्षेप घेतल्याने त्याने तो डिलीट केला होता.

मूळ बातमी येथे वाचा – अल अरेबिया

अल अरेबिया न्यूज वेबसाईटनुसार, मोहम्मद अल-असकारी हा इतिहास विषयाचा शिक्षक आहे. त्यांच्या एका विद्यार्थ्याने माहिती दिली की, असकारी असे विचित्र फोटो अधुनमधुन टाकत असतो. हा फोटो अनेकांना आवडलेला नाही. परंतु, तो विद्यार्थीप्रिय शिक्षक आहे. इजिप्तमध्ये या फोटोवरून बराच वाद झाला होता. एखाद्या सणाचे कसे फोटो सोशल मीडियावर टाकावे, लहान मुलांना असे रक्ताने माखावे का अशा विविध मुद्द्यावर ऑनलाईन चर्चा झडल्या होत्या.

निष्कर्ष

वरील पुराव्यांवरून सिद्ध होते की, हा फोटो भारतातील नाही. तो इजिप्तमधील एका शिक्षकाचा आहे. त्याचे नाव मोहम्मद फिरोज खान नसून, मोहम्मद अल-असकारी आहे. त्याने बकरी ईदनिमित्त नाही तर, ईद-अल-अधानिमित्त बोकड कापल्यानंतर हा फोटो काढला होता. तसेच गाईच्या रक्ताने होळी खेळल्याच्या दाव्याचा या फोटोशी काही संबंध नाही. इजिप्तमधील एक फोटो वापरून बनावट नावाने हा दावा त्याला जोडण्यात आला आहे.

Avatar

Title:रक्ताने माखलेल्या या बाप-लेकीच्या फोटोमागचे सत्य काय आहे? वाचा खरी कहाणी.

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False