
अभिनेता सुशांतसिंग राजपुतचे रविवारी (14 जून) निधन झाले. मुंबईतील घरातच त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर सर्व क्षेत्रातील मंडळींनी सुशांतसिंगच्या अशा अकाली जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली. राहुल गांधी यांनीसुद्धा सुशांतच्या निधनावर ट्विटद्वारे शोक व्यक्त केला.
राहुल गांधी यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पसरवून दावा केला जात आहे की, सुशांतसिंगने धोनीची भूमिका केलेला चित्रपट पाहून राहुल गांधींना वाटले की, तो क्रिकेटरच आहे. त्यामुळे त्यांनी निधनाच्या ट्विटमध्ये सुशांतसिंगचा उल्लेख क्रिकेटर असा केला.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे समोर आले.
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये राहुल गांधी यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेयर केलेला आहे. यामध्ये सुशांतसिंगचा उल्लेख क्रिकेटर असा केल्याचे दिसते. युजरने हे शेयर करीत कॅप्शन दिले की, “हे काय म्हणावे, हा मंदबुद्धी व्यक्ती एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी चित्रपट पाहुन सुशांत सिंह राजपुत ला क्रिकेटपट्टु समजत आहे.”

मूळ ट्विट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम राहुल गांधी यांनी सुशांतसिंगच्या निधनावर काय ट्विट केले यांचा शोध घेतला. राहुल गांधी यांनी 14 जून रोजी सायंकाळी 7.31 वाजता शोक व्यक्त करणारे ट्विट केले होते. यात त्यांनी म्हटले की, “सुशांतसिंगच्या निधनाची बातमी कळाल्यावर मला दुःख झाले. एक तरुण आणि गुणी अभिनेता आपल्याला लवकर सोडून गेला. त्यांचे कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.”
जसे की, वरील ट्विटमध्ये दिसते, राहुल गांधी यांनी सुशांतसिंगचा उल्लेख ACTOR (अभिनेता) असाच केला आहे. व्हायरल होत असलेले ट्विट आणि राहुल गांधी यांचे मूळ ट्विट या दोन्हींची वेळ सारखीच – 7.31 PM – आहे.
दोन्ही ट्विटची तुलना केल्यावर लक्षात येईल की, राहुल गांधी यांच्या मूळ ट्विटशी छेडछाड करून त्यामध्ये Actor शब्दाऐवजी Cricketer असा शब्द टाकला आहे.

निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, राहुल गांधी यांच्या मूळ ट्विटला एडिट करून ते चुकीच्या दाव्यासह पसरविण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी सुशांतसिंग राजपुतला क्रिकेटर म्हटले नाही. त्याचा उल्लेख त्यांनी अभिनेता असाच केला.

Title:राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये सुशांतसिंग राजपुतला क्रिकेटर म्हटले का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
