ही अभिनंदन वर्धमान यांची पत्नी नाही. शेयर करण्यापूर्वी वाचा सत्य

False राष्ट्रीय

पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर बालाकोटवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. दरम्यान, भारतीय युद्धवैमानिक अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तान सैन्याने कैद केली. या बातमीने संपूर्ण देश विंग कमांडर अभिनंदनसाठी प्रार्थना करू लागला. पाकिस्तानने त्यांची सुटका केल्यामुळे दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव काही प्रमाणात निवळला.

अभिनंदनच्या सुटका आणि बालाकोटवरील हल्ल्याचे राजकीय श्रेय घेण्यावरून दुसरा वाद पेटला. यामध्ये अभिनंदन यांची पत्नीने भाजपला बोल सुनावल्याचा एक कथित व्हिडियो प्रचंड व्हायरल होऊ लागला.

फेसबुकअर्काइव्ह

नरेंद्र गिते यांनी वरील व्हिडियो शेयर केला होता. सोबत कॅप्शन दिली की, “विंग कमांडर अभिनंदन यांच्या पत्नी यांनी भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फटकारले की भाजपने युद्धजन्य परिस्थितीचा राजकीय प्रचारासाठी वापर करू नये सलाम या वीरपत्नीला.”

विजय शिंदे यांनीदेखील हाच व्हिडियो अपलोड करून व्हिडियोतील महिला अभिनंदन यांची पत्नी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी कॅप्शन दिली की, “विंग कमांडर अभिनंदन यांच्या पत्नीने भाजप नेत्यांना कठोर शब्दात सुनावले. सैनिकांच्या शौर्याचा मते मिळवण्यासाठी वापर करू नका. सैनिक हा देश सेवा करत असतो.” फॅक्ट क्रेसेंडोने मग या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

1.07 मिनिटाच्या या व्हिडियोमध्ये महिला म्हणते की, सर्वांना नमस्कार, मी एका सैन्य अधिकाऱ्याची पत्नी आहे. सर्व सैनिकांच्या कुटुंबांच्या वतीने मी सगळ्या भारतीयांना, आणि खासकरून राजकीय नेत्यांना विनंती करते की, सैनिकांच्या बलिदानाचे राजकारण करू नका. एक सैनिक होण्यामागे अपार परिश्रम असतात. जरा विचार की, सध्या अभिनंदन यांचे कुटुंब किती त्रासदायक आणि तणावपूर्ण परिस्थितीतून जात असेल. त्यामुळे कृपया जोपर्यंत भारत-पाक सीमेवरील तणाव निवळत नाही तोपर्यंत सगळे राजकीय कार्यक्रम थांबवा. आणि खबरदार जर सैन्याच्या पराक्रमाचे श्रेय घ्याल तर! कृपा करून तुमचे राजकारण थांबवा. ते करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. पण येथे सैनिक बळी पडत असताना राजकारण करू नका. हीच सर्व पक्षांना, विशेषतः भारतीय जनता पक्षातील नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे.

तर मग खरंच अभिनंदन वर्धमान यांच्य पत्नीने भाजपला खडे बोल सुनावले का? फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम व्हिडियोतील महिला खरंच विंग कमांडर अभिनंदन यांची पत्नी आहे का याची पडताळणी केली. गुगलवर सर्च केले असता अभिनंदन यांच्या पत्नीचे नाव तन्वी मारवा असल्याचे समोर आले.

पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका केल्यानंतर दिल्लीतील आर्मीच्या हॉस्पीटलमध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी त्यांची भेट घेतली होती. डेक्कन क्रोनिकलने तीन मार्चला दिलेल्या बातमीमध्ये या भेटीचा एक फोटो दिला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी अभिनंदन यांच्या पत्नीचे नाव निवृत्त स्क्वॉड्रन लीडर तन्वी मारवा असे दिले आहे.

वरील फोटो निर्मला सीतारमन यांनी स्वतः ट्विट केला होता.

डेक्कन क्रोनिकल-अर्काइव्ह

विंग कमांडर अभिनंदन प्रकाशझोतात आल्यापासून केवळ त्यांचे वडिल मीडियासमोर आले. त्यांची पत्नी तन्वी आणि सात वर्षीय मुलगा तविश हे मीडियापासून दूरच राहिले. त्यांनी कोणालाही प्रतिक्रिया दिलेली नाही.

इंटरनेट आणि सोशल मीडियावरदेखील त्यांच्या संबंधी फारशी माहिती नाही. त्यांचे नाव गुगल केल्यावर समयम तेलुगू या वृत्तस्थळावर खालील फोटो आढळला. टाईम्स ग्रुपचे हे प्रतिष्ठित तेलुगू भाषिक वृत्तस्थळ आहे.

तन्वी मारवा भारतीय वायू सेनेमध्ये कार्यरत होत्या. हेलिकॉप्टर पायलट म्हणून त्या निवृत्त झाल्या. भारत रक्षक वरील माहितीनुसार त्यांनी 17 डिसेंबर 2005 रोजी वायूसेना जॉईन केली. त्यांचा सर्व्हिस क्रमांक 28800 आहे. इंटरनेटवरील माहितीनुसार, त्या सध्या रिलायंस जिओ कंपनीत डीजीएम पदावर कार्यरत आहेत. त्यांचे आयआयएम अहमदाबाद येथून आर्म्ड एक्झिक्यूटीव्ह डिग्री शिक्षण घेतलेले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत अलेलेल्य व्हिडियोतील महिला आणि वरील फोटोची तुलना केली असता हे स्पष्ट होते की, दोन्ही महिला वेगवेगळ्या आहेत.

तसेच व्हिडियोमध्ये सदरील महिलेने एका सैन्य अधिकाऱ्याची पत्नी असल्याचे म्हटले आहे. तो अधिकारी म्हणजे अभिनंदन आहे असे ती म्हटलेली नाही.

मग ही महिला कोण आहे?

व्हिडियोतील फ्रेम्सचे गुगल रिव्हिर्स इमेज सर्च केले असता, सदरील महिलेचे नाव सिरिशा राव असल्याचे अनेक रिपोर्टसमध्ये म्हटले आहे. आयएफसीएन प्रमाणित बुमलाईव्हने या महिलेशी संपर्क केला होता. त्यानुसार, या महिलेने अभिनंदन यांची पत्नी नसल्याचे मान्य केले. “मी आर्मी ऑफिसरची पत्नी असल्याचे व्हिडियोमध्ये म्हटले आहे. अभिनंदन वायूसेनेत पायलट आहेत,” असे त्या म्हणाल्या.

या महिलेचे पती आर्मी कर्नल आहेत. त्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्या असल्याचे म्हटले आहे. त्यांनी @SirishaRao12 या ट्विटर हँडल वरून 28 फेब्रुवारी रोजी हा व्हिडियो अपलोड केला होता. नंतर हे ट्विटर अकाउंट डिलीट करण्यात आले.

निष्कर्ष

पडताळणीतून हे स्पष्ट होते की, व्हिडियोतील महिला अभिनंदन यांची पत्नी नसून हा व्हिडियो चुकीचा संदर्भ देऊन पसरविण्यात येत आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहेत. अभिनंदन यांच्या पत्नीचे नाव तन्वी मारवा असून त्यादेखील वायूसेनेत पायलट होत्या.

Avatar

Title:ही अभिनंदन वर्धमानची पत्नी नाही. शेयर करण्यापूर्वी हे वाचा

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False