उत्तर प्रदेश सरकारविरोधात आंदोलन म्हणून या महिलेने काटेरी कुंपण गुंडाळले का? वाचा सत्य

False सामाजिक

उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरून सर्वत्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच समाजमाध्यमात एक छायाचित्राद्वारे दावा करण्यात येत आहे की, मोदी-योगी यांच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत हे सांगण्यासाठी या महिलेने शरीराभोवती कुंपणाच्या काटेरी तारा गुंडाळून आंदोलन केले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला.

काय आहे दावा? 

महिलेने शरीराभोवती काटेरी तारा गुंडाळल्याच्या छायाचित्रासोबत म्हटले आहे की, मोदीयोगी राज्यात महिला सुरक्षित नाहीत हे सांगण्यासाठी आपल्या शरीरा भोवती काटेरी कुंपण गुंडाळून फिरणारी महिला.

फेसबुकआर्काइव्ह

तथ्य पडताळणी 

रिव्हर्स इमेजच्या सहाय्याने शोध घेतला असता 6.55 News या युटूयूब चॅनलवरील एक व्हिडिओ आढळला. काटेरी तारा आणि स्टीलचे कपडे अशी वेशभूषा केलेल्या या महिलेचा हा व्हिडिओ आहे. शीर्षकानुसार, हा व्हिडिओ श्रीलंकेतील म्हटले आहे.

हा धागा पकडून अधिक शोध घेतला असता ‘आर्ट फार्म श्रीलंका’ नावाच्या ब्लॉगवर 11 एप्रिल 2015 रोजीच्या लेखात सदरील व्हायरल फोटो सापडला. ब्लॉगवरील लेखानुसार, कोलंबो इंटरनॅशनल कल्चर थिएटर महोत्सवामध्ये एका कलाकारने हा मेटल ड्रेस घालून सादरीकरण केले होते.

या कलाकाराविषयी माहिती मिळवल्यावर कळाले की, तिचे नावा जननी कूरे आहे. ती श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील प्रयोगशील कलाकार आहे. वेशभूषा आचरणातील मर्यादा स्पष्ट करण्यासाठी तिने हा ओसरिया या पारंपारिक वेशभूषेला मेटल ड्रेसमध्ये रुपांतरण केले होते. 

तिच्या फेसबुक अकाउंटवर या वेशभूषेतील 2016 मधील अनेक फोटो आपण पाहू शकता. 

मूळ अल्बम येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की, शरीराभोवती काटेरी कुंपण गुंडाळलेल्या महिलेचे छायाचित्र योगी सरकारविरोधातील आंदोलनाचे नाही. फोटोतील महिला श्रीलंकेतील प्रयोगशील कलाकार असून, 2015 आणि 2016 साली तिने हा मेटल ड्रेस घालून सादरीकरण केले होते. त्याचा हा फोटो आहे.

Avatar

Title:उत्तर प्रदेश सरकारविरोधात आंदोलन म्हणून या महिलेने काटेरी कुंपण गुंडाळले का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False