
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लढत रंगली ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये. निवडणुकीच्या निकालाअंती भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला. तत्पूर्वी एकमेकांवर प्रखर टीका आणि हिंसाचाराचे गालबोट लागल्यामुळे बंगालमध्ये वातावरण एकदम तापलेले होते. लोकसभेचा ज्वर परमोच्च स्थानावर असताना ममता बॅनर्जी यांनी भाजपला आव्हान देत मोदी पंतप्रधान झाल्यास मी आत्महत्या करेन, असे म्हटल्याचा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?
मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाल्यास ममतादीदी आत्महत्या करणार सांगत होत्या. कधी आहे कार्यक्रम.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम ममता बॅनर्जी यांनी असे काही वक्तव्य केले होते का याचा तपास घेतला. त्यासाठी गुगलवर विविध कीवर्डसद्वारे सर्च केले. तेव्हा ममता बॅनर्जी यांनी मोदींवर टीका केल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. परंतु, मोदी पंतप्रधान झाल्यास मी आत्महत्या करेन अशी कोणतीही बातमी आढळली नाही. त्याऐवजी खाली दिलेली बातमी प्रामुख्याने सर्चमध्ये मिळाली.
आऊटलूक मॅगझीनने 9 एप्रिल 2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, ममता बॅनर्जी यांनी रायगंज येथे रॅलीला संबोधित केले होते. यावेळी भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या होत्या की, नरेंद्र मोदींचे द्वेषपूर्ण कारनामे पाहून खुद्द हिटलरनेसुद्धा आत्महत्या केली असती. भाजपच्या उदयासाठी काँग्रेस पक्षाचे कमजोर पडणे कारणीभूत आहे.

मूळ बातमी येथे वाचा – आऊटलूक । अर्काइव्ह
एनडीटीव्ही आणि जनसत्तानेसुद्धा ही बातमी दिली होती. ममता बॅनर्जी यांनी मोदींची हिटलरशी तुलना करून भाजपवर घणाघाती हल्ला चढविला होता. त्या म्हणाल्या होत्या की, हिंसा आणि अत्याचाराचा मार्ग अवलंबून नरेंद्र मोदी सत्तेत आले आहेत. फॅसिस्ट प्रवृत्तीचे तर ते प्रमुख आहेत. आज जर अॅडॉल्फ हिटलर जिवंत असता तर मोदींचे द्वेषाचे राजकारण पाहून त्याने आत्महत्या केली असती.

मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्ही । अर्काइव्ह
ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीदेखील मोदींची तुलना जर्मनीचा हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलरशी केलेली आहे. लोकसत्ताच्या बातमीनुसार, नोटबंदीच्या निर्णयानंतर टीका करताना 24 नोव्हेंबर 2016 रोजी त्या म्हणाल्या होत्या की, मोदींना स्वीस बँकेतून काळा पैसा आणता आला नाही. पण आज सामान्य लोकांच्या कष्टाच्या पैशासाठी मात्र त्यांनी अडचणी निर्माण केल्या आहेत. सर्वसामान्यांमध्ये हिटलरपेक्षाही मोदींची दहशत जास्त आहे.
मोदींच्या पंतप्रधान होणे आणि आत्महत्या याविषयी कोणी काही म्हणाले होते का?
उत्तर प्रदेशातील शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सैयद वसीम रिझवी यांनी 30 एप्रिल रोजी वक्तव्य केले होते की, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास अयोध्येत जाऊन राम मंदिराच्या दरवाजात उभं राहून आत्महत्या करेन. देशद्रोह्यांच्या मदतीने एखाद्या पक्षाचा नेता पंतप्रधान बनला तर मी आत्महत्या करेन. देशद्रोह्यांच्या हातून मरण येण्यापेक्षा आत्मसन्मानानं मरणं कधीही चांगलंच. याविषयी अधिक येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स
निष्कर्ष
मोदी पंतप्रधान झाल्यास आत्महत्या करेन, असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलेले नाही. मोदींचे कारनामे पाहून हिटलनेसुद्धा आत्महत्या केली असती, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे सोशल मीडियावरील दावा खोटा ठरतो.

Title:FACT CHECK: मोदी पंतप्रधान झाल्यावर आत्महत्या करणार असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
